loader
Breaking News
Breaking News
Foto

जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र मराठी भाषा विभाग, क्लास वन मराठी भाषा अधिकार्‍याची नियुक्ती : उदय सामंत

रत्नागिरी : मराठी भाषेचा विकास, संवर्धन आणि प्रशासकीय पातळीवर तिच्या वापराला चालना देण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र मराठी भाषा विभाग स्थापन करण्यात येणार आहे. या विभागासाठी किमान ५०० चौरस फुटांची जागा उपलब्ध करून देतानाच क्लास वन दर्जाच्या मराठी भाषा अधिकार्‍याची नियुक्ती केली जाणार असल्याची घोषणा मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी केली. कोमसापच्या संमेलन कार्यालयाचे उदघाटन मारुती मंदिर येथील साईरत्न इमारतीत झाले. यावेळी कोमसापच्या केंद्रीय अध्यक्षा नमिता कीर, महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक मंडळाचे उपाध्यक्ष प्रदीप ढवळ, जिल्हा बँकेचे अध्यक्ष तथा कोमसापचे सल्लागार डॉ. तानाजीराव चोरगे, संमेलनाचे कार्याध्यक्ष अभिजीत हेगशेट्ये, कार्यवाह गजानन पाटील आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना मंत्री सामंत म्हणाले की, जिल्हाधिकार्‍यांवर विविध शासकीय कामांचा मोठा भार असतो. त्यामुळे मराठी भाषेसंदर्भातील कामांसाठी स्वतंत्र यंत्रणा असणे आवश्यक आहे. भाषेच्या विकासाचे काम अतिरिक्त बोजा न ठरता प्रभावीपणे व्हावे, या उद्देशाने स्वतंत्र विभागाची निर्मिती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे सामंत यांनी सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या विभागात जिल्ह्यातील मराठी भाषेवर प्रेम असलेल्या, उच्च शिक्षित आणि भाषेशी घट्ट नाळ असलेल्या अधिकार्‍याची नियुक्ती केली जाणार आहे. त्याचबरोबर स्वतंत्र माहिती संगणक चालक आणि शिपाई उपलब्ध करून देण्यात येणार असून, निधीची कमतरता भासू दिली जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी देशात प्रथमच १०० बोलीभाषांचे शब्दकोश प्रकाशित करण्याचा उपक्रम हाती घेण्यात येणार आहे. लोप पावत असलेल्या बोलीभाषांचे जतन करण्यासाठी विद्यापीठ स्तरावर विद्यार्थी साहित्य संमेलने आणि महिला संमेलने आयोजित केली जात असल्याची माहिती सामंत यांनी दिली. मराठी भाषा केवळ शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांपुरती मर्यादित न ठेवता छत्रपती शिवाजी महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचे साहित्य नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. देशातील ११ अभिजात भाषांच्या प्रत्येकी पाच तज्ज्ञांची तीनदिवसीय कार्यशाळा रत्नागिरीत आयोजित करण्यात येणार आहे.

टाईम्स स्पेशल

तामिळ, संस्कृत, तेलुगू, मल्याळम, ओडिया, कन्नड, बंगाली, आसामी, पाली, प्राकृत आणि मराठी या भाषांतील तज्ज्ञ या कार्यशाळेत सहभागी होणार आहेत. या उपक्रमात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून भाषांमधील संवाद सुलभ करण्याचा प्रयोग करण्यात येणार आहे. मराठीत केलेले भाषण इतर भाषांतील प्रतिनिधींना त्यांच्या मातृभाषेत अल्पावधीत समजावे, यासाठी डॅशबोर्डच्या माध्यमातून भाषांतराची सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.मराठी भाषा, साहित्य आणि बोलीभाषांच्या संवर्धनासाठी शासनाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जात आहेत. तळागाळातील साहित्यिक, लेखक आणि भाषाप्रेमींना संधी देण्यासोबतच मराठी भाषेला व्यापक व्यासपीठ मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सामंत यांनी सांगितले. सूत्रसंचालन माधव अंकलगे यांनी केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg