loader
Breaking News
Breaking News
Foto

दापोलीच्या भवितव्यासाठी जनआंदोलनाची हाक, तीनही प्रस्तावित प्रकल्प रद्द करण्यासाठी शासनदरबारी निवेदन

दापोली - दापोली तालुक्याच्या नैसर्गिक संपत्तीचे, पर्यावरणाचे, स्थानिक नागरिकांच्या आरोग्याचे आणि भावी पिढीच्या भवितव्याचे संरक्षण करण्यासाठी तालुक्यातील तीन प्रस्तावित प्रकल्प रद्द करण्यात यावेत, या प्रमुख मागणीसाठी युवा रोजगार जनहक्क संघर्ष संघ, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने मा. उपविभागीय अधिकारी तथा प्रांत अधिकारी, दापोली यांच्या कार्यालयामार्फत शासनाकडे निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनाद्वारे डिसेंबर २०२६ मध्ये होणाऱ्या महाराष्ट्र विधानमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात या प्रश्नावर सविस्तर चर्चा करून शासनाने ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. दापोली तालुक्यात प्रस्तावित असलेले भिवबंदर–आघारी अणुऊर्जा प्रकल्प, चिखलगाव (पश्चिम) बॉक्साईट खाण प्रकल्प आणि प्रस्तावित नवनगर/विकास प्रकल्प या तीन विषयांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. या प्रकल्पांचे संभाव्य पर्यावरणीय, सामाजिक, आर्थिक आणि आरोग्यविषयक परिणाम यांचा सखोल अभ्यास करूनच शासनाने निर्णय घ्यावा, अशी भूमिका संघटनेने मांडली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दापोली हा निसर्गसंपन्न कोकणातील महत्त्वाचा तालुका आहे. येथील आंबा, काजू, नारळ, सुपारी यांसारख्या फळबागा, भातशेती, जलस्रोत, समुद्रकिनारे, मत्स्यव्यवसाय आणि पर्यटन हे स्थानिकांच्या उपजीविकेचे महत्त्वाचे आधार आहेत. या नैसर्गिक साधनसंपत्तीवर कोणताही प्रतिकूल परिणाम झाल्यास त्याचे पडसाद केवळ पर्यावरणापुरते मर्यादित राहणार नाहीत, तर स्थानिक कुटुंबांच्या आर्थिक स्थैर्यावरही होऊ शकतात. कोकणातील शेतकरी आणि बागायतदार अनेक वर्षांच्या मेहनतीने आपल्या जमिनींमध्ये फळबागा उभ्या करतात. पाणी, मातीची गुणवत्ता, योग्य हवामान आणि निसर्गाचे संतुलन हे या बागायतीचे प्रमुख आधार आहेत. प्रस्तावित प्रकल्पांमुळे जमिनीचा वापर बदलणे, धूळ निर्माण होणे, जलस्रोतांवर ताण येणे किंवा प्रदूषणाचा धोका वाढणे अशा शक्यता असल्यास त्यांचे स्वतंत्र आणि शास्त्रीय मूल्यमापन होणे आवश्यक आहे. विशेषतः बॉक्साईट खाण प्रकल्पाच्या बाबतीत उत्खनन, वाहतूक, धूळ नियंत्रण, पाण्याचा वापर, मृदा धूप आणि खाणीनंतर जमिनीच्या पुनर्वसनाबाबत स्पष्ट माहिती जनतेसमोर आली पाहिजे. आंबा-काजू उत्पादकांच्या उत्पन्नावर आणि शेतीच्या भवितव्यावर संभाव्य परिणाम होणार असल्यास त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, असे मत निवेदनातून व्यक्त करण्यात आले.

टाईम्स स्पेशल

दापोली परिसरातील समुद्रकिनारे आणि सागरी परिसंस्था या स्थानिक मच्छीमार बांधवांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहेत. समुद्रातील पाण्याची गुणवत्ता, मासळीचे अधिवास, किनारपट्टीचे संतुलन आणि पारंपरिक मासेमारीची साधने सुरक्षित राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रस्तावित प्रकल्पांमुळे सागरी पर्यावरणावर, पाण्याच्या गुणवत्तेवर किंवा मासेमारीच्या क्षेत्रांवर कोणते परिणाम होऊ शकतात, याची पारदर्शक तपासणी होणे आवश्यक आहे. संभाव्य प्रदूषण, औद्योगिक सांडपाणी, बांधकामांमुळे होणारा गाळ किंवा अन्य पर्यावरणीय परिणाम यांचे शास्त्रीय मूल्यांकन न करता कोणताही निर्णय घेऊ नये, अशी मागणी करण्यात आली आहे. मच्छीमार बांधवांच्या पारंपरिक व्यवसायाला धोका निर्माण होणार नाही, त्यांच्या उपजीविकेवर गदा येणार नाही आणि स्थानिकांना विश्वासात घेतल्याशिवाय कोणतीही प्रक्रिया पुढे जाणार नाही, याची शासनाने हमी द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg