loader
Breaking News
Breaking News
Foto

शरद पवारांचा पक्ष एनडीएसोबत, केंद्र सरकारला बाहेरून पाठिंबा?

नवी दिल्ली, - २०२९ च्या लोकसभा निवडणुकीपुर्वी नारीशक्ती वंदन आणि मतदारसंघ फेररचना विधेयक (परिसीमन विधेयक) मंजूर करून घेण्यासाठी दिल्लीत भाजपच्या जोरदार हालचाली सुरू असून त्यासाठी नवी समिकरणे जुळताना पाहायला मिळत आहेत. हे विधेयक मंजूर व्हावे यासाठी दस्तूरखुद्द शरद पवार यांनी भाजपला पाठिंबा दिल्याची चर्चा येथील राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. शरद पवार बहुमत जुळवण्यासाठी एनडीएला अन्य काही पक्षांचा पाठिंबा मिळवून देण्याचे प्रयत्न करत असल्याचे संकेत मिळाले आहेत. या संकेतानुसार शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपा नेतृत्वाखालील एनडीए म्हणजेच राष्ट्रीय लोकशाही आघाडीसोबत जाणार हे आता निश्चित मानले जात आहे. खा. शरद पवार काही अटी आणि शर्थींसह केंद्र सरकारला बाहेरून पाठिंबा देणार असल्याची चर्चा महाराष्ट्रासह दिल्लीच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. गेले अनेक दिवस शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी पक्ष आणि अजितदादांच्या पक्षाचे विलिनीकरणाच्या हालचाली सुरू आहेत. अजित पवार हयात असताना दोन पक्षांचे विलिनीकरण जवळपास झाल्यात जमा होते. १२ फेबु्रवारी २०२६ ही तारीखही ठरली होती. मात्र अचानक २८ जानेवारी २०२६ रोजी अजितदादांचे अपघाती निधन झाल्यामुळे हा मुहूर्त टळला. अजितदादा गेल्यानंतर त्यांच्या पक्षातील काही नेत्यांनी विलिनीकरणाबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही, अशी भुमिका घेतली. त्यानंतर ही भुमिका पुन्हा बदलली आणि विलिनीकरणाबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली. अजूनही दोन्ही पक्षांकडून अधिकृतपणे विलिनीकरण होणार नाही अशी भुमिका स्पष्टपणे मांडली जात नाही. याबाबतीत दोन्ही पक्ष ‘तळ्यात मळ्यात ’खेळ खेळत आहेत. त्यामुळे विलिनीकरण होईल की नाही? याबाबत केवळ चर्चाच सुरू आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शरद पवारांच्या पक्षामध्ये विलिनीकरणास अनेकांचा आता विरोध असल्याचे दिसते. विलिनीकरण व्हावे आणि त्यानंतर सत्तेसोबत म्हणजेच केंद्रात सत्तेवर असलेल्या भाजपा नेतृत्वाखालील एनडीएमध्ये जावे, असा प्रस्ताव होता. मात्र, जर भाजपासोबत जायचे असेल तर त्यासाठी दोन पक्षांच्या विलिनीकरणाची गरज काय? आपण आपला पक्ष अबाधित ठेवून थेट एनडीएमध्ये प्रवेश करू शकतो असा प्रस्ताव शरद पवारांच्या अनेक नेत्यांनी बैठकीत मांडल्याची चर्चा सुरू आहे. तर रोहित पवार,रोहित पाटील यांच्यासारखे युवा आमदार भाजपासोबत जाण्यास आणि विलिनीकरणासही तयार नाहीत. एकंदरीत विलिनीकरणाच्या मुद्द्यावर शरद पवारांच्या पक्षामध्ये ४ मतप्रवाह आहेत. मात्र अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार शरद पवारांनाच आहेत. शरद पवार यांनी एनडीए सोबत यावे यासाठी भाजपकडून गेले वर्ष- दीड वर्ष संपर्क सुरू आहे. शरद पवार आणि पंतप्रधान मोदी यांचे संबंध चांगले असून त्यामाध्यमातून पवारांनी एनडीएमध्ये सामिल व्हावे, त्याबदल्यात केंद्रात मंत्रीपद आणि राज्य मंत्रिमंडळातही समावेश, असा प्रस्ताव भाजपने पवारांसमोर ठेवला असल्याचे वृत्त आहे. गेले अनेक दिवस याबाबत चर्चा झाल्या. भेटीगाठी झाल्या. फोनवर बोलणी झाली. सुप्रीया सुळे यांची आणि अमित शाहांची भेटही झाली. या सर्व भेटीगाठी विलिनीकरणासाठी नसल्याचे प्रत्येक नेत्याने स्पष्टपणे माध्यमांना सांगितले. मात्र एनडीएसोबत जाण्यासंदर्भात काही चर्चा झाली का? या प्रश्नाचे उत्तर मात्र शरद पवारांच्या पक्षाचे नेते थेटपणे देत नाहीत. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी आता एनडीएसोबत जाण्याचा मार्ग निवडला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. एनडीएला मुद्द्यावर आधारित पाठिंबा देण्याचा निर्णय पवार यांनी घेतला असून केंद्र सरकारलाही काही अटी आणि शर्थींवर बाहेरून पाठिंबा देण्याचा विचार शरद पवार करत असल्याचे बोलले जाते.

टाईम्स स्पेशल

पवारांनी एनडीएसोबत जाण्याचे संकेत स्पष्टपणे दिले आहेत. त्यासाठी मतदारसंघ फेररचना म्हणजेच परिसीमन विधेयकाबाबत एक तोडगा काढण्यात आला असून सर्व राज्यांमध्ये लोकसभेच्या सध्या जितक्या जागा आहेत, त्याच्या ५०% जागा वाढवून मतदारसंघांची फेररचना करण्याचा हा तोडगा असून तो शरद पवारांच्या पक्षाला मान्य असल्याचे सुप्रीया सुळे यांनी आडूनआडून संकेत दिले आहेत. हे विधेयक लोकसभेत मंजूर व्हावे यासाठी ३६१ मतांची गरज आहे. १७ एप्रिल २०२६ ला जेव्हा दोन तृतीयांश बहुमता अभावी विधेयक मंजूर होवू शकले नाही, तेव्हा ६२ मते कमी होती. दरम्यानच्या काळात ममता बॅनर्जींचा तृणमुल काँग्रेस पक्ष फुटला. २० खासदारांनी वेगळा गट स्थापन करून एनडीएला साथ दिली आहे. महाराष्ट्रात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ६ खासदार शिंदेंच्या शिवसेनेत आले आहेत. आता शरद पवारांच्या पक्षाचे ८ खासदारही एनडीएसोबत येणार असल्याची चर्चा सुरू आहे. अन्य काही खासदारांच्या संपर्कात अमित शाहा स्वतः आहेत. तामिळनाडूत काँग्रेसने आपल्यासोबत विधानसभा निवडणूक लढवली मात्र ऐनवेळी सत्तेसाठी विजयन यांच्या पक्षाला पाठिंबा दिल्याने द्रमुक नाराज आहे. द्रमुकने काँग्रेस नेतृत्वाखालील इंडिया आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचे १८ खासदार आहेत. त्यांचा मुद्द्यावर आधारित पाठिंबा एनडीएला मिळावा यासाठी स्वतः शरद पवार प्रयत्न करत आहेत. एकंदरीत परिसीमन विधेयकाच्या निमित्ताने शरद पवारांनी एनडीएसोबत जाण्याचा आणि केेंद्र सरकारला सर्शत मुद्द्यावर आधारित बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असल्याची चर्चा असून त्यानिमित्ताने नवीन समिकरणे जुळताना दिसत आहेत. येत्या आठवडाभरात याबाबतचे चित्र स्पष्ट होईल अशी अपेक्षा आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg