loader
Breaking News
Breaking News
Foto

मिरजोळे-नाखरेकर वाडीत लोकसहभागातून जलसंधारणाचा यशस्वी प्रयोग; अवघ्या अडीच तासांत साकारला बंधारा!

रत्नागिरी (प्रतिनिधी): “पाणी अडवा... जीवन फुलवा!” या उदात्त संकल्पनेतून आणि सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून मिरजोळे गावातील नाखरेकरवाडी येथे एका प्रेरणादायी जलसंधारण उपक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. कुठल्याही मोठ्या आर्थिक मदतीची अपेक्षा न ठेवता, केवळ दोन ते अडीच तासांच्या श्रमदानाच्या जोरावर ग्रामस्थ, विविध सामाजिक संस्था आणि मेकॅनिक बांधवांनी एकत्र येत नदीवर बंधारा बांधण्याचे काम विक्रमी वेळेत पूर्ण केले. या उपक्रमामुळे ग्रामस्थांमध्ये आणि परिसरामध्ये एकच उत्साह पाहायला मिळाला. रविवार, दिनांक १ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ठीक ७ वाजता मिरजोळे गावातील नाखरेकरवाडी येथील नदीवर या बंधारा बांधकामाच्या मोहिमेला उत्साहात सुरुवात झाली. ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते आणि एकता रत्नागिरी जिल्हा मेकॅनिक असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष नदीपात्रात उतरून श्रमदान केले. सर्वांच्या अफाट एकजुटीमुळे आणि अथक परिश्रमांमुळे सकाळी ठीक ९.३० वाजता, म्हणजेच अवघ्या अडीच तासांत बंधाऱ्याचे काम पूर्णत्वास आले. पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवून भूजल पातळी वाढवणे आणि भविष्यातील पाणीटंचाईवर मात करणे हा यामागचा मुख्य उद्देश होता.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या संपूर्ण उपक्रमात ग्रुप ग्रामपंचायत मिरजोळेचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे ठरले. ग्रामपंचायतीच्या वतीने बंधारा बांधण्यासाठी आवश्यक असणाऱ्या पिशव्या आणि प्लास्टिक पेपर उपलब्ध करून देण्यात आले. विशेष कौतुकाची बाब म्हणजे, रविवारची शासकीय सुट्टी असूनही ग्रामपंचायतीचे कर्मचारी या सामाजिक कार्यात सहभागी झाले होते. ​ग्रामपंचायत मिरजोळेचे सरपंच रत्नदीप पाटील हे सकाळपासून स्वतः उपस्थित राहून संपूर्ण कामाचे मार्गदर्शन करत होते. तसेच ग्रामपंचायत सदस्य सूरज मालगुंडकर यांनी प्रत्यक्ष श्रमदान करून आपले सामाजिक दायित्व पार पाडले, तर ग्रामपंचायत कर्मचारी सुजित पाटील यांचेही बहुमोल सहकार्य लाभले. केवळ व्यवसायापुरते मर्यादित न राहता समाजाच्या आणि गावाच्या हितासाठी आपणही काहीतरी योगदान दिले पाहिजे, हा संदेश एकता रत्नागिरी जिल्हा टू व्हिलर मेकॅनिक, तांत्रिक प्रशिक्षण व कौशल्य विकास असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या कृतीतून दिला. या असोसिएशनच्या सदस्यांनी बंधारा बांधण्यासाठी शारीरिक श्रम घेत विशेष मेहनत घेतली. तसेच, सहभागी सर्व श्रमदात्यांसाठी सकाळी चहा आणि कांदा पोह्यांची सुंदर अल्पोपहाराची व्यवस्था असोसिएशनचे पदाधिकारी गणेश नारायण शेंडे यांनी करून उपक्रमात वेगळाच आनंद निर्माण केला.

टाईम्स स्पेशल

​या कामासाठी जनसेवा सामाजिक मंडळ, गोळपचे मार्गदर्शक ॲड. अविनाश काळे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. तसेच प्रसिद्ध टू-व्हिलर स्पेअर पार्टस दुकानाचे मालक स्वप्नील शेठ शेट्ये, सुमित घुडे, महेश पालकर, कुमार हितेन पालकर, प्रकाश संते आणि सामाजिक कार्यकर्ते मयुरेश भितळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवत या उपक्रमाला बळ दिले. ​नाखरेकर वाडीतील ग्रामस्थांनीही यामध्ये उस्फूर्त सहभाग नोंदवला. यात श्रीराम नाखरेकर, भरत नाखरेकर आणि सुरेश शेंडे यांच्यासह अनेक ग्रामस्थांचे मोलाचे योगदान लाभले. आज बांधलेला हा बंधारा केवळ माती, पिशव्या आणि श्रमांचा साचा नाही, तर तो गावाच्या अतुट एकजुटीचा, सामाजिक जाणिवेचा आणि जलसमृद्ध भविष्याच्या आशेचा भक्कम आधार आहे. “थेंब थेंब साठवूया, पाण्याचा अम अमूल्य ठेवा जपूया” हा संदेश या निमित्ताने पुन्हा एकदा गावाला मिळाला असून, “पाणी आपल्या गावचं... जबाबदारीही आपलीच!” ही भावना यातून प्रत्यक्षात उतरली आहे. ​या यशस्वी उपक्रमात ग्रुप ग्रामपंचायत मिरजोळे, नाखरेकर वाडीचे समस्त ग्रामस्थ, जनसेवा सामाजिक मंडळ (गोळप) आणि एकता रत्नागिरी जिल्हा टू व्हिलर मेकॅनिक असोसिएशनच्या सर्व सदस्यांनी व उपस्थित श्रमदात्यांनी मिळून हा जलसंकल्प यशस्वी केला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg