loader
Breaking News
Breaking News
Foto

सावंतवाडी तालुक्यात पारंपरिक उत्साहात गौरी पूजन संपन्न; महिलांनी भक्तिभावाने दिला ‘औसा’!

सावंतवाडी(प्रतिनिधी)- गणेशोत्सवाच्या आनंदी वातावरणात सावंतवाडी तालुक्यात लाडक्या गौराईचे आगमन झाल्यानंतर गुरुवारी अत्यंत भक्तिमय आणि पारंपरिक वातावरणात गौरी पूजन करण्यात आले. या निमित्ताने तालुक्यातील घराघरांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले. ग्रामीण तसेच शहरी भागातील महिलांनी एकत्र येत पारंपरिक पद्धतीने पूजन करून ‘औसा’ भरण्याचा विधी पार पाडला. गौरी पूजनाच्या दिवशी सकाळी सुवासिनींनी गौराईची विधीवत स्थापना करून तिला आकर्षक वस्त्रे, सोन्या-चांदीचे दागिने आणि ताज्या फुलांच्या माळांनी सजवले. गौराईला विशेष नैवेद्य म्हणून अंबाडीची भाजी, भाकरी, विविध भाज्या, आणि पातोळ्यांचा महानैवेद्य दाखवण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कोकणातील गौरी पूजनामध्ये ‘औसा’ (ओवसा) भरण्याच्या विधीला विशेष महत्त्व आहे. सावंतवाडी तालुक्यातील महिलांनी आपापल्या घरी तसेच गल्लीतील एकत्र आलेल्या सुवासिनींसोबत हा विधी मोठ्या उत्साहात साजरा केला. टोपलीमध्ये किंवा पाटावर धान्य, फळे, रानभाज्या, आणि सुवासिनींचे साहित्य मांडून कुलदेवतेचे आणि गौराईचे स्मरण करत एकमेकींना औसा देण्यात आला. याप्रसंगी ज्येष्ठ महिलांनी नवविवाहितांना आणि इतर सुवासिनींना अखंड सौभाग्यवती राहण्याचा आशीर्वाद दिला.

टाइम्स स्पेशल

पूजा आणि औसा विधी संपल्यानंतर सायंकाळी महिलांनी एकत्र येत गौरीची पारंपरिक गाणी, टिपर्‍या आणि झिम्मा-फुगडीचे खेळ खेळले. रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या खेळ आणि गाण्यांमुळे सावंतवाडीतील गाव-वाड्यांमध्ये मंगलमय आणि उत्साही वातावरण निर्माण झाले होते. तालुक्यातील बांदा, माजगाव, आंबोली, मडुरा आणि आजगाव यांसह विविध गावांमधील घराघरांत गौरी पूजनाचा हा सण परंपरेचे जतन करत मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg