loader
Breaking News
Breaking News
Foto

शेतकर्‍यांच्या जमिनी नकोत, त्यांच्या शेतीला आधार द्या - आधी निकृष्ट काम करणार्‍या ठेकेदारांवर कठोर कायदा करा! - युवा रोजगार जनहक्क संघर्ष संघाचर मुख्यमंत्र्यांना निवेदन

खेड (प्रतिनिधी) : सलग तीन वर्षे शेतजमीन पडीक राहिल्यास ती शासनाच्या ताब्यात घेण्याबाबत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केलेल्या भूमिकेच्या पार्श्वभूमीवर कोकणसह संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकर्‍यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. या भूमिकेविरोधात युवा रोजगार जनहक्क संघर्ष संघ, महाराष्ट्र राज्यचे संस्थापक अध्यक्ष बाळा खेडेकर यांनी मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई यांना दि. २३/११/२०२६ रोजी उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी, खेड यांच्यामार्फत सविस्तर निवेदन सादर केले आहे. शेतकर्‍यांना शिक्षा नको, न्याय हवा! असा ठाम इशारा या निवेदनातून देण्यात आला आहे. दि. २१ नोव्हेंबर २०२६ रोजी महसूलमंत्री बावनकुळे यांनी सलग तीन वर्षे शेतजमीन पडीक ठेवल्यास ती शासनाच्या ताब्यात घेण्याबाबत कायद्याची अंमलबजावणी करण्याचे संकेत दिल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांत प्रसिद्ध झाले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शेतीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर जमीन खरेदी करून ती केवळ गुंतवणुकीसाठी पडीक ठेवणार्‍या व्यापारी व व्यावसायिकांवर नियंत्रण आणण्यामागील शासनाची भूमिका समजण्यासारखी असली, तरी या नियमांची अंमलबजावणी करताना प्रत्यक्ष शेती करणार्‍या सामान्य शेतकर्‍यांना त्याचा त्रास होणार नाही, याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे, असे निवेदनात म्हटले आहे. कोकणामध्ये भातशेती, आंबा, काजू, नारळ, सुपारी आणि इतर बागायती शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. मात्र वाढता शेतीखर्च, मजुरांची कमतरता, नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, वन्यप्राण्यांचा त्रास, बाजारभावातील अनिश्चितता आणि शेतीतून मिळणारे अपुरे उत्पन्न यामुळे अनेक शेतकर्‍यांना नियमित शेती करणे शक्य होत नाही. काही जमिनी एक-दोन वर्षे नव्हे, तर नैसर्गिक व आर्थिक अडचणींमुळे काही काळ पडीक ठेवाव्या लागतात. याचा अर्थ संबंधित शेतकर्‍याने आपल्या जमिनीवरील मालकी हक्क सोडले आहेत किंवा त्याला शेती करायची इच्छा नाही, असा होत नाही.

टाईम्स स्पेशल

आज कोकणसह महाराष्ट्रातील अनेक ग्रामीण भागांमध्ये रोजगाराच्या संधी मर्यादित आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांची मुले-मुली रोजगारासाठी मुंबई, पुणे, कोल्हापूर, ठाणे, नाशिक तसेच इतर शहरांमध्ये स्थलांतरित झाली आहेत. काही कुटुंबांतील सदस्य मुंबई-पुण्यात नोकरी करतात, काही व्यवसाय करतात, तर काही कुटुंबांचे संपूर्ण उदरनिर्वाहाचे साधन शेतीऐवजी बाहेरच्या रोजगारावर अवलंबून आहे. अशा परिस्थितीत वडिलोपार्जित शेतीची जमीन गावात असली तरी प्रत्यक्ष शेती करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध होत नाही. त्यामुळे काही वर्षे जमीन पडीक राहिली म्हणून अशा कुटुंबांची जमीन शासनाच्या ताब्यात घेणे हे त्यांच्या दृष्टीने अन्यायकारक ठरू शकते. कोकणातील अनेक शेतकरी कुटुंबांनी कुळ कायद्यांतर्गत अनेक वर्षे न्यायालयीन व प्रशासकीय लढा दिलेला आहे. काही कुटुंबांनी अनेक वर्षे शेती कसली, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली, प्रकरणे लढवली आणि त्यानंतर त्यांच्या नावावर जमिनी झाल्या आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg