loader
Breaking News
Breaking News
Foto

पनवेलमध्ये रोज ५८ एमएलडी पाण्याची तूट; तरीही गृहप्रकल्पांना वेग, उद्याच्या लाखो नागरिकांना पाणी कुठून देणार?; भरत पाटील यांचा सवाल, श्वेतपत्रिकेची मागणी

पनवेल : पनवेल-सिडको परिसरात सध्या दररोज तब्बल ५८ एमएलडी पाण्याची तूट असतानाही नवीन गृहप्रकल्पांना वेगाने परवानग्या दिल्या जात असल्याचा मुद्दा उपस्थित करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे रायगड-पनवेल उपजिल्हाप्रमुख भरत बुधाजी पाटील यांनी सरकारला सवाल केला आहे. भविष्यातील पाणीपुरवठ्याचे स्पष्ट नियोजन जाहीर करून याबाबत श्वेतपत्रिका प्रसिद्ध करावी, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. पनवेल महानगरपालिकेच्या ११ सप्टेंबर २०२६ रोजीच्या पत्रानुसार, शहराची सध्याची पाण्याची मागणी २६८ एमएलडी, तर प्रत्यक्ष पाणीपुरवठा सुमारे २१० एमएलडी आहे. त्यामुळे दररोज ५८ एमएलडी पाण्याची तूट असल्याचे पाटील यांनी निदर्शनास आणून दिले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

एकीकडे विद्यमान नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याच्या तक्रारी आहेत, तर दुसरीकडे पनवेल-सिडको परिसरात मोठ्या प्रमाणावर नवीन बहुमजली इमारती आणि गृहप्रकल्प उभे राहत आहेत. या पार्श्वभूमीवर नव्या प्रकल्पांमध्ये वास्तव्यास येणार्‍या नागरिकांसाठी पाणी कुठून उपलब्ध होणार, असा प्रश्न पाटील यांनी उपस्थित केला. नवीन बांधकामांना परवानगी देताना भविष्यातील पाणी उपलब्धतेचा कोणता निकष वापरला जातो, भोगवटा प्रमाणपत्र देताना पाणीपुरवठ्याची खात्री कशी केली जाते आणि वाढत्या लोकसंख्येमुळे निर्माण होणार्‍या अतिरिक्त पाणी मागणीची जबाबदारी कोणाची, याचा खुलासा शासनाने करावा, अशी मागणी त्यांनी केली. भविष्यातील पाणी गरज भागविण्यासाठी शिलार धरणातून पाणी आणण्याचे नियोजन आणि पाताळगंगा नदीतून अतिरिक्त पाणी आणण्यासाठी जलवाहिनीचा प्रस्ताव असल्याचे सांगितले जाते. मात्र, या प्रकल्पांची सद्यस्थिती, मंजुरी, निधी, काम सुरू होण्याची व पूर्ण होण्याची मुदत तसेच प्रत्यक्ष किती एमएलडी पाणी उपलब्ध होणार, याची माहिती शासनाने जाहीर करावी, असे पाटील यांनी म्हटले.

टाईम्स स्पेशल

पाणीटंचाईच्या काळात टँकरद्वारे होणार्‍या पाणीपुरवठ्याचाही हिशेब जनतेसमोर मांडण्याची मागणी त्यांनी केली. किती टँकर, किती फेर्‍या, किती पाणी, किती खर्च आणि कोणाला देयके देण्यात आली, याची माहिती सार्वजनिक करावी, असे त्यांनी सांगितले. सिडको, पनवेल महानगरपालिका, जलसंपदा विभाग आणि संबंधित यंत्रणांची संयुक्त बैठक घेऊन पनवेल-सिडकोच्या सध्याच्या व भविष्यातील पाणीपुरवठ्याचा आढावा घ्यावा आणि त्यानंतर आकडेवारीवर आधारित श्वेतपत्रिका प्रसिद्ध करावी, अशी मागणी पाटील यांनी केली आहे. आज नागरिकांना पाणी मिळत नसेल, तर उद्याच्या वाढत्या लोकसंख्येला पाणी देण्याचे नियोजन कुठे आहे? असा सवाल करत पनवेलच्या वेगवान नागरीकरणासोबत पाणीपुरवठ्याचे नियोजनही तितक्याच वेगाने होणे आवश्यक असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg