loader
Breaking News
Breaking News
Foto

ग्रामीण विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी संकल्प संस्थेचा पुढाकार; ४२ जिल्हा परिषद शाळांना शैक्षणिक मदत स्पर्धा परीक्षा अभ्यासिका, ग्रंथालय व कौशल्य केंद्र उभारण्याचा मानस

खेड (प्रतिनिधी) : ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संकल्प सामाजिक स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रम सातत्याने राबवले जात आहेत. आर्थिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळे निर्माण होऊ नयेत, तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने संस्थेकडून विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. सन २०१० पासून खेड आणि दापोली तालुक्यातील दुर्गम भागातील जिल्हा परिषदेच्या ४२ शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मोफत वह्या, गणवेश, दप्तरे, संगणक, प्रिंटर आणि इतर शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येत आहे. संस्थेच्या माहितीनुसार, आतापर्यंत तब्बल ३२ हजार ५२० विद्यार्थ्यांना वह्या, ६५० विद्यार्थ्यांना गणवेश आणि ७८० विद्यार्थ्यांना दप्तरे देण्यात आली आहेत. तसेच २५ शाळांना संगणक आणि १० शाळांना प्रिंटर देण्यात आले आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शैक्षणिक साहित्य वाटपासोबतच आनंद मठ, खोपी येथील विद्यार्थ्यांना वह्या आणि खेळण्यांचे वाटप करण्यात आले आहे. आर्थिकदृष्ट्या गरीब, मात्र हुशार विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला हातभार लागावा यासाठी त्यांच्या वार्षिक कॉलेज फीचा खर्च उचलणे, तसेच विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्यासाठी मार्गदर्शन शिबिरे आयोजित करणे, असे उपक्रमही संस्थेकडून राबवले जात आहेत. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी संस्थेची एसएससी व्याख्यानमाला देखील सातत्याने सुरू आहे. सन १९९४ पासून आतापर्यंत तब्बल ३१ हजार २०० विद्यार्थ्यांनी या व्याख्यानमालेचा लाभ घेतल्याची माहिती संस्थेकडून देण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन आणि आवश्यक साधने उपलब्ध करून देण्याच्या कामात संस्थेचा सातत्यपूर्ण सहभाग राहिला आहे. दरम्यान, भविष्यातील गरजा लक्षात घेऊन संस्थेने आणखी काही महत्त्वाचे उपक्रम हाती घेण्याचा मानस व्यक्त केला आहे. तळे म्हसोबाची येथील शाळेच्या इमारतीमध्ये स्पर्धा परीक्षेसाठी अभ्यासिका, ग्रंथालय आणि व्यावसायिक शिक्षण केंद्र उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी आवश्यक सुविधा आणि कौशल्याधारित शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे.

टाईम्स स्पेशल

यासोबतच शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे मार्गदर्शन देणे आणि महिलांना शिवणकामासह विविध कौशल्यांचे प्रशिक्षण देण्याचेही नियोजन संस्थेकडून करण्यात आले आहे. मात्र या विविध उपक्रमांसाठी शाळेची इमारत आणि परिसराची दुरुस्ती, तसेच आवश्यक शैक्षणिक व प्रशिक्षण साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी मोठ्या आर्थिक निधीची आवश्यकता आहे. त्यामुळे संकल्प सामाजिक स्वयंसेवी संस्थेने या सामाजिक आणि शैक्षणिक कार्याला CSR निधी तसेच देणगीच्या माध्यमातून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला बळ देण्यासोबतच शेतकरी आणि महिलांसाठी कौशल्यविकासाच्या संधी निर्माण करण्याच्या उद्देशाने संस्थेचे हे उपक्रम पुढे नेले जाणार आहेत. १८ ऑगस्ट २०२६ जि. प. कन्या शाळा गोरेगांव. ता. माणगाव ते २७ ऑगस्ट २०२६ शिरवली गुरववाडी ता. खेड येथे कार्यक्रमाची सांगता झाली. या उपक्रमांना उद्योजक उत्तम जैन, राजेंद्र गुजर आणि शाम शिर्के यांची विशेष उपस्थिती लाभली. तसेच राजेंद्र तांबट, प्रकाश जंगम सर आणि सुनील सकपाळ यांचे विशेष सहकार्य लाभल्याचे संस्थेकडून सांगण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg