loader
Breaking News
Breaking News
Foto

मालवण परिसरातील साहित्यिकांचा सिंधुदुर्ग जिल्हा युवा साहित्य संमेलनात होणार सन्मान

मालवण (प्रतिनिधी) - मालवण परिसरातील साहित्य, कला, पत्रकारिता, शिक्षण आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या १९ साहित्यिकांचा सिंधुदुर्ग जिल्हा युवा साहित्य संमेलन - २०२६ मध्ये विशेष सन्मान करण्यात येणार आहे. याचबरोबर मालवणमधील तीन वाचनालयांच्या माध्यमातून आदर्श बाल वाचक आणि आदर्श मोठा वाचक यांचाही गौरव करण्यात येणार आहे. बॅ. नाथ पै सेवांगण, मालवण येथे २८ व २९ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभाग आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांच्या अनुदानातून या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘माझा काळ, माझी भूमिका’ ही संमेलनाची मध्यवर्ती संकल्पना आहे. ग्रंथदिंडी, स्थानिक कवी संमेलन, निमंत्रित कवी संमेलन, मुलाखती, विविध साहित्यिक स्पर्धा आणि वैचारिक कार्यक्रम असे संमेलनाचे स्वरूप असणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या संमेलनात मालवण परिसरातील साहित्यिकांचा सन्मान करताना त्यांच्या साहित्यिक, सांस्कृतिक आणि सामाजिक योगदानाची दखल घेतली जाणार आहे. यामध्ये मालवणी व मराठीत विपुल साहित्य लेखन करणारे ज्येष्ठ साहित्यिक अरविंद म्हापणकर, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिले एम.डी. डॉक्टर आणि आरोग्य विषयक लेखन करणारे डॉ. विवेक रेडकर, ज्येष्ठ साहित्यिक, सेवानिवृत्त शिक्षक आणि कोकण मराठी साहित्य परिषद, मालवण शाखेचे तालुकाध्यक्ष रवींद्र वराडकर, ज्येष्ठ साहित्यिका व ऐलमा पैलमा अक्षरदेवा’ या उपक्रमाच्या संस्थापक वैशाली पंडित, ‘कोकणच्या बहिणाबाई’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कवयित्री आणि निवृत्त शिक्षिका संध्या शिवराम तांबे, मालवणी, कोकणी, मराठी आणि हिंदी भाषांमध्ये साहित्यनिर्मिती करणारे रुजारिओ पास्कॉल पिंटो, सेवानिवृत्त शिक्षक, लेखक व नाट्य समीक्षक विनायक प्रल्हाद कोळंबकर, सेवानिवृत्त शिक्षिका, समुपदेशक आणि बालसाहित्य लेखिका मेघना संजय जोशी, ज्येष्ठ पत्रकार, ग्रंथपाल, नाट्य दिग्दर्शक व एकांकिका लेखक प्रफुल्ल वसंत देसाई, कवी, गीतकार, संगीतकार, गायक आणि शीघ्रकवी मंदार श्रीकांत सांबारी, कवी, कथालेखक, शिक्षक आणि कातळशिल्प अभ्यासक कमलेश विनायक गोसावी, कवयित्री आणि लेखिका शुभदा (तनुश्री) राजेश पेडणेकर, लेखक आणि कांदळगाव या गावाचा इतिहास, संस्कृती आणि परंपरा यांचे दस्तऐवजीकरण करणारे उमेश दिनकर कोदे, पत्रकार, संपादक आणि लेखक सुयोग श्रीनिवास पंडित, मालवणी नाट्यलेखक व नाटककार संदीप दत्ताराम चिपकर, शिक्षण, साहित्य आणि बालनाट्य क्षेत्रात दीर्घकाळ योगदान देणारे कोकण मराठी साहित्य परिषद, मालवण आणि साने गुरुजी कथामाला, मालवणचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक सुरेश ठाकूर, दूरचित्रवाणी पत्रकार आणि वृत्तनिवेदक तसेच एकांकिका लेखक, नाट्य कलाकार तसेच विविध विषयांवर लेखन करणारे ऋषी श्रीकांत देसाई, साप्ताहिक ‘जनयुग’चे संपादक, ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र खांडाळेकर, साप्ताहिक आघाडीचे संपादक व ज्येष्ठ पत्रकार नंदकिशोर महाजन यांचा सन्मान होणार आहे.

टाईम्स स्पेशल

वाचनसंस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी मालवणमधील तीन वाचनालयांच्या माध्यमातून आदर्श बाल वाचक आणि आदर्श मोठा वाचक यांची निवड करण्यात आली आहे. त्यांचा संमेलनात विशेष सन्मान करण्यात येणार आहे. यामध्ये शिवाजी वाचन मंदिर- बाल वाचक- हिमांशू संतोष मालवणकर, मोठा गट - अनंत महादेव अंधारी, नगर वाचन मंदिर - मोठा गट- प्रफुल कमलाकर गवंडे, बाल गट- अस्मि अशोक आठल्येकर, बॅ. नाथ पै सेवांगण संचलित साने गुरुजी वाचन मंदिर- बाल गट - सोहम धामापूरकर - मोठा गट- चंद्रप्रकाश पिंगुळकर या वाचकांचा सन्मान होणार आहे. साहित्यिकांचा सन्मान आणि आदर्श वाचकांचा गौरव अशा दोन्ही उपक्रमांतून मालवणच्या साहित्यिक आणि वाचनसंस्कृतीचा गौरव होणार आहे. नव्या पिढीला साहित्य, वाचन आणि सर्जनशील अभिव्यक्तीकडे प्रवृत्त करणे, तसेच स्थानिक साहित्यिकांच्या कार्याची समाजासमोर ओळख करून देणे, हा या संमेलनामागील महत्त्वाचा उद्देश आहे, असे आयोजकांतर्फे सांगण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg