loader
Breaking News
Breaking News
Foto

भाईशा घोसाळकर हायस्कूलच्या धनुर्धरांची विभागीय स्पर्धेसाठी साताऱ्याकडे कूच!

संगमेश्वर (सत्यवान विचारे) : जिद्द, मेहनत आणि अचूक नेमबाजीच्या जोरावर जिल्हास्तरीय धनुर्विद्या स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या संगमेश्वर तालुक्यातील कडवई येथील भाईशा घोसाळकर हायस्कूलच्या सहा खेळाडूंनी आता विभागीय स्पर्धेसाठी सज्जता केली आहे. सातारा येथे शनिवार, दि. २२ व रविवार, दि. २३ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विभागीय धनुर्विद्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शाळेचा संघ प्रशिक्षक व शिक्षकांसह साताऱ्याकडे रवाना झाला. काही दिवसांपूर्वी डेरवण येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय धनुर्विद्या स्पर्धेत या शाळेच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक कामगिरी केली होती. यामध्ये मुलांच्या गटात स्वराज चव्हाण याने द्वितीय, तर साईराज सुर्वे याने तृतीय क्रमांक पटकावला. मुलींच्या गटात स्वर इंजळे हिने प्रथम, श्रिया पंडित व परिणीती कांबळे यांनी द्वितीय, तर आर्या जोयशी हिने तृतीय क्रमांक मिळवून विभागीय स्पर्धेतील आपले स्थान निश्चित केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या सहाही गुणवंत खेळाडूंना विभागीय स्तरावर खेळण्याची संधी मिळाल्याने शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. साताऱ्याकडे रवाना होण्यापूर्वी मुख्याध्यापक शेषेराव अवघडे, सुरक्षा समितीचे अध्यक्ष व शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष मिलिंद चव्हाण, प्रशिक्षक संतोष साळुंके, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य तथा माजी उपसरपंच दत्ताराम ओकटे, विजय पंडित, सुजित इंजळे यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी खेळाडूंचे अभिनंदन करून त्यांना पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. दरम्यान, खेळाडूंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संगमेश्वर तालुका संपर्कप्रमुख श्रीपत शिंदे यांनी सहाही खेळाडूंसह प्रशिक्षकांना ड्रेस किट उपलब्ध करून दिले. तसेच भविष्यातही खेळाडूंना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

टाईम्स स्पेशल

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या क्रीडागुणांना प्रोत्साहन देणाऱ्या या सहकार्याबद्दल शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी श्रीपत शिंदे यांचे आभार मानले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी धनुर्विद्येसारख्या कौशल्यपूर्ण खेळात विभागीय स्तरापर्यंत मजल मारणे ही निश्चितच अभिमानाची बाब आहे. आता साताऱ्यातही या सहाही धनुर्धरांनी आपल्या नेमबाजीचा अचूक निशाणा साधत शाळेचे आणि संगमेश्वर तालुक्याचे नाव उज्ज्वल करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg