loader
Breaking News
Breaking News
Foto

दापोलीच्या जिद्द आणि ताकदीने दिल्ली जिंकली; पांगारीच्या शुभम लोंढेची ‘पॉवरलिफ्टिंग’मध्ये रौप्य कामगिरी!

संगलट(खेड)(इक्बाल जमादार)- ग्रामीण भागात जन्माला आलेल्या अनेक युवकांच्या डोळ्यांत मोठी स्वप्ने असतात; मात्र त्या स्वप्नांना दिशा देण्यासाठी आवश्यक असते ती जिद्द, सातत्य, शिस्त आणि स्वतःवरचा विश्वास. दापोली तालुक्यातील पांगारी-तर्फ हवेली, गोविंदशेत वाडी या छोट्याशा गावातून पुढे आलेल्या शुभम काशिनाथ लोंढे या युवकाने आपल्या मेहनतीच्या जोरावर हेच सिद्ध करून दाखवले आहे. पॉवरलिफ्टिंगसारख्या ताकद आणि शिस्तीची कसोटी पाहणार्‍या क्रीडा प्रकारात शुभमने आधी रत्नागिरी जिल्ह्याचे, त्यानंतर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर रौप्यपदकाची कमाई केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शुभमचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण आपल्या गावातच झाले. पुढील शिक्षणासाठी तो मुंबईत आला आणि TYBCom पर्यंतचे शिक्षण घेतले. लहानपणापासूनच व्यायामाची आवड असलेल्या शुभमने याच आवडीला आपल्या आयुष्याचे ध्येय बनवण्याचा निर्णय घेतला. केवळ स्वतः व्यायाम करण्यापुरते मर्यादित न राहता फिटनेस क्षेत्रात शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेण्याच्या उद्देशाने त्याने इंटिग्रॅटेड फिटनेस अँड स्पोर्ट्स इन्स्टिटयूट (IFSI) येथे ट्रेनर कोर्स पूर्ण केला. या प्रवासात त्याला निखिल अष्टीवाले सर यांच्या मार्गदर्शनाचा मोठा फायदा झाला. ट्रेनर कोर्समधून मिळालेल्या ज्ञानाच्या आधारे शुभमने स्वतःच्या पॉवरलिफ्टिंग प्रशिक्षणाला सुरुवात केली. उपलब्ध साधनसामग्रीपेक्षा मेहनत, सातत्य आणि प्रशिक्षणातील शिस्त यांना त्याने अधिक महत्त्व दिले. स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवत त्याने सराव सुरू ठेवला आणि त्याचा परिणाम स्पर्धेच्या मैदानात दिसू लागला.

टाइम्स स्पेशल

परिस्थिती कोणतीही असो, आपल्या आवडीच्या क्षेत्रात प्रामाणिकपणे मेहनत घेतली आणि सातत्य ठेवले तर ग्रामीण भागातील युवकही राज्य, राष्ट्रीय आणि त्यापुढील व्यासपीठावर पोहोचू शकतात, हे शुभमने आपल्या कामगिरीतून दाखवून दिले आहे. सध्या मुंबईतील रामगड नगर, गोशाळा रोड, मुलुंड पश्चिम येथे वास्तव्यास असलेल्या शुभमसमोर आता क्रीडा क्षेत्रात आणखी मोठी भरारी घेण्याचे ध्येय आहे. रत्नागिरीच्या मातीतून सुरू झालेला त्याचा प्रवास आता राज्याच्या पलीकडे राष्ट्रीय व्यासपीठापर्यंत पोहोचला आहे. दापोली तालुक्यातील पांगारीच्या या सुपुत्राने मिळवलेली दोन रौप्यपदके ही केवळ पदके नसून ग्रामीण युवकांच्या स्वप्नांना बळ देणारी प्रेरणा चिन्हे ठरली आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg