loader
Breaking News
Breaking News
Foto

उमरे धरणाच्या गळतीवर तात्पुरता उपाय; जाकवेळजवळ दगडमातीचा बंधारा उभारण्यास सुरुवात, आमदार शेखर निकम यांच्या सहकार्यातून जेसीबी उपलब्ध

संगमेश्वर (सत्यवान विचारे) - संगमेश्वर तालुक्यातील उमरे धरणाला गेल्या पाच वर्षांपासून लागलेली गळती तातडीने रोखणे शक्य नसल्याने, संभाव्य पाणीटंचाईवर तात्पुरता उपाय म्हणून आमदार शेखर निकम यांच्या सहकार्यातून उमरे-जाकवेळजवळ दगडमातीचा बंधारा उभारण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असल्याने आगामी उन्हाळ्यात दहा गावांवर पाणीटंचाईचे संकट ओढवण्याची भीती व्यक्त होत आहे. उमरे धरणाला गेल्या पाच वर्षांपासून गळती लागली असून, यातून दर सेकंदाला लाखो लिटर पाणी वाया जात असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. ही परिस्थिती कायम राहिल्यास डिसेंबरपासूनच परिसरातील दहा गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे धरणाची गळती रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत होती.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या गंभीर समस्येकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र पोमेंडकर यांच्या माध्यमातून आमदार शेखर निकम यांचे लक्ष वेधण्यात आले. ग्रामस्थांची अडचण लक्षात घेऊन आमदार निकम यांनी स्वखर्चाने जेसीबी उपलब्ध करून दिला. त्यानंतर धरणाच्या खालच्या बाजूस जाकवेळजवळ दगडमातीचा तात्पुरता बंधारा उभारण्याचे काम सुरू झाले आहे. दरम्यान, या पाणीटंचाईवर कोणत्या उपाययोजना करता येतील, यासाठी कसबा पंचायत समिती गणाचे विद्यमान सदस्य सुरेश माईन गेल्या दोन दिवसांपासून प्रत्यक्ष धरणस्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घेत होते. यावेळी त्यांनी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक आणि ग्रामस्थांशी चर्चा करून धरणाची गळती थांबविण्यासाठी काय करता येईल याचा आढावा घेत होते. या उपाययोजनेमुळे पाण्याचा अपव्यय काही प्रमाणात रोखता आल्यास जानेवारीपासून जाणवू शकणार्‍या पाणीटंचाईची तीव्रता कमी होण्यास तसेच संकट काही महिने पुढे ढकलण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

टाईम्स स्पेशल

बंधार्‍याच्या कामाला सुरुवात झाली, त्यावेळी पंचायत समिती सदस्य सुरेश माईन, फणसवणेच्या सरपंच उषाताई गुरव, उपसरपंच बंड्याशेठ नागवेकर, कळंबस्ते ग्रामपंचायतीचे सदस्य राजूशेठ पाटील, उमरे ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष महेंद्र जाधव, राजु तांबे, भरत मोहिते तसेच पाणीपुरवठा योजनेचे कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. आमदार शेखर निकम यांच्या सहकार्यामुळे तात्पुरत्या उपाययोजनेला गती मिळाली असून, परिसरातील दहा गावांतील ग्रामस्थांना तूर्तास दिलासा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. मात्र, तात्पुरत्या बंधार्‍यामुळे कितपत पाणी अडवता येईल आणि धरणाची कायमस्वरूपी गळती कधी रोखली जाणार, हा प्रश्न अद्याप कायम आहे. त्यामुळे प्रशासनाने धरणाच्या गळतीवर कायमस्वरूपी उपाययोजना करून दहा गावांचा पाणीपुरवठा सुरक्षित करण्याची गरज व्यक्त होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg