loader
Breaking News
Breaking News
Foto

चिपळूणच्या रस्त्यांची पुन्हा चाळण! खड्ड्यांनी नागरिक हैराण; पालिका प्रशासन नेमके करतेय काय? आधी खड्डे बुजवा! बाळा कदम यांचा नगराध्यक्ष, मुख्याधिकारी आणि नगरसेवकांना घणाघाती टोला

चिपळूण (संतोष पिलके) : चिपळूण शहरातील रस्त्यांची अवस्था पुन्हा एकदा दयनीय झाली असून, ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांचा प्रवास अक्षरशः जीवघेणा ठरत आहे. विकासाच्या मोठमोठ्या घोषणा, निधीच्या चर्चा आणि नवीन रस्त्यांची आश्वासने देणार्‍या नगरपालिका प्रशासनाला शहरातील खड्डे मात्र दिसत नाहीत का? असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे. या गंभीर परिस्थितीवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विधानसभा क्षेत्राध्यक्ष महादेव ऊर्फ बाळा कदम यांनी नगराध्यक्ष, मुख्याधिकारी आणि नगरसेवकांना चांगलाच उपरोधिक टोला लगावला आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांसह अंतर्गत मार्गांवरही खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. दुचाकीस्वारांना खड्डे चुकवताना कसरत करावी लागत आहे, तर चारचाकी वाहनचालकांनाही वाहन चालविणे कठीण झाले आहे. खड्ड्यांमुळे वाहनांचे नुकसान होत असून अपघाताचा धोकाही वाढला आहे. पावसाळा असो अथवा पावसाळ्यानंतरचा काळ, चिपळूणकरांच्या नशिबी मात्र खड्ड्यांतूनच प्रवास करण्याची वेळ वारंवार येत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

नवीन रस्त्यांसाठी निधी, मंजुरी आणि नियोजनाच्या चर्चा सुरूच राहतील; पण तोपर्यंत नागरिकांनी खड्ड्यांतूनच प्रवास करायचा का? असा सवाल बाळा कदम यांनी उपस्थित केला आहे. नगराध्यक्ष, मुख्याधिकारी, सर्व नगरसेवक आणि नगरपालिका प्रशासनाने आधी शहरातील रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी करावी. नवीन रस्त्यांची कामे तातडीने होणार नसतील, तर किमान सध्या पडलेले खड्डे तरी व्यवस्थित बुजवावेत, अशी त्यांची स्पष्ट भूमिका आहे. प्रशासनाच्या कारभारावर उपरोधिक भाष्य करताना कदम यांनी नागरिकांच्या संतापाची तीव्रताही व्यक्त केली. शहरातील रस्त्यांची अवस्था पाहता नागरिकांना प्रशासनातील जबाबदार पदाधिकार्‍यांच्या पालकांची आठवण काढावी लागत असल्याचा खोचक टोला त्यांनी लगावला. विशेष म्हणजे, रस्त्यांच्या दुरुस्तीचा प्रश्न केवळ राजकीय आरोप-प्रत्यारोपांचा नसून तो थेट नागरिकांच्या सुरक्षिततेशी संबंधित आहे. दररोज शाळकरी विद्यार्थी, नोकरदार, ज्येष्ठ नागरिक आणि व्यावसायिक यांना याच रस्त्यांवरून प्रवास करावा लागतो. त्यामुळे एखादा मोठा अपघात घडल्यानंतरच नगरपालिका प्रशासनाला जाग येणार आहे का? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित होण्याची शक्यता आहे.

टाईम्स स्पेशल

आता आश्वासनांचा पाऊस नको, रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याची प्रत्यक्ष कृती हवी! केवळ खड्ड्यांवर माती अथवा निकृष्ट साहित्य टाकून मलमपट्टी न करता दर्जेदार दुरुस्ती करण्यात यावी. शहरातील सर्व प्रमुख आणि अंतर्गत रस्त्यांचे सर्वेक्षण करून तातडीने दुरुस्तीची मोहीम हाती घ्यावी, अशी मागणी जोर धरत आहे. एकीकडे चिपळूणच्या विकासाच्या गप्पा मारल्या जात असताना दुसरीकडे नागरिकांना खड्ड्यांतून मार्ग काढावा लागत असेल, तर या विकासाचा उपयोग काय? बाळा कदम यांच्या या उपरोधिक टीकेनंतर तरी नगरपालिका प्रशासन खडबडून जागे होणार का? की चिपळूणकरांना आणखी काही काळ खड्ड्यांशीच झुंज द्यावी लागणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg