loader
Breaking News
Breaking News
Foto

पडवे जि. प. गटात महासंग्राम; नाटेकर विरुद्ध बाईत थेट भिडत, संपूर्ण राजकीय यंत्रणा मैदानात

वेळणेश्वर (उमेश शिंदे) - पडवे जिल्हा परिषद गटात यावेळी निवडणूक नसून सत्तेचा आणि अस्तित्वाचा थेट संघर्ष पाहायला मिळणार आहे. महायुतीकडून माजी जिल्हा परिषद सदस्य व माजी जिल्हा उपाध्यक्ष महेश नाटेकर आणि महाविकास आघाडीकडून सचिन बाईत हे दोन्ही ताकदवान चेहरे थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने पडवे गटात राजकीय भूकंपाचे वातावरण निर्माण झाले आहे. ही लढत केवळ स्थानिक पातळीवर मर्यादित न राहता तालुका आणि जिल्हा पातळीवरील राजकारणाची दिशा ठरवणारी ठरणार आहे. महायुतीचे उमेदवार महेश नाटेकर हे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष म्हणून ओळखले जातात. प्रशासनाचा अनुभव, सत्ताकेंद्राशी असलेली जवळीक आणि विकासकामांचा दावा यांच्या जोरावर महायुतीने पुन्हा एकदा त्यांना रणांगणात उतरवले आहे. अनुभवी आणि मुरलेला नेता म्हणून नाटेकरांची ओळख असली तरी यावेळी त्यांच्यासमोरचे आव्हान सोपे नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दुसरीकडे, महाविकास आघाडीचे उमेदवार सचिन बाईत हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख असून पडवे गटात ते एक आक्रमक, जमिनीवर काम करणारा आणि संघटन उभं करणारा नेता म्हणून पुढे आले आहेत. गावोगावी थेट संपर्क, कार्यकर्त्यांना सोबत घेऊन केलेला झंझावाती प्रचार आणि “ठाकरे नावाशी निष्ठा” हा त्यांचा मोठा राजकीय भांडवल ठरत आहे. सामान्य मतदार, युवक आणि महिलांमध्ये सचिन बाईत यांची पकड वाढताना दिसत असून, पडवे गटात सत्तेविरोधी वातावरणाला त्यांनी धार दिली आहे. सचिन बाईत यांनी गेल्या काळात पडवे गटात सातत्याने जनसंपर्क ठेवत लोकांच्या प्रश्नांना वाचा फोडली आहे. रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण अशा मूलभूत प्रश्नांवर त्यांनी आक्रमक भूमिका घेतली असून, “काम करणारा आणि लढणारा नेता” अशी त्यांची प्रतिमा तयार झाली आहे. केवळ भाषणांपुरते नव्हे तर प्रत्यक्ष मैदानात उतरून संघर्ष करणारा नेता म्हणून कार्यकर्त्यांमध्ये त्यांना प्रचंड पाठिंबा मिळत आहे. ठाकरे गटाचा चेहरा म्हणून सचिन बाईत यांच्यावर ही निवडणूक जिंकण्याची मोठी जबाबदारी असून, त्यांनी ती आव्हानात्मक जबाबदारी स्वीकारत थेट रणशिंग फुंकले आहे.

टाइम्स स्पेशल

या लढतीत दोन्ही बाजूंनी शक्तिप्रदर्शन, आरोप-प्रत्यारोप आणि प्रचारयुद्ध तीव्र होत चालले आहे. अनुभवाच्या जोरावर विजय मिळवण्याचा महायुतीचा प्रयत्न, तर बदल आणि आक्रमक नेतृत्वाच्या जोरावर सत्ता उलथवण्याचा महाविकास आघाडीचा निर्धार—या दोन प्रवाहांची थेट टक्कर पडवे जिल्हा परिषद गटात पाहायला मिळणार आहे. पडवेचा निकाल हा केवळ एका गटाचा निर्णय नसून, तो आगामी राजकारणाची दिशा ठरवणारा आणि दोन्ही आघाड्यांच्या प्रतिष्ठेचा निकाल ठरणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg