loader
Breaking News
Breaking News
Foto

देवरुखच्या सामाजिक कार्यकर्त्या वैदेही सावंत यांचा ‘उद्योगसखी’ पुणे यांच्या वतीने गौरव

संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील वाशीतर्फे, देवरुख येथील सामाजिक कार्यकर्त्या तथा चक्रभेदी सोशल फाऊंडेशनच्या संस्थापक- अध्यक्षा वैदेही प्रभावती सुधीर सावंत यांना पुणे येथील ‘उद्योगसखी’ या नामांकित महिला संघटनेच्या वतीने ‘नवदुर्गा सन्मान २०२६’ पुरस्काराने गौरविण्यात आले. महिला सक्षमीकरण, विधवा व एकल महिलांचे पुनर्वसन, शैक्षणिक मदत, सामाजिक प्रबोधन आणि व्यसनमुक्तीसाठी केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला. वैदेही सावंत या उच्चशिक्षित असून त्यांनी एमए. (मराठी), एमए (शिक्षण), एम.फिल., बी.एड. व एलएलबी असे शिक्षण घेतले आहे. त्या चक्रभेदी सोशल फाऊंडेशनच्या माध्यमातून महिला, बालक आणि समाजातील वंचित घटकांसाठी सातत्याने कार्यरत आहेत. एनआयआरडी व यशदा या संस्थांच्या स्टेट मास्टर ट्रेनर म्हणून त्यांनी लोकप्रतिनिधी आणि वर्ग-१ अधिकार्‍यांना प्रशिक्षण दिले आहे. तसेच पथनाट्यांच्या माध्यमातून लोककल्याणकारी शासकीय योजनांचा प्रसार व जनजागृती करण्याचे कामही त्यांनी केले आहे. विधवा व एकल महिलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सन्मानाने स्थान मिळावे, त्यांच्यावरील अनिष्ट रूढी-परंपरा दूर व्हाव्यात आणि त्यांना स्वावलंबी जीवन जगता यावे, यासाठी सावंत यांनी विशेष प्रयत्न केले आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

विधवा व एकल महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ आयोजित करून त्यांना सामाजिक सन्मान मिळवून देण्याचा उपक्रम त्यांनी राबविला. आठ एकल महिलांना स्वयंरोजगारासाठी प्रत्येकी आवश्यक असलेले स्टेनलेस स्टीलचे टी-स्टॉल साहित्य पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिले. विधवा महिलांना हळदीकुंकू समारंभात वाण म्हणून २०० साड्यांचे वाटप केले. निराधार महिलांसाठी ‘मायेचं हक्काचं निवारा केंद्र’ सुरू करून त्यांच्या मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटपही केले. शिक्षण आणि सामाजिक संस्कारांच्या क्षेत्रातही त्यांनी उल्लेखनीय उपक्रम राबविले आहेत. त्यांच्या पुढाकारातून महाराष्ट्रातील पहिल्या साने गुरुजी प्राथमिक शाळेला ‘शिव्यामुक्त शाळा’ करण्याचा संकल्प राबविण्यात आला. तसेच गुहागर तालुक्यातील पाचेरी आगर गावात शिवीमुक्त गावाचा ठराव करण्यात आला. शिव्यांची भाषा सोडून सुसंस्कृत संवादाची संस्कृती रुजावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. याशिवाय विधवा व एकल महिलांच्या मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप, पर्यावरण संवर्धनासाठी कापडी पिशव्यांचे वाटप आणि गावोगावी व्यसनमुक्तीसाठी विनामोबदला जनजागृती कार्यक्रम असे विविध उपक्रम त्यांनी राबविले आहेत.

टाईम्स स्पेशल

उद्योगसखी’ हा केवळ महिलांचा समावेश असलेला संघ असून त्यामध्ये ७०० हून अधिक महिला सदस्य आहेत. गृहिणी, घरगुती उद्योग करणार्‍या महिला, डॉक्टर, इंजिनिअर, वकील, राजकीय क्षेत्रातील मान्यवर, समाजसेविका, शिक्षिका, योगतज्ज्ञ, कलाकार, सनदी लेखापाल, आर्किटेक्ट तसेच पोलीस अधिकारी अशा विविध क्षेत्रांतील महिला या संघटनेशी जोडलेल्या आहेत. पुणे, पिंपरी-चिंचवड तसेच ग्रामीण भागांतील महिलांचाही यामध्ये सहभाग आहे. समाजात उल्लेखनीय कार्य करणार्‍या महिलांचा दरवर्षी प्रशस्तिपत्र आणि भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात येतो. यंदाच्या ‘नवदुर्गा सन्मान २०२६’ पुरस्कारासाठी विविध क्षेत्रांत कार्य करणार्‍या महिलांची निवड करून त्यांचा गौरव करण्यात आला. या उपक्रमासाठी मेधा भिंगारकर, दमयंती काटे, शर्मिला नाबर, मयुरी निंबाळकर, स्नेहा गांधी, योगन शेंडे, विद्या वाशिवले, सुनेत्रा वाघ, शारदा हगवणे, सुजाता अग्रवाल, वैशाली ताकवले आणि कांचन शहा यांनी मेहनत घेतली. तसेच डॉ. स्वाती मुळे, योगिता सचिन कोकाटे-बालवडकर, अनघा ठोंबरे, सुनेत्रा व्लॉग्ज, विद्या देवदारे, कांचन शहा आणि प्रा. विजय नवले यांचे सहकार्य लाभले. सामाजिक बांधिलकी जपत महिला सक्षमीकरणासाठी सातत्याने कार्य करणार्‍या वैदेही सावंत यांना मिळालेल्या या सन्मानामुळे देवरुखसह रत्नागिरी जिल्ह्यातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg