loader
Breaking News
Breaking News
Foto

एसटी बसमधून धुराचे लोट; घाबरलेल्या युवतीची खिडकीतून उडी! मालवणच्या कुपेरी घाटीतील घटना

मालवण (प्रतिनिधी) : भरगच्च प्रवासी असलेल्या एसटी बसमधून अचानक धुराचे लोट बाहेर पडू लागल्याने मालवण तालुक्यातील कुपेरी घाटीत गुरुवारी सायंकाळी घबराट उडाली. गाडीला आग लागण्याच्या भीतीने प्रवाशांनी दरवाजाकडे धाव घेत असताना या प्रकाराने गोंधळलेल्या एका युवतीने घाबरून खिडकीतून बाहेर उडी मारल्याने तिच्या हाताला व पाठीला दुखापत झाली आहे. दरम्यान, याच मार्गावरून प्रवास करणारे आरोग्य सेवक लक्ष्मण नातेवाड यांनी प्रसंगावधान राखत जखमी युवतीला तातडीने मालवण ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या बाबतचे अधिक वृत्त असे की, वेंगुर्ला येथून मालवणच्या दिशेने येणारी एसटी बस गुरुवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास कुपेरी घाटीतील चढावावर आली असता अचानक मोठा आवाज झाला. त्यानंतर बसमधून धुराचे लोट बाहेर पडू लागले. बसचा वेगही कमी झाला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन चालकाने तातडीने बस थांबवली आणि खबरदारी म्हणून गाडी बंद करून सीएनजी यंत्रणेचा स्विच बंद केला. मात्र, धूर येतच असल्याने बसमधील प्रवासी घाबरले. बस पूर्ण भरलेली असल्याने बाहेर पडण्यासाठी दरवाजाजवळ एकच गर्दी झाली. याच गोंधळात बसच्या मागील बाजूस असलेल्या एका युवतीने घाबरून खिडकीतून बाहेर उडी मारली. जमिनीवर आपटल्याने तिच्या हाताला व पाठीला मार लागला. परिसरात अंधार आणि आजूबाजूला झाडीझुडपे असल्याने काही काळ नेमके काय घडले, हे कोणालाच समजत नव्हते.

टाइम्स स्पेशल

जखमी युवती मालवण येथील रहिवासी असून ती कुडाळ येथे कामाला जाते. गुरुवारी सायंकाळी ती कुडाळहून मालवणकडे येण्यासाठी बसने निघाली होती. मात्र, काळसे होबळीचा माळ येथे तिची बस बंद पडली. त्यामुळे त्या बसमधील प्रवाशांनी मागून येणार्‍या वेंगुर्ला-मालवण बसमध्ये प्रवेश केला. प्रवाशांची संख्या वाढल्याने बस खचाखच भरली होती. एसटी बसमधून अचानक धूर का बाहेर पडला, याचे नेमके कारण समजू शकले नाही. घटनेनंतर मालवण एसटी डेपोचे अधिकारी व कर्मचारी ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले होते. आरोग्य सेवक लक्ष्मण नातेवाड यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे जखमी युवतीला वेळेत वैद्यकीय मदत मिळाली. त्यांच्या या मदतकार्याचे कौतुक होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg