loader
Breaking News
Breaking News
Foto

विरारनगरीत रंगणार कोकणच्या पारंपरिक लोककलेचा जागर!

विरार (सचिन कुळये) - वसई, विरार आणि नालासोपारा परिसरातील कोकणवासीयांसाठी आनंदाची पर्वणी ठरणारा कोकणच्या समृद्ध पारंपरिक लोककलेचा आविष्कार लवकरच विरारनगरीत अनुभवायला मिळणार आहे. सप्तारंगी कोकण कलामंच मुंबई यांच्या वतीने कोकणाची संस्कृती, परंपरा आणि लोककलेचा वारसा जपणाऱ्या ‘नमन’ या पारंपरिक लोकनाट्याचा भव्य शुभारंभ प्रयोग आयोजित करण्यात आला आहे. हा प्रयोग शनिवार दि. २८ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ठीक ९.३० वाजता दीप प्रकाश मंगल कार्यालय, श्री स्वामी समर्थ नगर, वासुदेव पाटील मार्ग, नाना-नानी पार्क, विरार पूर्व येथे रंगणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

‘नमन’ म्हटलं की कोकणकरांच्या जणू दुसरा आत्माच! मृदंगाची थाप कानावर पडताच कोकणी माणसाचे पाय आपोआप थिरकू लागतात. अशाच या समृद्ध लोककलेचा वारसा जपत सप्तारंगी कोकण कलामंच यंदा रसिकांसाठी खास मनोरंजनाची मेजवानी घेऊन येत आहे. या प्रयोगात भक्तिमय गण, स्वांगडी आणि मावळ्यांच्या धमाल विनोदी सादरीकरणांनी रंगणारी गवळण तसेच सत्यघटनेवर आधारित हृदयस्पर्शी नाट्यकृती ‘वारसदार’ अशा विविध कलाविष्कारांची अनुभूती प्रेक्षकांना घेता येणार आहे. या कलामंचचे प्रमुख गणेश घेवडे असून, संकल्पना सुनील शिवराम घेवडे यांची आहे. दिग्दर्शन व नृत्यदिग्दर्शनाची जबाबदारी कैलास करिश्मा केशव सोलकर यांनी सांभाळली आहे. नाट्यलेखन मिलिंद रेश्मा विनायक ठीक यांनी, तर गवळण लेखन आकाश अनंत वेलदूर यांनी केले आहे. विशेष आकर्षण म्हणजे, सप्तारंगी कलामंचच्या अंतरंगी कलाकारांसोबत ‘चला हवा येऊ द्या’ फेम अनंत ठीक यांचीही धमाल जुगलबंदी रंगणार आहे. त्यामुळे या प्रयोगात विनोद आणि मनोरंजनाची रंगत आणखी वाढणार आहे.

टाईम्स स्पेशल

व्यवस्थापनाची धुरा सचिन कुळये, अमर वेलदूर, प्रकाश बारस्कर आणि संदेश शीतप सांभाळत आहेत. तसेच जितेंद्र शिंदे आणि दीपक मांडवकर, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते प्रमोद तरळ यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. कोकणच्या मातीतील ही पारंपरिक लोककला नव्या पिढीपर्यंत पोहोचावी, तिचे जतन आणि संवर्धन व्हावे, या उद्देशाने कलामंच सातत्याने प्रयत्नशील आहे. या उपक्रमाला रसिकांचे भरभरून प्रेम आणि सहकार्य मिळावे, तसेच वसई-विरार-नालासोपारा परिसरातील सर्व कोकणप्रेमींनी आपल्या कुटुंबीयांसह मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सांस्कृतिक सोहळ्याचा आनंद घ्यावा, असे आवाहन सप्तारंगी कोकण कलामंच मुंबईच्या वतीने करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg