loader
Breaking News
Breaking News
Foto

नायरी निवळी येथे मध्यरात्री नव्या कोऱ्या दुचाकीला आग; काही क्षणांत गाडी जळून खाक!

संगमेश्वर (सत्यवान विचारे) - संगमेश्वर तालुक्यातील नायरी-निवळी परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास एका नव्या कोर्‍या दुचाकीला अचानक आग लागून ती पूर्णपणे जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. निवळी येथील भरत घडशी यांच्या मालकीची होंडा युनिकॉर्न (एमएच ०८ बीएल ३४५२) ही दुचाकी आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. विशेष म्हणजे, अवघ्या काही महिन्यांपूर्वी खरेदी केलेली ही दुचाकी अशा प्रकारे जळून खाक झाल्याने परिसरात आश्चर्य व्यक्त होत असून, आगीच्या कारणाबाबत संशयही व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भरत घडशी यांनी २० फेब्रुवारी २०२६ रोजी ही दुचाकी खरेदी केली होती. घरापासून काही अंतरावर असलेल्या पाकडीजवळ त्यांनी ती नेहमीप्रमाणे उभी करून ठेवली होती.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मात्र, मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास परिसरातील एका वृद्ध महिलेच्या निदर्शनास दुचाकी जळत असल्याचे आले. त्यांनी तातडीने आरडाओरड करून शेजारील नागरिकांना जागे केले आणि दुचाकीला आग लागल्याची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच काही नागरिक भरत घडशी यांना उठवण्यासाठी धावले, तर काहींनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आगीने काही क्षणांतच रौद्ररूप धारण केल्याने नागरिकांचे प्रयत्न अपुरे पडले. पाहता पाहता संपूर्ण दुचाकी जळून खाक झाली. प्रथमदर्शनी शॉर्टसर्किटमुळे दुचाकीला आग लागली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, ही आग खरोखरच तांत्रिक बिघाडामुळे लागली की अन्य कोणत्या कारणाने लावण्यात आली, हा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

टाईम्स स्पेशल

या घटनेची माहिती भरत घडशी यांनी आज सकाळी संगमेश्वर पोलिसांना दिली आहे. त्यामुळे आता पोलिसांच्या तपासातून आगीचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. ग्रामीण भागात घरापासून काही अंतरावर सुरक्षितपणे उभी करून ठेवलेली आणि नुकतीच खरेदी केलेली दुचाकी मध्यरात्री अचानक जळून खाक होणे ही बाब निश्चितच आश्चर्यकारक आहे. त्यामुळे केवळ शॉर्टसर्किटचा अंदाज व्यक्त करून प्रकरणाकडे दुर्लक्ष न करता आगीमागील नेमके कारण शोधणे आवश्यक आहे. दुचाकीला अपघाताने आग लागली की जाणीवपूर्वक आग लावण्यात आली, याचा सखोल तपास होणे गरजेचे आहे. आता संगमेश्वर पोलीस या घटनेचा तपास करून या आगीमागचे गूढ उकलणार का, याकडे निवळी ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg