loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयच ‘व्हेंटिलेटर’वर, डॉक्टरांची ८६ पैकी तब्बल ६७ पदे रिक्त!

​रत्नागिरी (जमीर खलफे): रत्नागिरी जिल्ह्यातील गोरगरीब आणि सर्वसामान्य रुग्णांचा मुख्य आधार असलेले जिल्हा शासकीय रुग्णालय सध्या स्वतःच ‘व्हेंटिलेटर’वर असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. रुग्णालयात डॉक्टरांची मोठ्या प्रमाणावर कमतरता असल्याने रुग्णांना उपचारांअभावी कोल्हापूर किंवा मुंबईला हलवण्याचा सल्ला दिला जात आहे. या गंभीर परिस्थितीची दखल लोकप्रतिनिधींनी तात्काळ घ्यावी, अन्यथा रुग्णालयाचे गेट बंद करावे लागेल, असा तीव्र इशारा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या युवासेनेचे माजी जिल्हाप्रमुख प्रसाद सावंत यांनी दिला आहे. ​जिल्हा शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांच्या मंजूर आणि रिक्त पदांची अधिकृत आकडेवारी समोर आली असून, ती अत्यंत चिंताजनक आहे. शासन निर्णय reनुसार या रुग्णालयात डॉक्टरांची एकूण ८६ पदे मंजूर करण्यात आली आहेत. मात्र, प्रत्यक्षात केवळ १९ डॉक्टर कार्यरत असून तब्बल ६७ पदे रिक्त आहेत. रुग्णालयातील गट-अ मधील प्राध्यापकांची २० पदे मंजूर असताना केवळ जनऔषधवैद्यकशास्त्र विभागाचे एकच पद भरले गेले आहे, तर उर्वरित १९ विभागांतील प्राध्यापकांची पदे रिकामी आहेत. यामध्ये शल्यचिकित्साशास्त्र, स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र, बालरोगचिकित्साशास्त्र, अस्थिव्यंगोपचारशास्त्र, नेत्रशल्यचिकित्साशास्त्र, कान-नाक-घसा शास्त्र, बधिरिकरणशास्त्र, मनोविकृतीशास्त्र, क्ष-किरणशास्त्र, त्वचा व गुप्तरोगशास्त्र, छाती व क्षयरोगशास्त्र, शरीररचनाशास्त्र, शरीरक्रियाशास्त्र, जीवरसायनशास्त्र, औषधशास्त्र, विकृतीशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, न्यायवैद्यकीशास्त्र आणि औषधवैद्यकशास्त्र या महत्त्वाच्या विभागांचा समावेश आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तसेच, गट-अ मधील सहयोगी प्राध्यापकांच्या मंजूर २६ पदांपैकी केवळ चार नियमित आणि दोन कंत्राटी असे एकूण सहा डॉक्टर कामावर असून २० पदे रिक्त आहेत. या गटात शरीरक्रियाशास्त्र, जीवरसायनशास्त्र, न्यायवैद्यकीशास्त्र, जनऔषधवैद्यकशास्त्र, औषधवैद्यकशास्त्र, स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र, बालरोगचिकित्साशास्त्र, अस्थिव्यंगोपचारशास्त्र, नेत्रशल्यचिकित्साशास्त्र, बधिरिकरणशास्त्र, मनोविकृतीशास्त्र, क्ष-किरणशास्त्र, त्वचा व गुप्तरोगशास्त्र, आपत्कालीन चिकित्साशास्त्र आणि दंतशास्त्र या विभागांत डॉक्टर उपलब्ध नाहीत. याशिवाय गट-ब मधील सहाय्यक प्राध्यापकांच्या ४० मंजूर पदांपैकी चार नियमित आणि सात कंत्राटी असे ११ डॉक्टर कार्यरत असून २९ पदे रिकामी आहेत. यामध्ये जीवरसायनशास्त्र, औषधशास्त्र, विकृतीशास्त्र, न्यायवैद्यकीशास्त्र, जनऔषधवैद्यकशास्त्र, बालरोगचिकित्साशास्त्र, कान-नाक-घसा शास्त्र, बधिरिकरणशास्त्र, मनोविकृतीशास्त्र, त्वचा व गुप्तरोगशास्त्र, छाती व क्षयरोगशास्त्र आणि आपत्कालीन चिकित्साशास्त्र हे विभाग पूर्णपणे रिकामे आहेत. रुग्णालयातील या भयावह परिस्थितीचा थेट फटका जिल्ह्यातील गरीब आणि गरजू रुग्णांना बसत आहे.

टाईम्स स्पेशल

जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना बालरोग, स्त्रीरोग, हाडांचे विकार, डोळे आणि कान-नाक-घशाचे तज्ज्ञ डॉक्टरच मिळत नाहीत. इतकेच नव्हे तर आपत्कालीन विभागातही डॉक्टरांची वानवा असल्याने रुग्णांना नाइलाजाने खासगी रुग्णालयांत जाऊन हजारो रुपये खर्च करावे लागत आहेत किंवा पुढील उपचारांसाठी कोल्हापूर आणि मुंबईचा रस्ता धरावा लागत आहे. रुग्णालयात डॉक्टरच उपलब्ध नसतील, तर हे रुग्णालय सुरू तरी कशाला ठेवले आहे, असा संतप्त सवाल प्रसाद सावंत यांनी उपस्थित केला आहे. ​पालकमंत्री उदय सामंत हे गेल्या पाच टर्मपासून या तालुक्याचे प्रतिनिधित्व करत आहेत, मात्र त्यांना अद्याप जिल्हा शासकीय रुग्णालयाची दुरवस्था सुधारता आलेली नाही, याची खंत वाटत असल्याचे सावंत यांनी म्हटले आहे. गेल्या टर्ममध्ये जे झाले ते सोडून द्या, पण किमान या टर्ममध्ये तरी पालकमंत्र्यांनी जिल्हा रुग्णालयाची ही वाताहत थांबवावी आणि गोरगरीब जनतेला होणारा त्रास व आर्थिक भुर्दंड यातून मुक्त करावे, अशी भावनिक साद त्यांनी घातली आहे. ही केवळ कागदावरील आकडेवारी नसून रत्नागिरी जिल्हा रुग्णालयातील रोजची जिवंत वस्तुस्थिती आहे. त्यामुळे शासनाने ही सर्व ६७ रिक्त पदे तात्काळ भरावीत, अन्यथा शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा प्रसाद सावंत यांनी दिला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg