loader
Breaking News
Breaking News
Foto

कोळंबे ज्युनिअर कॉलेजचे प्रा. प्रवीण कांबळे यांना 'कोकण विभाग गुणवंत शिक्षक पुरस्कार २०२६' जाहीर

संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यांतर्गत दिला जाणारा प्रतिष्ठित 'कोकण विभाग गुणवंत शिक्षक पुरस्कार २०२६' कोळंबे ज्युनिअर कॉलेजचे (श्रीमती कमळजाबाई पांडुरंग मुळये हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, कोळंबे, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) प्राध्यापक प्रवीण मधुकर कांबळे यांना जाहीर झाला आहे. संघटनेने २०२६ मध्ये मागवलेल्या प्रस्तावांची पुरस्कार समितीकडून सखोल छाननी करण्यात आली असून, प्रा. कांबळे यांच्या प्रदीर्घ शैक्षणिक, कृती संशोधनाचे व सामाजिक कार्याची दखल घेत त्यांची निवड करण्यात आली आहे व त्यांना 'सत्कारमूर्ती निवडपत्र' प्रदान करण्यात आले आहे. प्रा. प्रवीण मधुकर कांबळे हे गेल्या २० वर्षांपासून अध्यापनाचे कार्य अत्यंत निष्ठापूर्वक करत असून, या प्रदीर्घ काळात त्यांनी अनेक विद्यार्थी घडवले आहेत. अध्यापनासोबतच कृती संशोधनाच्या माध्यमातून शालेय व महाविद्यालयीन शिक्षणात नवनवीन उपक्रम राबवून ते विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत. तसेच, विविध सामाजिक कार्यांमध्येही त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

याशिवाय ते शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथील अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख व मानव्यविद्या शाखेचे अधिष्ठाता (डीन) प्रो. डॉ. एम. एस. देशमुख सर यांच्या मार्गदर्शनाखाली अर्थशास्त्र विषयात पीएच.डी. चे संशोधन करत आहेत. कोकणातील (रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील) फलोत्पादन अर्थव्यवस्थेचा अभ्यास हा त्यांच्या संशोधनाचा मुख्य विषय आहे. यामध्ये आंबा, काजू व नारळ यांसारख्या महत्त्वाच्या पिकांशी संबंधित उत्पादन खर्च, जीआय टॅगिंग, प्रक्रिया व मूल्यवर्धन, मजूरटंचाई, यांत्रिकीकरण आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यांसारख्या सर्वंकष पैलूंचा समावेश आहे. यासोबतच, विविध राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरावरील अर्थशास्त्र आणि सहकार परिषदांमध्ये त्यांनी आपले शोधनिबंध सादर करून अभ्यासपूर्ण मांडणी केली आहे. हा भव्य गुणवंत पुरस्कार सोहळा रविवार, दिनांक २९ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजता (निवडपत्रात १०:३० वाजेची वेळ नमूद आहे) 'माध्यमिक शिक्षक पतपेढी, रत्नागिरी' येथे मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार ज्ञानेश्वर बारकू म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून उद्योग मंत्री व रत्नागिरीचे पालकमंत्री ना. उदय सामंत, राज्यमंत्री ना. योगेश कदम, विधान परिषद आमदार प्रमोद जठार, राजापूर विधानसभा आमदार किरण सामंत, चिपळूण विधानसभा आमदार शेखर निकम यांच्यासह विविध मान्यवर व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

टाईम्स स्पेशल

या सोहळ्याचे निमंत्रण महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटना, मुख्याध्यापक संघ जिल्हा व तालुका पदाधिकाऱ्यांतर्फे देण्यात आले असून, सर्व संस्थाचालक, प्राचार्य, मुख्याध्यापक व शिक्षक-शिक्षकेतर बंधू-भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रा. प्रवीण मधुकर कांबळे यांच्या २० वर्षांच्या प्रदीर्घ शैक्षणिक प्रवासाचा व सामाजिक कार्याचा या निमित्ताने गौरव होत असल्याने संस्थेचे पदाधिकारी, मुख्याध्यापिका, सहकारी प्राध्यापक-शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, कोळंबे परिसरातील शिक्षणप्रेमी आणि ग्रामस्थांकडून त्यांचे सर्वत्र हार्दिक अभिनंदन होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg