loader
Breaking News
Breaking News
Foto

११,५०० फुटांवर रत्नागिरीचा झेंडा; अभिजित पड्याळ यांची लडाख मॅरेथॉन ५ तास २२ मिनिटांत पूर्ण

रत्नागिरी : समुद्रसपाटीपासून सुमारे ११,५०० फूट उंचीवर, विरळ ऑक्सिजनच्या वातावरणात आणि आव्हानात्मक चढ-उतारांच्या मार्गावर ४२.१९५ किमीची लडाख मॅरेथॉन ५ तास २२ मिनिटांत पूर्ण करत रत्नागिरीचे अल्ट्रा रनर अभिजित अशोक पड्याळ यांनी दमदार कामगिरी केली. लडाख मॅरेथॉनचा मार्ग चोगलमसर, चुचोट आणि स्टकना या परिसरातून जातो. उंची, चढ-उतार आणि कमी ऑक्सिजन उपलब्धतेमुळे ही स्पर्धा धावपटूंसाठी मोठे आव्हान मानली जाते. अभिजित यांनी सुरुवातीचे २१ किमी वेगाने पूर्ण केले. मात्र पुढे उंची वाढत गेल्याने श्वसनाचा त्रास जाणवू लागला. प्रतिकूल परिस्थितीतही वेग आणि मानसिक ताकद कायम ठेवत त्यांनी अखेर ५ तास २२ मिनिटांत मॅरेथॉन पूर्ण केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

अभिजित यांचा सुरुवातीला खारदुंग ला चॅलेंज ७२ किमी या स्पर्धेत सहभागी होण्याचा मानस होता. मात्र नोंदणी पूर्ण झाल्याने त्यांनी फुल मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला. लडाखच्या उंचीशी शरीर जुळवून घेण्यासाठी त्यांनी स्पर्धेच्या आठ दिवस आधी लडाख गाठले. “लडाख मॅरेथॉन ही फक्त धावण्याची स्पर्धा नाही; ती कठीण परिस्थितीशी जुळवून घेण्याची आणि त्यावर मात करण्याची परीक्षा आहे. प्रशिक्षणासोबत मानसिक ताकद आणि सातत्य खूप महत्त्वाचे आहे. कोणत्याही क्षेत्रात सातत्य ठेवले, तर यश नक्की मिळते,” असे अभिजित यांनी सांगितले. अभिजित यांच्या धावण्याच्या कारकिर्दीत यापूर्वीही अनेक उल्लेखनीय कामगिरीची नोंद आहे. टाटा मुंबई मॅरेथॉन ४२ किमी ३ तास ५८ मिनिटांत पूर्ण करून सब-४, मानाच्या लोहापुरुष स्पर्धेत द्वितीय क्रमांक, सावंतवाडी ६ तास रनमध्ये द्वितीय क्रमांक, तसेच दक्षिण आफ्रिकेतील कॉम्रेड्स मॅरेथॉनच्या अपहिल स्पर्धेत ८६ किमी अंतर ९ तास ५१ मिनिटे १२ सेकंदांत पूर्ण करून रॉबर्ट मत्शाली मेडल त्यांनी मिळवले आहे.

टाईम्स स्पेशल

या प्रवासात प्रशिक्षक दादासो सत्रे यांचे मार्गदर्शन लाभले. लडाख मॅरेथॉनच्या उत्कृष्ट आयोजनाचे आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या वातावरणाचे अभिजित यांनी कौतुक केले. या यशासाठी केसीएम, आरसीसी मित्रपरिवार, कुटुंबीय आणि सर्व समर्थकांचे त्यांनी आभार मानले. लडाखला रवाना होण्यापूर्वी घेतलेले श्री देव भैरी आणि सद्गुरु श्री अनिरुद्ध बापू यांचे आशीर्वाद या प्रवासात प्रेरणादायी ठरल्याचे अभिजित यांनी नमूद केले. कॉम्रेड्स मॅरेथॉनपासून लडाखच्या उंच पर्वतरांगांपर्यंतचा हा प्रवास रत्नागिरीच्या धावपटूच्या जिद्द, मेहनत आणि सातत्याची नवी ओळख ठरला आहे. अभिजित यांच्या या कामगिरीमुळे कोकणातील तरुणांना रनिंग, फिटनेस आणि सातत्याची प्रेरणा मिळणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg