loader
Breaking News
Breaking News
Foto

मालवण - सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या पहिल्या महिला अध्यक्षा, माजी शिक्षिका, ज्येष्ठ राजकीय-सामाजिक कार्यकर्त्या आणि खासदार नारायण राणे यांच्या निकटवर्तीय सरोज शिवाजी परब (मसुरे-मर्डेवाडी) (वय ६६) यांचे शनिवारी रात्री हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्या चार वेळा जिल्हा परिषद सदस्य म्हणून विजयी झाल्या होत्या. त्यांच्या निधनाने मसुरे दशक्रोशीसह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. सरोज परब यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मसुरे येथे झाले. डी.एड. चे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी काही काळ शिक्षिका म्हणून काम केले. त्यानंतर मालवण येथील टोपीवाला हायस्कूलच्या मोहनराव परुळेकर प्राथमिक शाळेत सहाय्यक शिक्षिका म्हणून सेवा बजावली. मात्र सामाजिक आणि राजकीय क्षेत्राची ओढ असल्याने त्यांनी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारून राजकारणात सक्रिय प्रवेश केला. १९८० च्या सुमारास मसुरे येथील शिवाजी परब यांच्याशी त्यांचा विवाह झाला. शिवाजी परब आणि सरोज परब या दाम्पत्याने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी नाते जोडत मसुरे परिसरात शिवसेनेची संघटनात्मक वाढ करण्यासाठी काम सुरू केले. १९९० मध्ये नारायण राणे मालवण-कणकवली विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून विजयी झाल्यानंतर परब दाम्पत्य त्यांच्याशी संपर्कात आले. पुढे सरोज परब या राणे यांच्या विश्वासू आणि कट्टर समर्थक म्हणून राजकारणात सक्रिय राहिल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

१९९२ मध्ये जिल्हा परिषद निवडणुकीत तत्कालीन आमदार नारायण राणे यांनी सरोज परब यांना मसुरे जिल्हा परिषद मतदारसंघातून उमेदवारी दिली. त्यांनी दणदणीत विजय मिळवत जिल्हा परिषदेत प्रवेश केला. सदस्य झाल्यानंतर मसुरे दशक्रोशीतील विकासकामांसाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या धडाडीच्या कार्याची दखल घेत १९९७ मध्ये त्यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आणि त्या दुसर्‍यांदा विजयी झाल्या. या काळात त्यांनी जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण सभापती म्हणून प्रभावी काम केले. यानंतर २००२ मध्ये त्यांना तिसर्‍यांदा मसुरे जिल्हा परिषद मतदारसंघातून उमेदवारी मिळाली. पुन्हा विजय मिळवत त्यांनी हॅट्ट्रिक साधली. याच कालखंडात सरोज परब यांनी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या पहिल्या महिला अध्यक्षपदाची धुरा सांभाळली. अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक धाडसी निर्णय घेत जिल्ह्याच्या विकासाच्या प्रश्नांना प्राधान्य दिले. राजकीय प्रवासात काही काळ खंड पडला असला तरी त्यांची सामाजिक व राजकीय सक्रियता कायम राहिली. २०१७ मध्ये नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीवर त्यांनी मसुरे जिल्हा परिषद मतदारसंघातून पुन्हा निवडणूक लढवली आणि विजय मिळविला. चार वेळा जिल्हा परिषद सदस्य म्हणून विजयी होत त्यांनी सिंधुदुर्गच्या राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटविला.

टाईम्स स्पेशल

सरोज परब यांच्या कार्याची वैशिष्ट्ये म्हणजे धडाडी, निर्णयक्षमता, संघटनकौशल्य आणि विकासकामांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा. ग्रामीण भागातून पुढे येत जिल्हा परिषदेच्या सर्वोच्च पदापर्यंत पोहोचलेल्या त्यांच्या राजकीय कारकिर्दीत महिलांसाठीही एक प्रेरणादायी आदर्श निर्माण झाला. सरोज परब यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी, सून, जावई, भाऊ, बहिणी, दीर, भावजय, पुतणे, पुतण्या, नातवंडे असा मोठा परिवार आहे. मालवण नगरपालिकेच्या शिवसेना नगरसेविका तथा आरोग्य सभापती पूनम चव्हाण आणि मसुरेचे माजी उपसरपंच राहुल परब यांच्या त्या मातोश्री होत. तसेच सेवानिवृत्त एस.टी. वाहतूक नियंत्रक व समाजसेवक शिवाजी परब यांच्या त्या पत्नी होत. दरम्यान, सरोज परब यांच्या पार्थिवावर आज रविवार, ३० ऑगस्ट रोजी दुपारी २.३० वाजता मसुरे-मर्डेवाडी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या निधनाने सिंधुदुर्गच्या राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील एक कर्तृत्ववान महिला नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg