loader
Breaking News
Breaking News
Foto

जिल्ह्यात डेंग्यूची साथ मोठ्या प्रमाणात पसरली असताना जिल्हा शासकिय रुग्णालयातील अ‍ॅफेरेसिस मशिन बंद, पालकमंत्र्यांनी आरोग्य यंत्रणेला दिले आदेश

रत्नागिरी : जिल्ह्यात सध्या डेंग्यूची साथ मोठ्या प्रमाणावर पसरली असून रुग्णांच्या शरीरातील प्लेटलेटचे प्रमाण वेगाने घटत आहे. अशा गंभीर परिस्थितीत डेंग्यूबाधित रुग्णांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला आहे. एकीकडे आरोग्य आणीबाणीची परिस्थिती असताना, दुसरीकडे जिल्हा शासकीय रुग्णालयातील महत्त्वाचे ’ अ‍ॅफेरेसिस मशीन बंद असल्याने रुग्णांचे नातेवाईक हवालदिल झाले होते. या गंभीर प्रकाराची दखल घेत पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी ढिसाळ कारभार करणार्‍या आरोग्य यंत्रणेचे कान उपटत, हे मशीन तातडीने दुरुस्त करून पूर्ववत सुरू करण्याचे कडक आदेश दिले आहेत. कोरोनाच्या खडतर काळात पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या पुढाकाराने जिल्हा नियोजन निधीतून सुमारे ४० लाख रुपये खर्च करून हे अत्याधुनिक मशीन खरेदी करण्यात आले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कोरोना काळात या मशीनचा रुग्णांना मोठा आधार मिळाला. मात्र, त्यानंतरच्या काळात आरोग्य प्रशासनाने दाखवलेल्या कमालीच्या दुर्लक्षपणामुळे हे मशीन नादुरुस्त होऊन धूळ खात पडले. या निष्काळजीपणामुळे स्थानिक पातळीवर प्लेटलेट उपलब्ध न झाल्याने, रुग्णांच्या नातेवाईकांना कोल्हापूर, सांगली, सातारा आणि मुंबईसारख्या दूरच्या शहरांकडे धाव घ्यावी लागत होती. या मशीनद्वारे मिळणारे प्लेटलेट किट सुमारे ५ दिवस वापरता येते आणि त्याची मूळ किंमत ९ हजार रुपयांच्या आसपास असते. मात्र, परजिल्ह्यातून हेच किट तातडीने मागवण्यासाठी सामान्य रुग्णांच्या कुटुंबाला ४० ते ५० हजार रुपयांचा प्रचंड आर्थिक फटका बसत होता. ही परिस्थिती गोरगरीब रुग्णांसाठी अत्यंत क्लेशदायक ठरत होती.

टाईम्स स्पेशल

स्थानिक पातळीवर मशीन उपलब्ध असूनही केवळ प्रशासकीय दुर्लक्षामुळे रुग्णांना सोसावा लागणारा हा नाहक आर्थिक व मानसिक त्रास लक्षात येताच डॉ. उदय सामंत यांनी तातडीने चक्रे हलवली. त्यांनी आरोग्य यंत्रणेची चांगलीच झाडाझडती घेत मुंबईहून तज्ज्ञ टेक्निशियन्सना बोलावले आहे. येत्या दोन दिवसांत हे टेक्निशियन रत्नागिरीत दाखल होऊन मशीन दुरुस्त करतील. यामुळे डेंग्यूच्या या संकटात सर्वसामान्य रत्नागिरीकरांना मोठा दिलासा मिळणार असून, वेळेवर आणि रास्त दरात प्लेटलेट मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg