loader
Breaking News
Breaking News
Foto

ग्रामपंचायत ते जलजीवन मिशन; रत्नागिरी जि.प. सभेत विरोधकांचा जोरदार हल्लाबोल, सत्ताधारी पडले बॅकफूटवर

रत्नागिरी - रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या आज झालेल्या सर्वसाधारण सभेत मोजक्याच असलेल्या विरोधकांनी सत्ताधार्‍यांना आणि प्रशासनाला अक्षरशः जेरीस आणले. अध्यक्ष अस्मिता केंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत विरोधी पक्षनेते विक्रांत जाधव यांच्या नेतृत्वाखाली विरोधकांनी सत्ताधार्‍यांच्या कारभाराचा पंचनामा करत थेट प्रश्नांचा भडिमार केला. संख्याबळ कमी असले तरी विरोधकांच्या आक्रमक भूमिकेमुळे आजची सभा गाजली आणि अनेक गंभीर प्रश्न चव्हाट्यावर आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सभेची सुरुवात झाल्यापासूनच ग्रामसेवकांच्या मनमानी कारभाराचा मुद्दा चांगलाच तापला. ग्रामसेवकांची मनमानी, बैठकांना दांड्या मारण्याची सवय आणि विकासकामांच्या कार्यवाहीत जाणीवपूर्वक केला जाणारा विलंब या मुद्द्यांवर ग्रामपंचायत विभागाला धारेवर धरण्यात आले. विरोधक आणि काही आक्रमक सदस्यांच्या प्रश्नांसमोर प्रशासनाची भंबेरी उडाली. याशिवाय, अतिशय महत्त्वाच्या असलेल्या जलजीवन मिशनच्या कामांवरही जोरदार चर्चा झाली. जिल्ह्यात जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या कामांचा दर्जा काय आहे, या कामांच्या आजवर नेमक्या किती चौकशा झाल्या आणि त्या चौकशी अहवालातून काय निष्पन्न झाले, याबाबतचा जाब विरोधकांनी प्रशासनाला विचारला. यावर सखोल चर्चा होऊनही समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने वातावरण अधिकच तापले.

टाईम्स स्पेशल

दुसरीकडे, अध्यक्ष अस्मिता केंद्रे यांची काही वेळ राहिलेली ताठर भूमिका आणि आक्रमक विरोधक यामुळे अनेकदा सभागृहात वादाचे प्रसंग निर्माण झाले आणि वातावरण तणावपूर्ण बनले. मात्र, अशा बिकट प्रसंगी शिवसेना गटनेते बाबू म्हाप आणि उपाध्यक्ष विलास चळके यांनी अत्यंत संयमी भूमिका घेत परिस्थिती सावरली. त्यांची मध्यस्थी आणि योग्य प्रशासकीय समजूतदारपणामुळे वाद विकोपाला जाण्यापासून टळला आणि सभा सुरळीत पार पाडण्यास मोठी मदत झाली. एकूणच, आजच्या या सर्वसाधारण सभेत संख्याबळाचा बडेजाव असणार्‍या सत्ताधार्‍यांपेक्षा विरोधकांचा आक्रमक आणि आभ्यासपूर्ण आवाज अधिक बुलंद राहिला, ज्यामुळे ग्रामीण विकासातील अनागोंदी कारभार पुन्हा एकदा जनतेसमोर आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg