loader
Breaking News
Breaking News
Foto

लायन्स क्लब ऑफ खेड सिटीचा संविधान दिन उपक्रम उत्साहात संपन्न!

खेड : भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या वतीने मुकादम हायस्कूल, खेड येथील ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाची प्रतिज्ञा असलेले लिखित पत्रक भेट देण्याचा विशेष उपक्रम उत्साहात पार पडला. मुकादम हायस्कूलचे चेअरमन ला. शमशुद्दीन मुकादम यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाची प्रतिज्ञा असलेली पत्रके भेट देण्यात आली. त्यानंतर मुकादम हायस्कूलचे शिक्षक समी सर यांनी भारतीय संविधानाच्या निर्मितीचा इतिहास अत्यंत अभ्यासपूर्ण, प्रभावी आणि भावस्पर्शी शब्दांत विद्यार्थ्यांसमोर मांडला. संविधान निर्मितीचा संघर्ष, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे योगदान, संविधान तयार करण्यामागील विचारप्रक्रिया यांचा आढावा घेताना सामी सरांनी जणू इतिहासच विद्यार्थ्यांच्या डोळ्यांसमोर उभा केला. भारतीय संविधान हे केवळ कायद्याचे पुस्तक नसून प्रत्येक भारतीयाच्या जीवनाला दिशा देणारा विचार आहे, हे त्यांनी आपल्या ओघवत्या शैलीतून पटवून दिले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

संविधानाने दिलेले मूलभूत अधिकार, नागरिकांची कर्तव्ये तसेच न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता या मूल्यांचे महत्त्व त्यांनी सविस्तरपणे स्पष्ट केले. भारतातील मतदान प्रक्रियेच्या ऐतिहासिक प्रवासाबद्दल माहिती देताना पहिल्या मतदाराचा उल्लेखही त्यांनी केला. त्यांच्या या सखोल आणि अभ्यासपूर्ण मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना संविधानाचा इतिहास केवळ ऐकायला मिळाला नाही, तर तो अनुभवता आला. त्यांच्या व्याख्यानाने उपस्थितांच्या मनात संविधानाबद्दल आदर आणि अभिमानाची भावना निर्माण केली. यावेळी लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष ला. रोहन विचारे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. समी सरांनी अत्यंत प्रभावीपणे संविधानाचा इतिहास आणि त्यातील मूल्ये विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवल्याबद्दल त्यांनी विशेष कौतुक केले. लायन्स क्लब ऑफ खेड सिटीचे अध्यक्ष ला. अविनाश दळवी यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात शाळेचे चेअरमन, प्राचार्य, शिक्षकवृंद, संस्थेचे पदाधिकारी आणि विद्यार्थ्यांचे आभार मानले. संविधानाची माहिती केवळ एका दिवसापुरती मर्यादित न ठेवता त्यातील मूल्ये आपल्या दैनंदिन जीवनात आचरणात आणणे हीच संविधान दिनाची खरी सार्थकता असल्याचे त्यांनी नमूद केले.

टाईम्स स्पेशल

कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले आणि संविधान दिनाचा हा प्रेरणादायी उपक्रम उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी लायन्स क्लबचे वरिष्ठ सभासद ला. शमशुद्दीन मुकादम आणि मुकादम हायस्कूलचे प्राचार्य हसनमियां रिपाई यांचे विशेष सहकार्य लाभले. त्यांनी केलेले मोलाचे मार्गदर्शन, उत्तम नियोजन आणि सहकार्य यामुळेच हा उपक्रम इतक्या उत्साहात व यशस्वीरीत्या पार पडला. त्यांच्या या योगदानाबद्दल लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. या उपक्रमाला लायन्स क्लब ऑफ खेड सिटीचे अध्यक्ष ला. अविनाश दळवी, माजी अध्यक्ष ला. रोहन विचारे, ज्येष्ठ लायन सभासद डॉ. मरकड, वरिष्ठ सभासद, मुकादम हायस्कूलचे चेअरमन ला. शमशुद्दीन मुकादम, प्राचार्य, रिपाई, डांगे, सामी, मोरे, शिक्षकवृंद, शाळेचा सपोर्ट स्टाफ तसेच बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg