loader
Breaking News
Breaking News
Foto

मुणगेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा देवी भगवती देवस्थानतर्फे गुणगौरव

देवगड (प्रतिनिधी) - “विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने चांगला अभ्यास करून बक्षिसे मिळवावीत आणि आपले भविष्य उज्ज्वल करावे. यासाठी ग्रामदेवता श्री देवी भगवती सदैव विद्यार्थ्यांच्या पाठीशी राहील,” असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते व प्रसिद्ध भजनीबुवा देवदत्त ऊर्फ आबा पुजारे यांनी केले. मुणगे येथील प्रसिद्ध श्री देवी भगवती देवस्थानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तसेच भगवती हायस्कूलमधील इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण व गुणगौरव समारंभ देवी भगवती मंदिरात आयोजित करण्यात आला होता. देवस्थानचे अध्यक्ष ओंकार पाध्ये यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. यावेळी देवस्थानचे उपाध्यक्ष दिलीप महाजन, सचिव निषाद परुळेकर, मुणगे ग्रामपंचायत प्रशासक सरपंच सौ. अंजली सावंत, प्रशासक उपसरपंच दशरथ मुणगेकर, पोलीस पाटील साक्षी सावंत, भगवती हायस्कूलचे सहाय्यक शिक्षक प्रसाद बागवे, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक अविनाश राणे, सामाजिक कार्यकर्ते देवदत्त ऊर्फ आबा पुजारे, विश्वस्त प्रकाश सावंत, कृष्णा सावंत, पुरुषोत्तम तेली, आनंद घाडी, अनिल धुवाळी, रामचंद्र मुणगेकर, धर्माजी आडकर, तंटामुक्त समिती अध्यक्ष अमित सावंत, देवस्थान लिपिक रामतीर्थ कारेकर, सामाजिक कार्यकर्ते दिगंबर पेडणेकर, गोविंद सावंत आदी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मार्गदर्शन करताना देवदत्त पुजारे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी करिअर घडविताना जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहावे. मोठी स्वप्ने पाहून ती पूर्ण करण्यासाठी अहोरात्र मेहनत आणि आत्मविश्वासाची जोड आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करून यश संपादन करावे, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी देवस्थानचे सचिव निषाद परुळेकर यांनी उपस्थित मान्यवरांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते प्राथमिक शाळा व भगवती हायस्कूलमधील प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक प्राप्त गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थिनींना रोख रक्कम व गुलाबपुष्प देऊन गौरविण्यात आले. यावेळी प्राथमिक शिक्षक अविनाश राणे, सुभाष धुळे, धर्माजी आडकर तसेच भगवती हायस्कूलचे सहाय्यक शिक्षक प्रसाद बागवे यांनी मनोगत व्यक्त केले. पारितोषिक प्राप्त प्राथमिक शाळेतील इयत्ता दुसरीतील विद्यार्थी कु. आदर्श मुणगेकर यानेही मनोगत व्यक्त केले. “मला मिळालेले बक्षीस हा श्री देवी भगवतीचा आशीर्वाद आहे. यापुढेही चांगला अभ्यास करून माझ्या शाळेचे, शिक्षकांचे, आई-वडिलांचे आणि गावाचे नाव मोठे करीन,” असे त्याने सांगितले.

टाईम्स स्पेशल

दरम्यान, गुणगौरव कार्यक्रम सुरू असताना देवगड तहसीलदार पदावरून नुकतेच सेवानिवृत्त झालेले रमेश पवार आणि डॉ. के. एन. नायसे उपस्थित झाले. देवी भगवती देवस्थानच्या वतीने अध्यक्ष ओंकार पाध्ये यांच्या हस्ते त्यांचा गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी मनोगत व्यक्त करताना सेवानिवृत्त तहसीलदार रमेश पवार यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी देवी भगवती देवस्थान व ग्रामस्थांच्या वतीने राबविण्यात येणारा हा उपक्रम प्रेरणादायी असून, अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळेल, असे त्यांनी सांगितले. देवी भगवतीच्या दर्शनाच्या निमित्ताने या कार्यक्रमास उपस्थित राहता आले, हे आपले भाग्य असल्याचेही त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार देवदत्त ऊर्फ आबा पुजारे यांनी मानले. यावेळी शिक्षक, ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg