loader
Breaking News
Breaking News
Foto

दोन आठवड्यात आंजणारी पुलावर दोन भीषण अपघात, महामार्गाच्या तांत्रिक चुकीचा फटका?

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील लांजा तालुक्यातील आंजणारी पूल आणि घाट परिसर सध्या वाहनचालकांसाठी ’मृत्यूचा सापळा’ ठरत आहे. महामार्ग चौपदरीकरणाच्या कामातील तांत्रिक त्रुटी, तीव्र उतार आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या ठिकाणी अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. अवघ्या दोन आठवड्यांच्या अंतरात येथे दोन मोठ्या दुर्घटना घडल्या असून, एका पोलीस अधिकार्‍याचा जीव गेला. या गंभीर समस्येपुढे आता स्थानिक प्रशासनही हतबल झाल्याचे चित्र दिसत असून प्रवाशांचा जीव टांगणीला गेला आहे. ताज्या घटनांनी पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. आज शुक्रवार (दि. १३ नोव्हेंबर) पहाटे ३.३० वाजण्याच्या सुमारास विरारहून मालवणकडे जाणार्‍या खासगी आराम बसला एका भरधाव ट्रकने पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की बस उलटून महामार्गावर सुमारे २०० मीटरपर्यंत फरफटत गेली. या दुर्घटनेत ३० हून अधिक प्रवासी जखमी झाले असून काहींची प्रकृती गंभीर आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या घटनेच्या अवघ्या काही दिवस आधीच (३१ ऑक्टोबरच्या मध्यरात्री) याच परिसरात एका भरधाव कंटेनरने वाहतूक पोलिसांच्या वाहनाला धडक दिल्याने पोलीस उपनिरीक्षकासह तिघांना आपला जीव गमवावा लागला होता. जुलै, सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यातही येथे मालवाहू कंटेनर व ट्रक उलटण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. या आधी शेकडो अपघात झाले असतांना मुंबई-गोवा महामार्गावरील अपघातप्रवण प्रशासनाला माहिती असतांना त्याठिकाणी कोणतीही उपाययोजना केलेली नाही. हे जनतेचे दुर्दैव्य असल्याचे बोलले जात आहे. महामार्गाचे काम पूर्णत्वाकडे जात असतानाही आंजणारी पुलाजवळ अपघात का वाढत आहेत, सदोष रस्ता रचना आणि तीव्र दिशाभूल करणारा उतार असल्याने घाटातून उतरल्यानंतर लगेचच पुलाचा भाग सुरू होतो. येथील तीव्र उतार आणि वळणांवर भरधाव येणार्‍या अवजड वाहनांचा वेग नियंत्रित करणे चालकांना कठीण जाते. प्रशासनाकडून गतिरोधकही टाकण्यात आले आहेत. तरीही अपघाताचे प्रमाण काही कमी झालेले नाही.

टाईम्स स्पेशल

आता अपघात रोखण्यासाठी प्रशासनाकडून आंजणारी अपघातप्रवण क्षेत्रात २१ कोटी रुपयांच्या उड्डाण पुलाचा प्रस्ताव मंजुरीसाठी वरिष्ठ अधिकार्‍यांकडे पाठविण्यात आला आहे. चौपदरीकरणाचे काम झाले आता अतिरिक्त २१ कोटी खर्च होणार आहेत. उड्डाण पुल केव्हा होईल हे सांगता येणार नाही. मुबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम पुर्ण होण्यासाठी तब्बल १५ वर्ष लोटली. त्यामुळे उड्डाणपूल पुर्ण होईपर्यंत आंजणारी येथील आणखी किती निष्पाप लोकांचे जीव जाणार आहेत? असा सवाल प्रवाशी जनतेतून केला जात आहे. अपघात घडल्यानंतर लांजा पोलीस, हातखंबा वाहतूक पोलीस आणि स्थानिक ग्रामस्थ तातडीने धावून बचावकार्य करतात. मात्र, मूळ तांत्रिक दोष दूर करण्याचे अधिकार महामार्ग प्राधिकरणाकडे असल्याने स्थानिक पोलीस आणि महसूल प्रशासनही हतबल झाले आहे. जोपर्यंत पुलाच्या रचनेत सुधारणा होत नाही आणि कडक सुरक्षा उपाययोजना राबवल्या जात नाहीत, तोपर्यंत आंजणारी पुलावरील हे मृत्यूचे तांडव थांबणार नाही, अशी तीव्र भावना प्रवासी आणि लांजावासीयांकडून व्यक्त होत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg