loader
Breaking News
Breaking News
Foto

कळंबोलीच्या पाणीपुरवठ्याला नवी जलसंजीवनीचा आधार, आसूडगाव ते कळंबोली जंक्शन काम युद्धपातळीवर

पनवेल : कळंबोली वसाहतीतील गेल्या काही दिवसांपासून निर्माण झालेल्या तीव्र पाणीटंचाईवर मात करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. आसूडगाव ते कळंबोली जंक्शनदरम्यान नव्याने टाकण्यात आलेली जलवाहिनी कार्यान्वित करण्याचे काम मंगळवारी हाती घेण्यात आले. या जलवाहिनीमुळे कळंबोलीतील पाणीपुरवठ्याची क्षमता वाढण्यास मदत होणार असून, नागरिकांना भेडसावणाऱ्या पाणीटंचाईत काही प्रमाणात दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. कळंबोली वसाहतीमध्ये गेल्या काही दिवसांपासून पाणीपुरवठ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पाणी उपसा केंद्रातील मोटारपंपामध्ये झालेला बिघाड, महावितरणकडून वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा आणि कळंबोली उड्डाणपुलाखाली जुन्या जलवाहिनीमध्ये हवा पकडल्याने पाणीपुरवठ्याच्या व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला. त्यामुळे कळंबोलीच्या पाणीपुरवठ्यात सुमारे १५ एमएलडीची घट झाल्याचे सांगण्यात येत होते. परिणामी अनेक भागांमध्ये कमी दाबाने पाणी येणे, अनियमित पाणीपुरवठा आणि काही ठिकाणी पुरेशा प्रमाणात पाणी न मिळणे, अशा समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पाणीटंचाईमुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी नागरिकांनी सिडको कार्यालयावर मोर्चे काढून पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली होती. मात्र कळंबोलीचा पाणीपुरवठा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून होत असल्याने या प्रश्नाच्या कायमस्वरूपी उपायासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे पाठपुरावा करणे आवश्यक होते. ही बाब लक्षात घेऊन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक रामदास शेवाळे यांनी कळंबोलीतील नागरिकांसह महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उपअभियंता रमेश वायदंडे यांची भेट घेतली होती. कळंबोलीतील पाणीपुरवठ्याची सद्यस्थिती, नागरिकांना होत असलेला त्रास आणि जुन्या जलवाहिनीमुळे निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणी याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्याचबरोबर आसूडगाव ते कळंबोली जंक्शनदरम्यान नव्याने टाकण्यात आलेली जलवाहिनी तातडीने कार्यान्वित करण्याची मागणी करण्यात आली होती.

टाईम्स स्पेशल

या पाठपुराव्यानंतर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने नव्या जलवाहिनीचे काम सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार मंगळवारी प्रत्यक्ष कार्यवाहीला सुरुवात करण्यात आली. जलवाहिनी कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक तांत्रिक कामे करण्याकरिता शटडाऊन घेण्यात आला. सकाळपासूनच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांकडून आणि अधिकाऱ्यांकडून जलवाहिनी जोडणी व इतर आवश्यक कामे करण्यात येत होती. आसूडगाव ते कळंबोली जंक्शनदरम्यान टाकण्यात आलेली ही जलवाहिनी अर्ध्या किलोमीटरपेक्षा अधिक लांबीची आहे. जुन्या जलवाहिनीवरील तांत्रिक अडचणी आणि हवेचा अडथळा यामुळे पाणीपुरवठ्यावर होणारा परिणाम कमी करण्यासाठी ही नवी जलवाहिनी महत्त्वाची ठरणार आहे. नव्या जलवाहिनीतून पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर कळंबोलीकडे होणाऱ्या पाण्याच्या प्रवाहात सुधारणा होण्याची अपेक्षा आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg