loader
Breaking News
Breaking News
Foto

२२० केव्ही वीजवाहिनीच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; शेतकरी मुकुंद तलाठी यांचा मंत्रालयासमोर उपोषणाचा इशारा

खेड : कळबणी ते खवटी या सुमारे आठ किलोमीटर अंतरात जाणाऱ्या २२० केव्ही उच्चदाब वीजवाहिनीमुळे शेतकरी आणि महामार्गावरील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याचा आरोप खवटी येथील शेतकरी मुकुंद परशुराम तलाठी यांनी केला आहे. मुंबई-गोवा महामार्गाला ही वीजवाहिनी तीन ठिकाणी क्रॉस होत असून, महामार्गाच्या रुंदीकरणानंतर रस्त्याची उंची वाढल्याने वीजवाहिनी आणि महामार्गातील उभे अंतर कमी झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर वीजवाहिनीचे तातडीने तांत्रिक सर्वेक्षण करून आवश्यक असल्यास तिचे पुनर्संरेखन (Re-alignment) करावे, अशी मागणी तलाठी यांनी केली आहे. मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास १५ ऑक्टोबर २०२६ रोजी मंत्रालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. मुकुंद तलाठी यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या मालकीच्या खवटी येथील सर्वे क्रमांक १९/९+१० या जमिनीमध्ये संबंधित उच्चदाब वीजवाहिनीचे दोन टॉवर उभारण्यात आले आहेत. सुमारे १३५ गुंठे क्षेत्र असलेल्या या जमिनीमध्ये शेतीची कामे करण्यासाठी नियमितपणे जावे लागते. मात्र, पावसाळ्यात वीजवाहिनीच्या खाली छत्री घेऊन जात असताना छत्रीच्या दांड्याला विद्युत झिणझिण्या जाणवत असल्याचा गंभीर दावा त्यांनी केला आहे. ही बाब त्यांनी महाड येथील संबंधित अधिकारी बोरसे यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर, तारेखाली छत्री घेऊन चालू नका, असे सांगण्यात आल्याचा आरोप तलाठी यांनी केला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

महत्त्वाचे म्हणजे, महामार्गाच्या रुंदीकरणाच्या कामानंतर रस्त्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे पूर्वीच्या तुलनेत महामार्ग आणि २२० केव्ही वीजवाहिनीच्या सर्वात खालच्या कंडक्टरमधील प्रत्यक्ष उभे अंतर कमी झाले आहे का, याची अधिकृत तांत्रिक तपासणी होणे आवश्यक असल्याचे तलाठी यांनी म्हटले आहे. या मार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असून, एखादा टँकर किंवा मोठे वाहन वीजवाहिनीखाली थांबल्यास त्यालाही विद्युत झिणझिण्या जाणवण्याची शक्यता असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे हा केवळ शेतजमिनीपुरता मर्यादित प्रश्न नसून मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेशी संबंधित असल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे. तलाठी यांनी यापूर्वीही संबंधित वीजवाहिनीचे पुनर्सर्वेक्षण करण्याची मागणी केली होती. कळबणी ते खवटी या मार्गावरील वीजवाहिनी तीन वेळा महामार्गाला क्रॉस करते. कळबणी येथे वीजवाहिनी डोंगराच्या दिशेने नेण्यात आली असून, त्यानंतर उधळे गावाच्या परिसरात ती पुन्हा खाली येते आणि पुढे तुळशी फाटा परिसरात पुन्हा डोंगराच्या दिशेने नेण्यात आली असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या मार्गाचे पुनर्सर्वेक्षण करून वीजवाहिनी शक्य असल्यास डोंगराच्या भागातून सरळ मार्गाने नेल्यास नागरी वस्ती तसेच महामार्गावरील वाहतुकीला निर्माण होणारा संभाव्य धोका कमी होऊ शकतो, असा त्यांचा दावा आहे. दरम्यान, तलाठी यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या मुख्य अभियंत्यांकडे माहिती अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत स्वतंत्र अर्ज करून या संपूर्ण वीजवाहिनीची अधिकृत माहिती मागितली आहे. कळबणी ते खवटी दरम्यान महामार्गाला क्रॉस होणाऱ्या तिन्ही ठिकाणांचे स्वतंत्र GPS coordinates, अधिकृत Route Map, प्रत्येक क्रॉसिंगपासून त्यांच्या सर्वे क्रमांकापर्यंतचे अंतर, या मार्गावरील सर्व टॉवर क्रमांक व त्यांची GPS माहिती, वीजवाहिनीच्या ROW ची अधिकृत रुंदी व नकाशा तसेच उपलब्ध असल्यास GIS, KML किंवा KMZ स्वरूपातील डिजिटल नकाशा देण्याची मागणी करण्यात आली आहे.

टाईम्स स्पेशल

याशिवाय प्रत्येक टॉवर कोणत्या गावातील, गट क्रमांक अथवा सर्वे क्रमांकातील जमिनीवर आहे, याची अधिकृत माहिती आणि वीजवाहिनी व टॉवर उभारणीसंदर्भातील नुकसानभरपाई, मोबदला, जमिनीवरील हक्क किंवा ROW संदर्भातील उपलब्ध नोंदींच्या प्रमाणित प्रती देण्याची मागणीही करण्यात आली आहे. मागितलेली माहिती संबंधित कार्यालयाकडे उपलब्ध नसल्यास माहिती अधिकार कायद्यानुसार अर्ज संबंधित सार्वजनिक प्राधिकरणाकडे वर्ग करून त्याची माहिती अर्जदाराला देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. तलाठी यांनी आणखी एका अर्जाद्वारे कळबणी ते खवटी दरम्यान महामार्गाला तीन ठिकाणी क्रॉस होणाऱ्या २२० केव्ही वीजवाहिनीची प्रत्यक्ष तांत्रिक व विद्युत सुरक्षा तपासणी करण्याची मागणी केली आहे. प्रत्येक ठिकाणी महामार्गाच्या पातळीपासून सर्वात खालच्या कंडक्टरपर्यंतचे Vertical Clearance अचूकपणे मोजावे, आवश्यक सुरक्षा अंतर उपलब्ध नसल्यास वीजवाहिनीचे Re-alignment करण्यासाठी प्रस्ताव तयार करून सक्षम प्राधिकरणाकडे मंजुरीसाठी सादर करावा आणि पाहणीचा तांत्रिक अहवाल, मोजमापे, तपासणीचा निष्कर्ष व करण्यात आलेली कार्यवाही लेखी स्वरूपात कळवावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg