loader
Breaking News
Breaking News
Foto

पनवेल पोलिसांचा ‘मालमत्ता परतावा’चा धडाका, 17 गुन्हे आणि 143 मिसिंग प्रकरणांतील तब्बल ₹2.07 कोटींचा मुद्देमाल नागरिकांना परत

पनवेल : नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील पनवेल विभागाने नागरिकांना मोठा दिलासा देणारी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. पनवेल शहर, पनवेल तालुका आणि खांदेश्वर पोलीस ठाण्यांमध्ये विविध गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेला तब्बल ₹2 कोटी 7 लाख 57 हजार 700 रुपये किमतीचा मुद्देमाल संबंधित तक्रारदार व नागरिकांना परत करण्यात आला. पनवेल विभागातील विविध गुन्ह्यांमध्ये जप्त असलेला मुद्देमाल विनाविलंब संबंधितांना परत करण्याचे निर्देश पोलीस उपायुक्त, परिमंडळ-3, पनवेल रश्मी नांदेडकर यांनी सहाय्यक पोलीस आयुक्त, पनवेल विभाग मयुर भुजबळ यांना दिले होते. या निर्देशांची अंमलबजावणी करत पनवेल विभागातील तीनही पोलीस ठाण्यांनी आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मुद्देमाल निर्गतीची कार्यवाही केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या मोहिमेत 17 गुन्हे तसेच 143 मिसिंग प्रकरणांमधील मुद्देमाल संबंधितांना परत करण्यात आला. यामध्ये तब्बल 107 तोळे सोने, 7 वाहने आणि 143 मोबाईल फोन, तसेच लॅपटॉप व इतर साहित्याचा समावेश आहे. पनवेल शहर पोलीस ठाण्याकडून सर्वाधिक ₹1 कोटी 85 लाख 34 हजार 50 रुपये किमतीचा मुद्देमाल परत करण्यात आला. त्यामध्ये सोने, मोबाईल फोन, वाहने आणि इतर मुद्देमालाचा समावेश आहे. पनवेल तालुका पोलीस ठाण्याकडून ₹19 लाख 6 हजार 650, तर खांदेश्वर पोलीस ठाण्याकडून ₹3 लाख 17 हजार किमतीचा मुद्देमाल संबंधितांना परत करण्यात आला. शनिवारी, 12 सप्टेंबर 2026 रोजी पनवेल येथील मंथन हॉलमध्ये सहाय्यक पोलीस आयुक्त मयुर भुजबळ यांच्या हस्ते संबंधित नागरिकांना त्यांचा मुद्देमाल परत करण्यात आला. यावेळी पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळा कुंभार, पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन घाडगे आणि खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता ढाकणे यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

मुद्देमाल परत मिळवण्यासाठी तक्रारदार व नागरिकांना वेगवेगळ्या कार्यालयांमध्ये वारंवार फेऱ्या माराव्या लागू नयेत, यासाठी एकाच ठिकाणी प्रक्रिया पूर्ण करून मुद्देमाल परत देण्यात आला. त्यामुळे नागरिकांची मोठी पायपीट वाचली. आपला मौल्यवान मुद्देमाल पुन्हा मिळाल्याने संबंधित नागरिकांनी पनवेल पोलिसांचे आभार मानत समाधान व्यक्त केले. गुन्हा दाखल करण्यापासून तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेपर्यंतची कार्यवाही पूर्ण करत नागरिकांचा जप्त मुद्देमाल पुन्हा त्यांच्या हक्काच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याची ही मोहीम पनवेल पोलिसांच्या कार्यक्षमतेचे उदाहरण ठरली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg