loader
Breaking News
Breaking News
Foto

देवगडच्या जि.प. पूर्ण प्राथमिक शाळा कसबा वाघोटणचा राज्यात डंका

देवगड (प्रतिनिधी) - सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी अभिमानाची बाब ठरावी असे यश जि.प. पूर्ण प्राथमिक शाळा, कसबा वाघोटण या शाळेने संपादन केले आहे. १५ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय शालेय रोबोटिक्स इनोव्हेशन चॅलेंज २०२६ स्पर्धेत कसबा वाघोटण शाळेने जिल्हा परिषद शाळा गटातून राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. रोबोटिक्स व तंत्रज्ञान क्षेत्रातील Robostorms Technology Pvt. Ltd. यांच्या तज्ज्ञ परीक्षण समितीमार्फत महाराष्ट्रातील सहभागी शाळांच्या प्रकल्पांचे परीक्षण करण्यात आले. अंतिम गुणवत्तेनुसार जाहीर करण्यात आलेल्या अधिकृत निकालात RTC-ZP-01 : जि.प. पूर्ण प्राथमिक शाळा, कसबा वाघोटण, जिल्हा सिंधुदुर्ग या शाळेची विजेता म्हणून निवड करण्यात आली आहे. याच गटात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जि.प. पूर्ण प्राथमिक शाळा, तोरसळे हिने उपविजेतेपद, तर सद्गुरू बालचंद्र महाराज विद्यालय, जि.प. शाळा कणकवली नं. ३ हिने तृतीय क्रमांक मिळविला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कसबा वाघोटण शाळेच्या विद्यार्थ्यांनी साकारलेल्या ‘मिशन तिरंगा : राष्ट्रध्वज ते अंतराळ’ या अभिनव प्रकल्पाने परीक्षकांचे लक्ष वेधून घेतले. या प्रकल्पामध्ये देशाचा राष्ट्रध्वज, अंतराळ संशोधन तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा कल्पक संगम विद्यार्थ्यांनी सादर केला. विद्यार्थ्यांच्या कल्पकता, तांत्रिक कौशल्य, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि नाविन्यपूर्ण विचारांचे या यशातून दर्शन घडले. या स्पर्धेत शाळेच्या ‘AI Robo Kids’ या विद्यार्थी संघाने सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या रोबोटिक्स व विज्ञानाधारित प्रतिकृतींसह प्रकल्पाचे प्रभावी सादरीकरण केले. अवघड वाटणाऱ्या तंत्रज्ञान विषयाची विद्यार्थ्यांनी कल्पक पद्धतीने मांडणी करत आपल्या कौशल्याची राज्यस्तरावर छाप पाडली. २० ऑगस्ट २०२६ रोजी जाहीर झालेल्या अधिकृत अंतिम निकालात कसबा वाघोटण शाळेला विजेता घोषित करण्यात आले. त्यामुळे देवगड तालुक्यासह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रात या यशाबद्दल आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

टाईम्स स्पेशल

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे तसेच शाळेतील विद्यार्थ्यांचे या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. ग्रामीण भागातील शाळेतील विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय व्यासपीठावर रोबोटिक्स आणि इनोव्हेशनच्या माध्यमातून मिळवलेले हे यश ‘ग्रामीण विद्यार्थ्यांमध्येही वैज्ञानिक आणि तांत्रिक कौशल्याची मोठी क्षमता आहे’ हे अधोरेखित करणारे ठरले आहे. कसबा वाघोटण शाळेच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे देवगड तालुक्याच्या शैक्षणिक लौकिकात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून, विद्यार्थ्यांच्या या यशामुळे इतर शाळांतील विद्यार्थ्यांनाही विज्ञान, रोबोटिक्स आणि नवकल्पनांच्या क्षेत्रात पुढे जाण्यास निश्चितच प्रेरणा मिळणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg