loader
Breaking News
Breaking News
Foto

काशी विश्वनाथ धाममध्ये रायगडच्या पं. उमेश चौधरी यांच्या स्वरांचा निनाद!, वाराणसीत शास्त्रीय गायनातून शिवभक्तीचा सुरेल आविष्कार

पनवेल : रायगड जिल्ह्याचे सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक पं. उमेश निवृत्तीबुवा चौधरी यांच्या सुरेल स्वरांचा निनाद थेट वाराणसी येथील श्री काशी विश्वनाथ धाममध्ये घुमला. नवमीच्या पावन पर्वानिमित्त आयोजित संगीतमय कार्यक्रमात पं. उमेश चौधरी यांनी आपल्या शास्त्रीय गायनातून भगवान शिवाच्या चरणी स्वरसेवा अर्पण केली. त्यांच्या भावपूर्ण सादरीकरणाने उपस्थित श्रोते आणि शिवभक्त मंत्रमुग्ध झाले. रायगडच्या सांगीतिक परंपरेचा स्वर वाराणसीच्या पवित्र भूमीत गुंजल्याने जिल्ह्याच्या सांस्कृतिक क्षेत्रासाठी हा अभिमानाचा क्षण ठरला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

श्री काशी विश्वनाथ धाम येथील शंकराचार्य चौकात पं. उमेश चौधरी यांच्या गायनाने कार्यक्रमातील सादरीकरणांची सुरुवात झाली. त्यांनी राग यमन कल्याणमध्ये निबद्ध ‘आदि देव महादेव’ या भजनाने गायनाला सुरुवात केली. शास्त्रीय संगीताची शिस्त, सुरांची अचूकता आणि भक्तिभावाने ओतप्रोत भरलेल्या त्यांच्या गायनाने वातावरणात आध्यात्मिक रंग भरला. त्यानंतर ‘नाम तुझे बरवे गा शंकरा’ कैलाशीचा देव भोळा आणि ‘वारी ओ वारी’ या रचना सादर करून त्यांनी रसिकांना स्वरांच्या माध्यमातून शिवभक्तीची अनुभूती दिली. वाराणसी ही भारतीय अध्यात्म आणि संगीत परंपरेची महत्त्वपूर्ण भूमी मानली जाते. अशा पवित्र स्थळी रायगडच्या पं. उमेश चौधरी यांना गायनसेवेची संधी मिळणे ही त्यांच्या सांगीतिक प्रवासातील उल्लेखनीय बाब ठरली. त्यांच्या सादरीकरणातून शास्त्रीय संगीत आणि भक्ती यांचा सुरेख संगम अनुभवायला मिळाला.

टाईम्स स्पेशल

या कार्यक्रमात प्रा. मंगला कपूर यांनी संत तुलसीदास यांच्या रचनेतील ‘तू दयाल दीन हौं’ आणि ‘भोले बाबा तेरे द्वार अर्ज हमारी है’ ही भजने सादर केली. रमा सिंह यांनी ‘शंकर तेरी जटा से’ आणि ‘जय जय जग जननी देवी माता’ या भक्तिगीतांनी वातावरण भक्तिमय केले. कथक नर्तक पं. माता प्रसाद मिश्र आणि त्यांच्या शिष्यांनी ‘नागेंद्रहाराय त्रिलोचनाय’ या रचनेवर बनारस घराण्याच्या पारंपरिक कथक शैलीत नृत्य सादर केले. तोडे, तुकडे आणि परन यांच्या आकर्षक आविष्काराने कार्यक्रमाला विशेष रंगत आणली. रायगडच्या भूमीतून आलेल्या पं. उमेश चौधरी यांच्या स्वरांनी काशी विश्वनाथ धाममध्ये भक्तिरसाची अनुभूती निर्माण केली. शास्त्रीय संगीताच्या माध्यमातून शिवभक्तीचा संदेश देणारे त्यांचे हे सादरीकरण रायगडच्या सांगीतिक क्षेत्रासाठी अभिमानास्पद ठरले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg