loader
Breaking News
Breaking News
Foto

वणौशी तर्फ पंचनदी येथे 'कृषी सखी' गटाकडून सुपारी पिकातील शास्त्रीय खत व्यवस्थापन प्रात्यक्षिक यशस्वी

दापोली (सागर गोवळे) : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत कृषी कन्यांच्या 'कृषी सखी' गटाने ग्रामीण कृषी कार्य अनुभव (RAWE) कार्यक्रमांतर्गत स्थानिक जातीच्या सुपारी पिकातील शास्त्रीय खत व्यवस्थापनाचे उत्कृष्ट प्रात्यक्षिक सादर केले. यजमान शेतकरी लक्ष्मण उजाळ यांच्या शेतातील सुमारे १९५ सुपारीच्या झाडांवर हे प्रात्यक्षिक प्रत्यक्ष राबवून दाखवण्यात आले. ​स्थानिक जातीच्या सुपारीचे उत्पादन वाढवण्यासाठी योग्य खत व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे असते. याच उद्देशाने कृषी सखी गटाने शेतकऱ्यांना झाडाचा घेर व वयानुसार संतुलित खत देण्याची शास्त्रीय 'आळे / बांगडी पद्धत' प्रत्यक्ष करून दाखवली. ​सेंद्रिय व रासायनिक खतांचा मेळ: जमिनीची सुपीकता जपण्यासाठी गांडूळ खत, नत्रयुक्त हिरवळीचे खत म्हणून 'ग्लिरिसिडीयाची (गिरिपुष्प) पाने' आणि संयुक्त रासायनिक खत 'सुपाला (15:15:15)' यांचा संतुलित वापर करण्याचे महत्त्व पटवून दिले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

झाडाच्या बुंध्यापासून सुमारे ०.७५ ते १ मीटर अंतरावर १५-२० सेमी खोल आणि २० सेमी रुंदीचा गोलाकार चर (आळे) खोदून, त्यात खते मातीत मिसळून चर ढकलून देण्याची योग्य पद्धत दाखवली. खते कधीही थेट बुंध्याजवळ टाकू नयेत, यामुळे झाडांच्या मुळांना इजा होऊ शकते, हे आवर्जून सांगण्यात आले. खताचा पहिला हप्ता ऑगस्ट-सप्टेंबर दरम्यान आणि दुसरा हप्ता डिसेंबर-जानेवारी दरम्यान देण्याचा मोलाचा सल्ला देण्यात आला. ​हे प्रात्यक्षिक सहयोगी अधिष्ठाता डॉ. रमेश कुंकरकर, RAWE कार्यक्रम समन्वयक डॉ. अशोक चव्हाण, केंद्र प्रभारी डॉ. विजय देसाई, विषय तज्ज्ञ डॉ. ए. ए. दोसानी, तसेच कार्यक्रम अधिकारी डॉ. आशिष शिगवण व डॉ. प्रविण झगडे यांच्या मोलाच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.

टाईम्स स्पेशल

या उपक्रमात कृषी सखी गटाच्या विद्यार्थिनी शबरी चव्हाण, संजना जंगले, मधुजा घडशी, पायल मोरे, रिंकू बाजीया, तरला श्रीदेवी, दिविलीयू, देवीप्रिया पी. टी., श्रीलया एम., मुस्कान कसोटीया आणि नित्या राज यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. ​योग्य वेळ, योग्य मात्रा आणि शास्त्रीय पद्धतीचा अवलंब केल्यास स्थानिक सुपारीच्या बागांची उत्पादकता नक्कीच वाढेल, असा विश्वास यजमान शेतकरी लक्ष्मण उजाळ यांनी व्यक्त करत सर्व कृषी कन्यांचे आभार मानले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg