loader
Breaking News
Breaking News
Foto

साखरप्यात स्त्रीभ्रूण हत्येचा धक्कादायक प्रकार! डॉक्टरसह तिघांवर गुन्हा दाखल; दोघांना अटक

देवळे (प्रकाश चाळके) - संगमेश्वर तालुक्यातील साखरपा येथे बेकायदेशीर गर्भपात आणि स्त्रीभ्रूण हत्येचा गंभीर प्रकार उघडकीस आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी साखरपा येथे खासगी प्रॅक्टिस करणारे डॉक्टर आणि करवीर तालुक्यातील एका दाम्पत्याविरोधात देवरुख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी संबंधित डॉक्टर आणि महिलेच्या पतीला अटक केली असून, न्यायालयाने दोघांनाही २७ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर संबंधित महिलेवर रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. देवरुख पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, करवीर तालुक्यातील एक दाम्पत्य १९ नोव्हेंबर रोजी गर्भपातासाठी साखरपा येथील खासगी प्रॅक्टिस करणारे डॉ. विजय नारकर यांच्याकडे आले होते. यावेळी १६ ते १८ आठवड्यांच्या गर्भधारणेतील स्त्रीभ्रूणाचा गर्भपात करण्यात आल्याचा आरोप आहे. मात्र, या प्रक्रियेदरम्यान संबंधित महिलेला मोठ्या प्रमाणात रक्तस्राव सुरू झाला. त्यामुळे डॉक्टर आणि दाम्पत्य घाबरले. पुढील उपचारांसाठी त्यांनी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालय गाठले. जिल्हा शासकीय रुग्णालयातील स्त्रीरोगतज्ज्ञांनी महिलेची तपासणी केल्यानंतर या प्रकरणात स्त्रीभ्रूण हत्येचा संशय व्यक्त केला. त्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सकांनी संबंधित डॉक्टर आणि दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल करण्याबाबत अहवाल दिला. या अहवालाच्या आधारे देवरुख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम ८८, १२५ (ब) तसेच गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदानतंत्रे (लिंग निवडीस प्रतिबंध) अधिनियम १९९४ मधील कलम ४, ५ (२), २३ (१), २३ (३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी संबंधित डॉक्टर आणि महिलेच्या पतीला अटक करून देवरुख न्यायालयात हजर केले. न्यायालयाने दोघांनाही २७ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास देवरुख पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव करीत आहेत. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन लांजा उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक सुरेश कदम यांनी देवरुख पोलीस ठाण्याला भेट देऊन तपासाबाबत मार्गदर्शन केले. या संपूर्ण प्रकरणातील सर्वाधिक धक्कादायक बाब म्हणजे संबंधित डॉक्टरवर यापूर्वीही अशाच स्वरूपाच्या प्रकरणात गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. मार्च २०२४ मध्ये कोल्हापूर जिल्ह्यात उघडकीस आलेल्या कथित अवैध गर्भलिंगनिदान रॅकेटमध्ये डॉ. विजय नारकर यांचा आरोपी म्हणून समावेश होता. त्यावेळी करवीर पोलिसांनी रत्नागिरी येथे येऊन त्यांना अटक केली होती. तसेच त्यांच्या दवाखान्यातून गर्भपातासाठी वापरल्या जाणार्‍या प्रतिबंधित औषधांचा मोठा साठा जप्त केल्याची माहिती समोर आली होती.

टाईम्स स्पेशल

२०२४ मधील गंभीर प्रकरणानंतरही आता पुन्हा अशाच प्रकारच्या गुन्ह्यात संबंधित डॉक्टरचे नाव समोर आल्याने आरोग्य यंत्रणेच्या देखरेखीबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. यापूर्वीच्या प्रकरणानंतर संबंधित डॉक्टरच्या वैद्यकीय व्यवसायावर आणि हालचालींवर लक्ष ठेवण्यात आले होते का, असा सवालही उपस्थित केला जात आहे. करवीर तालुक्यातील दाम्पत्याने गर्भपातासाठी थेट संगमेश्वर तालुक्यातील साखरपा गाठल्याने या प्रकरणाचे गांभीर्य अधिक वाढले आहे. यापूर्वीही अशा प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यांसाठी साखरपा परिसराचा वापर झाला होता का, तसेच या प्रकरणामागे आणखी कोणाचे जाळे कार्यरत आहे का, याचा तपास आता पोलिसांकडून केला जाण्याची शक्यता आहे. या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, संबंधित डॉक्टरने यापूर्वीही असे प्रकार केले आहेत का आणि या संपूर्ण प्रकरणामागील नेमके सूत्रधार कोण आहेत, याचा उलगडा पोलीस तपासातून होणार आहे. स्त्रीभ्रूण हत्या आणि बेकायदेशीर गर्भपातासारख्या गंभीर प्रकारामुळे साखरपा परिसरात संताप व्यक्त होत असून, या प्रकरणाच्या सखोल तपासाची मागणी होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg