loader
Breaking News
Breaking News
Foto

भावे आडोम येथे विहिरीत बुडून प्रौढाचा मृत्यू; मजगावच्या धाडसी तरुणांनी बाहेर काढला मृतदेह

रत्नागिरी (जमीर खलफे) : तालुक्यातील भावे आडोम गावडे गोरीवलेवाडी परिसरातील भुताचे कातळ येथे विहिरीच्या पाण्यात बुडून ४७ वर्षीय इसमाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी उघडकीस आली. संतोष दादू आंबेकर (वय ४७, रा. भावे आडोम गावडे गोरीवलेवाडी, रत्नागिरी) असे मृत इसमाचे नाव असून, या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. विहिरीतून मृतदेह बाहेर काढण्यास कोणीही पुढे येत नसताना माजी सरपंचांच्या संपर्कानंतर मजगाव येथील तरुणांनी दाखवलेल्या धाडसामुळे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळच्या सुमारास संकेत संजय कारकर हे भुताचे कातळ येथील एका विहिरीवरून जात असताना त्यांना काठावर चप्पल आणि लाकडी काठी बेवारस स्थितीत दिसली. विहिरीत कोणीतरी पडल्याचा संशय आल्याने त्यांनी पात्रात डोकावून पाहिले असता एका व्यक्तीचे शव पाण्यावर तरंगताना दिसले. संकेत यांनी तत्काळ वाडीतील ग्रामस्थांना बोलावून घेतले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पाण्यातील कपड्यांवरून ग्रामस्थांना हे शव गावातील संतोष आंबेकर यांचे असावे असा अंदाज आला. त्यानंतर त्यांचे सुपुत्र दुर्वेश संतोष आंबेकर यांना घटनास्थळी बोलावण्यात आले. विहिरीबाहेरील चप्पल, काठी आणि पाण्यातील कपड्यांवरून दुर्वेश यांनी ते शव आपल्या वडिलांचेच असल्याची खात्री केली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस पाटील माने यांनी तात्काळ रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. मात्र, विहिरीतील मृतदेह बाहेर काढण्यासाठी स्थानिक पातळीवर कुणीही विहिरीत उतरण्यास तयार नव्हते. त्यामुळे दांडे आडोमचे माजी सरपंच कैलास तांबे यांनी तातडीने मजगावचे माजी सरपंच फैयाज मुकादम यांच्याशी संपर्क साधून मदत मागितली. फैयाज मुकादम यांच्या सूचनेवरून मजगाव येथील आपत्कालीन मदतीसाठी नेहमी तत्पर असणारे हरीश पोमेटकर यांच्याशी संपर्क साधण्यात आला. तोपर्यंत ग्रामीण पोलिसांचे पथकही घटनास्थळी दाखल झाले होते.

टाईम्स स्पेशल

माहिती मिळताच मजगाव येथील हरीश पोमेटकर, गफूर काझी आणि झियान मुकादम यांनी क्षणाचाही विलंब न लावता, आपल्या जीवाची पर्वा न करता थेट घटनास्थळी धाव घेतली. हरीश पोमेटकर आणि गफूर काझी हे दोरीच्या साहाय्याने विहिरीत उतरले, तर झियान मुकादम याने त्यांना विहिरीबाहेरून मोलाची मदत केली. या तिघांनी शर्थीचे प्रयत्न करून संतोष आंबेकर यांचा मृतदेह विहिरीबाहेर काढला. नेहमीच विहिरीत पडलेली मुकी जनावरे सुखरूप बाहेर काढणे, लोकवस्तीत शिरलेले विषारी सर्प पकडून निसर्गाच्या सानिध्यात सोडणे यांसारखी सामाजिक कामे विनामूल्य करणार्‍या मजगावच्या या तिन्ही धाडसी तरुणांचे पोलीस प्रशासन, माजी सरपंच आणि दांडे आडोम ग्रामस्थांनी मनापासून आभार मानले असून परिसरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. मृतदेह बाहेर काढल्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून शवविच्छेदनासाठी रत्नागिरीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवला. तेथील वैद्यकीय अधिकार्‍यांनी संतोष आंबेकर यांना तपासून उपचारापूर्वीच मृत घोषित केले. या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी बीएनएसएस १९४ अन्वये आकस्मिक मृत्यू क्रमांक ९६/२०२६ अशी नोंद केली असून, घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg