loader
Breaking News
Breaking News
Foto

करबुडे आग्रेवाडीतील शाळकरी मुलींनी जेव्हा रंगमंचावर पाऊल ठेवले, मोबाईलच्या युगात जाखडी नृत्याची सरशी

रत्नागिरी : निसर्गरम्य कोकणची माती, पारंपरिक संस्कृती आणि तिथे रुजलेल्या लोककलांचा वारसा नेहमीच खास असतो. आधुनिकतेच्या आणि मोबाईलच्या युगात पारंपरिक लोककला मागे पडते की काय, अशी भीती व्यक्त केली जात असतानाच, रत्नागिरीतील चिमुकल्या लेकींनी आपल्या फिरत्या पावलांनी आणि तालावर धरलेल्या ठेक्याने या कलेला नवा श्वास दिला आहे. पुरुषांची मक्तेदारी समजल्या जाणार्‍या जाखडी नृत्यात आज कोकणाच्या लेकींनी मारलेली बाजी केवळ कौतुकास्पद आहे. हा उपक्रम लोककलेचे भविष्य सुरक्षित असण्याची ग्वाही देणारी ठरत आहे. गणेशोत्सवाच्या पावन पर्वात रत्नागिरीतील उद्यमनगर येथील दत्तप्रसन्न मंडळात एक वेगळाच उत्साह पाहायला मिळाला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

करबुडे आग्रेवाडी येथील ‘केदारिन शिवकन्या ग्रुप’च्या शाळकरी मुलींनी जेव्हा पायात घुंगरू बांधून जाखडी नृत्यासाठी रंगमंचावर पाऊल ठेवले, तेव्हा संपूर्ण परिसर टाळ्यांच्या गजर आणि ढोलकीच्या तालाने दुमदुमून गेला. मुलांपेक्षाही सरस आणि डौलदार सादरीकरण करत या चिमुकल्यांनी उपस्थित रसिकांची मनं जिंकून घेतली. या अप्रतिम सादरीकरणात गायिका अपूर्वा गावडे हिच्या सुमधुर आवाजाने रसिकांना भुरळ घातली, तर तिला रोशनी आग्रे हिने कोरसची उत्तम साथ दिली. गाण्याला ढोलकीवर ठेका धरणारा हर्षद आडविलकर, ऑक्टोपॅडवर साथ देणारा यश शितप आणि किबोर्डवरची जादू दाखवणारा सार्थक आग्रे या महाविद्यालयीन तरुणांच्या साथीमुळे या नृत्यात अधिकच रंग भरला गेला.

टाईम्स स्पेशल

दिपाली आग्रे, सानिका आग्रे, मनाली आग्रे, शिवानी आग्रे, सृष्टी आग्रे, मनस्वी आग्रे, प्रज्ञा आग्रे आणि राणी आग्रे या चिमुकल्या विद्यार्थिनींनी तालावर धरलेला ठेका पाहून उपस्थितांनी डोळ्यांचे पारणे फेडले. आपल्या आजोबा-पणजोबांच्या काळापासून चालत आलेली ही सांस्कृतिक परंपरा ही मुले शिक्षणासोबत अत्यंत निष्ठेने पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहेत. राज्य सरकारने जाखडी आणि नमन या लोककलांना राजाश्रय देण्याची घोषणा केली असली, तरी या लेकींच्या जिद्दीला आता प्रत्यक्ष व्यासपीठाची आणि भक्कम पाठिंब्याची गरज आहे. रत्नागिरीचे पालकमंत्री तथा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी या गुणी बालकलाकारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून, या कलेला राज्य व देशपातळीवर मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशीच प्रामाणिक भावना आज प्रत्येक कोकणवासीयाच्या मनात दाटून आली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg