loader
Breaking News
Breaking News
Foto

एनसीएमसी कार्डच्या नावाखाली लाभार्थ्यांच्या खिशावर डल्ला? साखरपा, देवरूख, संगमेश्वरसह तालुक्यात सर्वत्र ‘कॅम्प’चा धडाका

संगमेश्वर (सत्यवान विचारे) : एसटीच्या सवलतीचा लाभ घेण्यासाठी आवश्यक ठरत असलेल्या एनसीएमसी कार्डच्या नावाखाली सर्वसामान्य लाभार्थ्यांची कथित आर्थिक लूट सुरू असल्याचा गंभीर आरोप संगमेश्वर तालुक्यातून पुढे आला आहे. कार्डचे शुल्क १९९ रुपये असताना काही ठिकाणी लाभार्थ्यांकडून २५० ते ३०० रुपये अतिरिक्त घेतले जात असल्याची चर्चा असून, त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. एसटीच्या विविध सवलतींचा लाभ घेण्यासाठी एनसीएमसी कार्डची आवश्यकता असल्याने ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिक, महिला आणि अन्य लाभार्थी कार्ड काढण्यासाठी धाव घेत आहेत. हीच गरज काही एजंटांसाठी कमाईचे साधन ठरत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. विशेष म्हणजे, ‘समाजसेवे’च्या नावाखाली गावोगावी कॅम्प घेऊन कार्ड नोंदणी केली जात असल्याची चर्चा आहे. कार्डसाठी अधिकृत शुल्क १९९ रुपये असताना त्यापेक्षा अधिक रक्कम आकारली जात असेल, तर त्या अतिरिक्त पैशाचा हिशेब कोण देणार? असा सवाल आता लाभार्थी विचारू लागले आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

माखजन येथील एका एजंटने माखजन, कसबा, कडवई, कळंबस्ते आदी गावांमध्ये कॅम्प घेतल्याचे मान्य केले आहे. अतिरिक्त रक्कम घेतल्याबाबत विचारणा केली असता, जादा पैसे घेतल्याचे मान्य करताना संबंधित लाभार्थ्यांच्या संमतीनेच ही आकारणी केल्याचा दावा त्याने केला आहे. मात्र, ‘संमती’ हा मुद्दा कितपत ग्राह्य धरता येईल, हा वेगळा प्रश्न आहे. सरकारी सवलतीचा लाभ मिळवण्यासाठी कार्ड आवश्यक असेल आणि त्या कार्डासाठी अधिकृत शुल्कापेक्षा जास्त रक्कम द्यावी लागत असेल, तर ही स्वेच्छेची सेवा म्हणायची की गरजेचा गैरफायदा? असा थेट सवाल उपस्थित होत आहे. साखरपा, देवरूख, संगमेश्वर यांसह तालुक्यातील विविध भागांत अशाच प्रकारे जादा आकारणी होत असल्याच्या तक्रारी पुढे येत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. मात्र, या आरोपांची अधिकृत चौकशी किंवा पुष्टी अद्याप झालेली नाही. दरम्यान, या संपूर्ण प्रकारावर एसटी प्रशासनाचे नियंत्रण आहे की नाही? एजंटांना अतिरिक्त रक्कम घेण्याची परवानगी आहे का? असल्यास त्याचे अधिकृत नियम काय? याबाबत प्रशासनाने स्पष्ट भूमिका जाहीर करण्याची मागणी होत आहे.

टाईम्स स्पेशल

गरीब, ज्येष्ठ आणि सवलतीवर प्रवास करणार्‍या नागरिकांसाठी शासनाने सुविधा उपलब्ध करून दिली; मात्र त्या सुविधेच्या प्रवेशद्वारावरच अतिरिक्त पैशांची मागणी होत असेल, तर ‘सवलत’ नेमकी लाभार्थ्याला मिळतेय की मध्यस्थाला? हा प्रश्न अनुत्तरित आहे. १९९ रुपयांच्या कार्डासाठी ३००, ४०० किंवा त्याहून अधिक रुपये मोजावे लागत असतील, तर ही सवलत की छुपी वसुली? आता एसटी प्रशासनाने केवळ बघ्याची भूमिका न घेता संगमेश्वर तालुक्यातील एनसीएमसी कार्ड कॅम्प, एजंटांची नियुक्ती, अधिकृत शुल्क आणि प्रत्यक्षात घेतली जाणारी रक्कम यांची चौकशी करावी. ‘समाजसेवे’च्या नावाखाली लाभार्थ्यांच्या खिशावर हात साफ होत असेल, तर या कथित लुटीचा हिशेब घेणार कोण? असा संतप्त सवाल ग्रामीण भागातून उपस्थित होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg