loader
Breaking News
Breaking News
Foto

कोकण रेल्वे स्थानकावरील प्रवाशांचे हाल: प्लॅटफॉर्मवर निवारा शेड उभारण्याची प्रवाशांची जोरदार मागणी

सावंतवाडी (प्रतिनिधी) : कोकण रेल्वेच्या सावंतवाडी रोड स्थानकाला 'लोकमान्य प्रा. मधु दंडवते रेल्वे टर्मिनस' असे नाव देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. मात्र, टर्मिनसचा दर्जा मिळून आणि २५ वर्षांपेक्षा अधिक काळ उलटूनही या स्थानकावरील मूलभूत सुविधांचा प्रश्न अद्याप ऐरणीवरच आहे. विशेषतः प्लॅटफॉर्म वर पूर्ण क्षमतेची निवारा शेड नसल्याने कडक ऊन आणि मुसळधार पावसात प्रवाशांना प्रचंड हाल सोसावे लागत आहेत. या पार्श्वभूमीवर स्थानकावर तात्काळ निवारा शेड उभारण्यात यावी, अशी संतप्त मागणी प्रवासी आणि स्थानिक नागरिकांमधून केली जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

​कोकण रेल्वे प्रकल्पात महाराष्ट्र सरकारने सर्वाधिक आर्थिक हिस्सा गुंतवला असला, तरी कोकणातील रेल्वे स्थानकांना रेल्वे प्रशासनाकडून दुय्यम दर्जाची वागणूक दिली जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. कोकण रेल्वे स्थानकातून प्रवास करताना प्रवाशांकडून पूर्ण तिकिटाचे पैसे वसूल केले जातात, मात्र त्या तुलनेत पायाभूत सुविधा पुरवण्याकडे रेल्वे प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. ​उन्हाळ्यात दुपारच्या वेळी सावलीचा कोणताही आडोसा नसल्यामुळे लहान मुले, वृद्ध आणि महिला प्रवाशांचे हाल होतात. तर पावसाळ्यात प्रवाशांचा हाऊसफुल्ल प्रतिसाद असूनही निवाऱ्याअभावी भिजतच गाडी पकडावी लागते. या अस्वस्थ करणाऱ्या परिस्थितीमुळे प्रवाशांमध्ये रेल्वे प्रशासनाविरोधात तीव्र असंतोष पसरला आहे.

टाईम्स स्पेशल

​सावंतवाडी स्थानकाला टर्मिनसचा दर्जा मिळून एवढा मोठा कालावधी लोटल्यानंतरही प्लॅटफॉर्मवर साधी निवारा शेड उभारण्यात आलेली नाही. या अत्यावश्यक सुविधेसाठी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि राजकीय नेते ठोस पाठपुरावा कधी करणार, असा थेट सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत. ​दरम्यान, संतप्त प्रवाशांनी आणि स्थानिक नागरिकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या समस्येकडे थेट रेल्वे मंत्रालयाचे लक्ष वेधले आहे. रेल्वे मंत्रालय, रेल्वे सेवा आणि स्थानिक लोकप्रतिनिधींना टॅग करून सावंतवाडी रोड स्थानकातील प्लॅटफॉर्म वर लवकरात लवकर पूर्ण क्षमतेची निवारा शेड उभी करावी आणि प्रवाशांना दिलासा द्यावा, अशी मागणी आता अधिक तीव्र झाली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg