loader
Breaking News
Breaking News
Foto

सुमन विद्यालय, टेरवचे ज्येष्ठ शिक्षक अमोल शशिकांत टाकळे यांच्या रक्तदान चळवळीतील उल्लेखनीय योगदानाची राष्ट्रीय स्तरावर दखल!

चिपळूण :रक्तदान ही केवळ सामाजिक सेवा नसून, एखाद्याला जीवनदान देणारी मानवतेची चळवळ आहे. या उदात्त भावनेतून रत्नागिरी जिल्ह्यात रक्तदात्यांचे संघटन करून रक्तदान चळवळीला व्यापक स्वरूप देणारे ब्लडलाईन ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष तथा सुमन विद्यालय, टेरवचे ज्येष्ठ शिक्षक श्री. अमोल शशिकांत टाकळे यांच्या उल्लेखनीय सामाजिक कार्याची राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे. त्यांच्या या सेवाकार्याबद्दल त्यांना ‘नॅशनल अवॉर्ड २०२६’ प्रदान करून गौरविण्यात आले.शुक्रवार, दिनांक ३० ऑक्टोबर २०२६ रोजी तासगाव, जिल्हा सांगली येथे आयोजित विशेष पुरस्कार वितरण सोहळ्यात स्व. यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समितीचे अध्यक्ष व प्रमुख अतिथी श्री प्रदीप आप्पा कदम तसेच बॉम्बे ब्लड ग्रुप ऑर्गनायझर इंडियाचे संस्थापक अध्यक्ष श्री. विक्रम विश्रांत यादव यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

बॉम्बे ब्लड ग्रुप ऑर्गनायझर इंडिया यांच्या वतीने आयोजित या सोहळ्यास अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे सांगली जिल्हा कार्याध्यक्ष श्री. तुकाराम धायगुडे, अभिजीत कौलगे, गणेश माने, पलूस तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री. महेश चौगुले, वैभव यादव, अभिजीत बुधले, आसिफ आत्तार तसेच तासगाव तालुक्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. किरण अवचर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.ब्लडलाईन ग्रुपच्या माध्यमातून आज हजारो रक्तदात्यांचे संघटन करण्यात आले असून, रत्नागिरी जिल्ह्याच्या विविध भागांत रक्तदानाची चळवळ सातत्याने राबविली जात आहे. तरुणांना रक्तदानासाठी प्रेरित करणे, सामाजिक संस्था व मंडळांना रक्तदान शिबिरे आयोजित करण्यासाठी प्रोत्साहित करणे, शिबिरांचे नियोजन करणे आणि गरजू रुग्णांना वेळेत रक्त उपलब्ध करून देण्यासाठी समन्वय साधणे, अशा विविध उपक्रमांतून या ग्रुपने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.

टाइम्स स्पेशल

विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे सहज उपलब्ध न होणाऱ्या दुर्मिळ निगेटिव्ह रक्तगटाच्या रक्तदात्यांचेही प्रभावी संघटन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या गरजू रुग्णांना रक्ताची आवश्यकता भासल्यास संबंधित रक्तपेढ्यांच्या मागणीनुसार रक्तदात्यांशी तातडीने संपर्क साधून रक्तदानाची व्यवस्था करण्यासाठी ग्रुपचे सदस्य तत्परतेने कार्यरत असतात. त्यामुळे अनेक रुग्णांसाठी ब्लडलाईन ग्रुप आशेचा किरण ठरत आहे.शिक्षण क्षेत्रातील आपल्या अध्यापन कार्यासोबतच सामाजिक बांधिलकी जपत रक्तदानासारख्या जीवनदायी चळवळीत महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या श्री. अमोल टाकळे यांच्या कार्याचा राष्ट्रीय स्तरावर झालेला गौरव हा टेरव गावासह रत्नागिरी जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब ठरली आहे.त्यांच्या या सन्मानाबद्दल शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, सहकार, कला, क्रीडा आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या पुढील सामाजिक व सेवाभावी कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg