loader
Breaking News
Breaking News
Foto

आनंददायी शनिवार’ उपक्रमांतर्गत सरफरे विद्यालयाची काष्ठशिल्प कला दालनाला अविस्मरणीय क्षेत्रभेट

बुरंबी (संगमेश्वर) - येथील दादासाहेब सरफरे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना पुस्तकांच्या चौकटीबाहेरचे अनुभवाधारित शिक्षण मिळावे, त्यांच्या निरीक्षणशक्तीला, कल्पकतेला आणि सर्जनशीलतेला चालना मिळावी, तसेच स्थानिक कला, कलाकार आणि निसर्ग यांच्याशी त्यांचे नाते अधिक दृढ व्हावे, या उद्देशाने पंचक्रोशी शिक्षण संस्था बुरंबी—शिवनेच्या वतीनेआनंददायी शनिवार’ उपक्रमांतर्गत ते-ये गावातील सुप्रसिद्ध काष्ठशिल्प कलावंत दिलीप म्हैसकर यांच्या काष्ठशिल्प कला दालनाला विद्यार्थ्यांची आगळीवेगळी क्षेत्रभेट आयोजित करण्यात आली. काष्ठशिल्प क्षेत्रभेटीमध्ये विद्यार्थ्यांना केवळ कलाकृती पाहण्याची संधी मिळाली नाही, तर कलेचा प्रत्यक्ष अनुभव घेता आला. काष्टशिल्पकार दिलीप म्हैसकर यांनी लाकडापासून साकारलेल्या विविध आकर्षक काष्ठशिल्पांचे विद्यार्थ्यांनी बारकाईने निरीक्षण केले. प्रत्येक कलाकृतीमागील कल्पना, निर्मिती प्रक्रिया, कलात्मक कौशल्य आणि त्यासाठी घेतलेली मेहनत याविषयी विद्यार्थ्यांनी उत्सुकतेने माहिती जाणून घेतली. विद्यार्थ्यांनी म्हैसकर यांची प्रत्यक्ष मुलाखत घेऊन त्यांच्या कलाप्रवासाविषयी, काष्ठशिल्प निर्मितीविषयी आणि विविध कलात्मक प्रयोगांविषयी प्रश्न विचारले. या संवादातून विद्यार्थ्यांना एका कलाकाराच्या अनुभवविश्वाची जवळून ओळख झाली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी म्हैसकर यांनी विद्यार्थ्यांसमोर सादर केलेले अनोखे निसर्गप्रयोग! त्यांनी आपल्या विशिष्ट आवाजाच्या माध्यमातून पक्ष्यांना साद घालून एकत्र बोलावण्याचा प्रयोग विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष करून दाखविला. त्यांच्या आवाजाला प्रतिसाद देत पक्षी एकत्र येण्याचा हा विलक्षण अनुभव पाहून विद्यार्थी भारावून गेले. कला, निसर्ग आणि मानवी निरीक्षणशक्ती यांचा अद्भुत संगम विद्यार्थ्यांना अनुभवता आला. निसर्गाशी संवाद साधण्याची ही अनोखी पद्धत विद्यार्थ्यांसाठी कुतूहलाचा आणि आनंदाचा विषय ठरली. तसेच दिलीप म्हैसकर यांनी विद्यार्थ्यांसमोर सादर केलेले हातचलाखीचे विविध जादुई प्रयोग! आपल्या कौशल्यपूर्ण हातचलाखीने त्यांनी विद्यार्थ्यांना अनेक आश्चर्यकारक प्रयोग करून दाखविले. या प्रयोगांमधील कल्पकता, चातुर्य आणि कौशल्य पाहून विद्यार्थी अक्षरशः थक्क झाले. प्रत्येक प्रयोगानंतर विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावर उमटणारे आश्चर्य, कुतूहल आणि आनंद यामुळे कार्यक्रमाला एक वेगळीच रंगत आली मनोरंजनाबरोबरच एकाग्रता, बारकाईने निरीक्षण करणे आणि कौशल्यपूर्ण सादरीकरण यांचे महत्त्वही विद्यार्थ्यांना या प्रयोगांतून अनुभवता आले. या क्षेत्रभेटीला आणखी एक भावस्पर्शी आणि अभिमानास्पद क्षण लाभला.

टाईम्स स्पेशल

शाळेतील विद्यार्थिनी सावनी बाईत हिने स्वतः तयार केलेले एक सुंदर काष्ठशिल्पाचे चित्र दिलीप म्हैसकर यांना भेट म्हणून दिले. विद्यार्थिनीच्या या कलात्मक कृतीचे आणि सर्जनशीलतेचे उपस्थितांनी कौतुक केले. विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना योग्य व्यासपीठ मिळाल्यास ते कशा प्रकारे फुलू शकतात, याचे हे सुंदर उदाहरण ठरले. यावेळी आनंददायी शनिवार विभाग प्रमुख विभागप्रमुख उपशिक्षक स्वरा शिंदे, दिलीप बरड, राकेश बांद्रे आणि स्वरूपा भोसले उपस्थित होते. या सर्वांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. निसर्गरम्य परिसर, विविध काष्ठशिल्प कलाकृती, पक्ष्यांचा किलबिलाट, कलाकारांचे अनुभव, प्रत्यक्ष मुलाखती आणि जादुई प्रयोग यांमुळे विद्यार्थ्यांचा हा दिवस खर्‍या अर्थाने आनंददायी व अविस्मरणीय ठरला. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी दिलीप म्हैसकर यांच्या अनुभवसमृद्ध ज्ञान याबद्दल शाळेच्या व संस्थेच्या वतीने विद्यालयाचे प्राचार्य प्रकाश विरकर यांनी त्यांचे विशेष आभार मानले व त्यांस सन्मानपूर्वक आभारपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन कृतज्ञता व्यक्त केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg