loader
Breaking News
Breaking News
Foto

रस्ता रुंदीकरणात कोणाचेही नुकसान होऊ देणार नाही : उदय सामंत

रत्नागिरी : शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी प्रशासनाने रस्ता रुंदीकरणाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला असला, तरी या प्रक्रियेत एकाही नागरिकाचे किंवा व्यापाऱ्याचे आर्थिक नुकसान होऊ देणार नाही, अशी ठाम ग्वाही राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी दिली आहे. शहराच्या विकासासोबतच सर्वसामान्यांच्या हिताचे रक्षण करणे हेच शासनाचे धोरण असल्याचे स्पष्ट करत, त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना तशा कडक सूचना दिल्या आहेत. शहरातील अत्यंत वर्दळीच्या समजल्या जाणाऱ्या स्वातंत्र्य लक्ष्मी चौक ते तेली आळी नाका या मार्गाच्या रुंदीकरणाची त्यांनी प्रत्यक्ष पायी चालत पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

रत्नागिरी शहराचा झपाट्याने विस्तार होत असल्याने बाजारपेठेतील वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परिणामी, स्वातंत्र्य लक्ष्मी चौक ते तेली आळी नाका या मार्गावर दररोज वाहतूक कोंडीची मोठी समस्या निर्माण होते. यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी प्रशासनाने रस्ता रुंदीकरणाचा आराखडा तयार केला आहे. या कामाची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी पालकमंत्री सामंत यांनी संबंधित विभागाचे अधिकारी, अभियंते आणि स्थानिक लोकप्रतिनिधींसह संपूर्ण मार्गाची पायी फिरून पाहणी केली. यावेळी त्यांनी रस्त्याची नियोजित रुंदी, बाधित होणारी घरे, दुकाने आणि अतिक्रमणे याबाबत अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली. या पाहणीदरम्यान स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांनी पालकमंत्र्यांची भेट घेऊन आपल्या शंका आणि अडचणी मांडल्या. रस्ता रुंदीकरणामध्ये घरे किंवा दुकाने गेल्यास मोठे आर्थिक नुकसान होईल, अशी भीती अनेक जागा मालकांनी व्यक्त केली.

टाईम्स स्पेशल

यावर ना. सामंत यांनी त्यांना धीर देत आश्वस्त केले की, शहराचा विकास करताना कोणालाही बेघर केले जाणार नाही किंवा कोणाच्याही पोटावर पाय दिला जाणार नाही. ज्या जागा मालकांची मालमत्ता या प्रकल्पात बाधित होणार आहे, त्यांना नियमानुसार जादा एफएसआय (FSI) किंवा जमिनीचा योग्य व समाधानकारक आर्थिक मोबदला देऊन पूर्णपणे न्याय दिला जाईल. प्रशासनाने कोणतीही घाई न करता सर्वप्रथम बाधित होणाऱ्या जागा मालकांना विश्वासात घ्यावे. त्यांच्याशी थेट संवाद साधून आणि सामंजस्याने मार्ग काढूनच पुढील कार्यवाही करावी, असे स्पष्ट निर्देशही पालकमंत्र्यांनी यावेळी दिले. सर्वसामान्यांच्या हिताला प्राधान्य देत हे रुंदीकरणाचे काम दर्जेदार आणि विहित वेळेत पूर्ण व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पालकमंत्र्यांच्या या प्रत्यक्ष पाहणीमुळे आणि सकारात्मक भूमिकेमुळे स्थानिक नागरिक व व्यापारी वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg