loader
Breaking News
Breaking News
Foto

कुंभवे शाळेत विद्यार्थ्यांना मोफत कलमे-रोपांचे वाटप

दापोली (प्रतिनिधी) : पर्यावरण संवर्धनाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये वृक्षप्रेम आणि निसर्गाबद्दलची जबाबदारी निर्माण व्हावी, या उद्देशाने जिल्हा परिषद जीवन शिक्षण आदर्श शाळा, कुंभवे येथे ‘एक पेड़ माँ के नाम’ या उपक्रमांतर्गत उपयुक्त कलमे-रोपांचे मोफत वाटप करण्यात आले. विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असलेली ही कलमे-रोपे अश्विनी ॲग्रो फार्म, दापोली यांच्या वतीने सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आली. या उपक्रमांतर्गत शाळेतील एकूण 90 विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक याप्रमाणे 90 कलमे-रोपांचे वाटप करण्यात आले. यामध्ये 10 चिकू कलमे, 60 जाम रोपे, 10 लिंबू रोपे आणि 10 पेरू रोपे यांचा समावेश होता. विद्यार्थ्यांनी ही रोपे आपल्या घराच्या परिसरात किंवा योग्य ठिकाणी लावून त्यांचे नियमित संगोपन करावे आणि पर्यावरण संवर्धनात स्वतःचा सहभाग नोंदवावा, हा या उपक्रमामागील प्रमुख हेतू आहे. अश्विनी ॲग्रो फार्मच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक बांधिलकी जपत शेतकऱ्यांना विविध उपयुक्त कलमे-रोपे मोफत उपलब्ध करून दिली जात आहेत. यावर्षी प्रथमच या उपक्रमाचा लाभ शालेय विद्यार्थ्यांनाही देण्यात आला, ही या कार्यक्रमाची विशेष बाब ठरली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

विद्यार्थ्यांच्या माध्यमातून घराघरांत वृक्षलागवडीचा संदेश पोहोचविण्याबरोबरच पर्यावरण संवर्धनाची संस्कृती रुजविण्याचा हा उपक्रम प्रेरणादायी ठरला. या उपक्रमासाठी शाळेचे माजी विद्यार्थी तसेच निवृत्त प्राथमिक शिक्षक प्रभाकर तेरेकर यांनी महत्त्वपूर्ण समन्वय साधला. कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती पवार यांनी उपस्थितांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्तावि प्रभाकर तेरेकर यांनी केले. प्रा. प्रभाकर शिंदे यांनी वृक्षलागवडीचे महत्त्व, योग्य रोपांची निवड, लागवडीची पद्धत तसेच रोपांच्या संगोपनाबाबत विद्यार्थ्यांना तांत्रिक मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष रोपलागवडीचे प्रात्यक्षिक करून दाखविले. त्यामुळे विद्यार्थ्यांना केवळ रोपांचे वाटप न होता, त्यांची योग्य पद्धतीने लागवड व देखभाल कशी करावी, याचेही प्रत्यक्ष ज्ञान मिळाले. यावेळी पर्यावरण संवर्धन आणि पर्यावरण जागरुकीला चालना मिळावी या उद्देशाने प्रा. प्रभाकर शिंदे यांनी पर्यावरणतज्ज्ञ दिलीप कुलकर्णी यांचे ‘स्वप्नांमधील गावा’ हे पुस्तक शाळेतील शिक्षकांना भेट दिले. विद्यार्थ्यांसोबतच शिक्षकांमध्येही पर्यावरणविषयक विचार आणि जागरूकता वाढविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला.

टाईम्स स्पेशल

यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना विविध उपयुक्त कलमे-रोपांचे वाटप करण्यात आले. रोपे स्वीकारताना विद्यार्थ्यांमध्ये विशेष उत्साह दिसून आला. ‘रोप घेणे’ एवढ्यापुरता हा कार्यक्रम मर्यादित न राहता, ‘रोप लावणे, त्याची काळजी घेणे आणि ते मोठे करणे’ ही जबाबदारी विद्यार्थ्यांनी स्वीकारावी, असा संदेश यावेळी देण्यात आला. या कार्यक्रमाला अश्विनी ऍग्रो फार्मचे संचालक प्रा.प्रभाकर शिंदे यांच्यासोबत कोकण कृषी विद्यापीठाचे निवृत्त प्राध्यापक डॉ.प्रमोद सावंत, निवृत्त प्राथमिक शिक्षक प्रभाकर तेरेकर, कुणबी सेवा संघाचे सरचिटणीस हरिश्चंद्र कोकमकर उपस्थित होते. त्याचप्रमाणे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राकेश काष्टे, उपाध्यक्षा पूजा आईनकर, सदस्या प्रगती काष्टे, अंकिता आईनकर, शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती पवार, उपशिक्षक सुनंदा मळगे, प्रतीक्षा झाडेकर, पूनम चौधरी, बाबू घाडीगावकर, डेटा ऑपरेटर वेदिका मुरुडकर हे उपस्थित होते. शालेय विद्यार्थ्यांना वृक्षलागवडीशी जोडून त्यांच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाची चळवळ घराघरांत पोहोचविण्याचा हा उपक्रम कौतुकास्पद असून, अश्विनी ॲग्रो फार्मने सामाजिक बांधिलकीतून दिलेला हा हातभार निश्चितच अनुकरणीय आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg