loader
Breaking News
Breaking News
Foto

अंधेरीत घरातच उभं राहिलं पोस्ट ऑफिस; पुन्हा जागा झाला पोस्टकार्डचा सुवर्णकाळ!

मुंबई : ( यशवंत कांबळे, दापोली ): एक काळ असा होता, जेव्हा माणसांच्या आयुष्यातील सुख-दुःखं, आनंदाच्या बातम्या आणि आपुलकीचे निरोप पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचायचे. पैसे पाठवायचे असोत, दूर गेलेल्या आपल्या माणसाची खुशाली कळवायची असो किंवा एखाद्या पत्राची आतुरतेने वाट पाहायची. पोस्ट ऑफिस आणि पोस्टमन हा त्या काळातील प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग होता.मात्र मोबाईल, इंटरनेट आणि WhatsAppच्या युगात संवाद काही सेकंदांचा झाला आणि पत्र लिहिण्याची सवयच जवळपास हरवून गेली. याच हरवलेल्या आठवणींना पुन्हा उजाळा देण्याचा एक सुंदर प्रयत्न संतोष जाधव यांनी केला आहे. अंधेरी येथील आपल्या घरातच त्यांनी चक्क एक छोटेसे पोस्ट ऑफिस उभे केले आहे. या माध्यमातून जुन्या काळातील पोस्ट ऑफिस, पोस्टमन आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पोस्टकार्डचा सुवर्णकाळ पुन्हा अनुभवता येत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पूर्वी पाठवली जाणारी पोस्टकार्डची हुबेहूब प्रतिकृती तर या उपक्रमाचं खास आकर्षण ठरतेय. त्या पोस्टकार्डवरची जुनी अक्षरं… त्यावर लिहिलेली भावनिक वाक्यं… आणि माणसांच्या मनाला भिडणारे ते शब्द वाचताना पाहणारा अक्षरशः भावुक होतो. एखाद्या पोस्टकार्डवर आईची आठवण असते, कुठे गावची ओढ असते, तर कुठे आपल्या माणसाला सुखरूप असल्याची खात्री देणारे शब्द असतात.आणि विशेष म्हणजे, प्रत्येक पत्राची सुरुवात ज्या पद्धतीने व्हायची, त्या पद्धतीची एक ओळही इथे अनुभवायला मिळते. “आई, मी सुखरूप पोहोचलो आहे… काळजी करू नकोस.” “दादा, राखी मिळाली का?” “गणपतीला नक्की येईन…” अशा ओळी वाचताना फक्त शब्द दिसत नाहीत… तर त्या काळातली माणसं, त्यांचं नातं आणि त्यांची आपुलकी डोळ्यांसमोर उभी राहते.आणि हे सगळं दाखवताना त्यांनी बदललेला काळही तितक्याच सुंदर पद्धतीने उभा केला आहे. यासाठी संतोष जाधव यांनी चक्क दोन वेगवेगळी घरं तयार केली आहेत. एक घर अगदी ९०च्या दशकातील, तर दुसरं आजच्या म्हणजेच २०२६च्या काळातील! ९०च्या दशकातील घरात प्रवेश करताच जणू आपण पुन्हा त्या जुन्या काळात पोहोचतो. घरातील प्रत्येक बारकावा अगदी हुबेहूब साकारण्यात आला आहे. ते जुन्या पद्धतीचं लाकडी टेबल असो, कपाट असो किंवा त्या कपाटावर वर्षानुवर्षे साचलेली अडगळ… प्रत्येक गोष्ट त्या काळाची आठवण करून देते. घरातली मांडणी, वस्तू आणि छोट्या-छोट्या गोष्टींमधून त्या काळातील साधेपणा अक्षरशः जिवंत केला आहे.

टाइम्स स्पेशल

पण त्याचबरोबर आजचा २०२६चा काळ दाखवतानाही संतोष जाधव विसरलेले नाहीत. आधुनिक घरातील बदललेली जीवनशैली, उपलब्ध झालेल्या सुख-सोयी आणि तंत्रज्ञानामुळे घरात आलेला बदल इथे अगदी बारकाईने दाखवण्यात आला आहे.जणू काही एक घर सांगतंय — “आपण कसे होतो…”आणि दुसरं घर विचारतंय — “आपण आता कुठे आलोय?”दोन घरांमधलं हे अंतर फक्त काळाचं नाही…तर बदललेल्या जीवनशैलीचं, बदललेल्या सवयींचं आणि बदललेल्या नात्यांचंही आहे.आणि मग शेवटी येतं या सजावटीच आणखी एक सुंदर आव्हान…शेवटी चक्क पत्र लिहिण्याचं आव्हान!समोर अगदी खरं पोस्टकार्ड ठेवण्यात आलं आहे आणि येणारा प्रत्येक जण ते पोस्टकार्ड हातात घेत, जुन्या आठवणींमध्ये रमून पत्र लिहित आहे. विशेष म्हणजे, हे पत्र केवळ लिहायचं नाही… तर खरा पत्ता लिहायचा!कारण संतोष जाधव यांचं म्हणणं आहे—“तुम्ही फक्त पत्र लिहा… ते पोहोचविण्याची जबाबदारी आमची!”बाप्पा जाधवांच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमाला नागरिकांकडूनही उत्तम प्रतिसाद मिळत आहे. पोस्टकार्ड हातात घेताना अनेकांच्या चेहऱ्यावर जुन्या आठवणी उमटत आहेत, तर नव्या पिढीला पत्र लिहिण्याचा अनुभव मिळत आहे.कधीकाळी ज्याची आतुरतेने वाट पाहिली जायची, तो पोस्टमन आज क्वचितच दिसतो. मात्र अंधेरीतील या छोट्याशा उपक्रमातून पुन्हा एकदा तो काळ जिवंत होताना दिसतोय.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg