loader
Breaking News
Breaking News
Foto

विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमात प्रारुप मतदार यादी प्रसिद्धीची आयुक्त रुबल अगरवाल यांच्याकडून पाहणी

रत्नागिरी, - प्रशासकीय कार्यक्षमता, विकासकामांची थेट पाहणी आणि शाळकरी चिमुरड्यांशी साधलेला आत्मीय संवाद अशा एका संवेदनशील व प्रेरक शैलीत कोकण विभागीय आयुक्त तथा मतदार यादी निरीक्षक रुबल अगरवाल यांचा चिपळूण दौरा आज झाला. पूरनियंत्रण, पर्यावरण संवर्धन, पारदर्शक भूसंपादन आणि मतदार यादी पुनरिक्षणात चिपळूण उपविभागीय कार्यालयाने बजावलेली कामगिरी अव्वल दर्जाची असून, हाच कामाचा आदर्श पुढेही कायम ठेवावा, अशा शब्दांत त्यांनी स्थानिक प्रशासनाचा गौरव केला. उपविभागीय कार्यालयात आयोजित आढावा बैठकीस जिल्हाधिकारी मनुज जिंदल, अपर आयुक्त फरोग मुकादम, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड, प्रांताधिकारी आकाश लिगाडे, तहसीलदार प्रवीण लोकरे आणि अर्चना बोंबे यांची प्रमुख उपस्थिती होती.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या बैठकीत प्रांताधिकारी लिगाडे यांनी चिपळूणच्या स्थित्यंतराचा पट संगणकीय सादरीकरणाद्वारे मांडला. २०२१ च्या पुरानंतर प्रशासनाने केवळ तात्पुरती मलमपट्टी न करता केलेली ठोस उपाययोजना, अचूक संदेशवहन यंत्रणा, नद्यांचे गाळ उपसा अभियान, प्लॅस्टिकमुक्तीचा निर्धार आणि ‘एका क्लिकवर भूसंपादन मोबदला’ या पारदर्शक उपक्रमांची माहिती दिली. या कामांची प्रशंसा करताना आयुक्तांनी अधिकाऱ्यांच्या दूरदृष्टीचे कौतुक केले. कोंडमळा येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा क्र. १ मधील मतदान केंद्रांची पाहणी करताना एका प्रशासकीय अधिकाऱ्यातील संवेदनशील गुरुचे रूप पाहायला मिळाले. शाळेतील मुलींशी गप्पा मारताना, "मोठं होऊन काय व्हायचंय?" असा सहज प्रश्न आयुक्तांनी विचारला. त्यावर मुलींनी "डॉक्टर, गायिका, शिक्षिका" अशी उत्स्फूर्त स्वप्ने मांडली. या निरागस उत्तरांवर, "मलाही लहानपणी शिक्षिकाच व्हायचं होतं," अशी मनातील भावना व्यक्त करत आयुक्तांनी बालपणीच्या आठवणींना हळूवार उजाळा दिला. यावेळी येथील मतदानकेंद्राची पाहणी करतानाच, शाळेतील सुविधांची विशेषतः स्वच्छतागृहांची माहिती त्यांनी घेतली.

टाईम्स स्पेशल

यावेळी त्यांनी मतदार यादी पुनरिक्षणात उत्कृष्ट योगदान देणाऱ्या बीएलओ एस. एस. मालगुंडकर आणि के. एस. खापरे यांचे कौतुक केले. आयुक्तांनी कळंबस्ते येथील निसर्गसंपन्न देवराईला भेट देऊन जैवविविधतेचे रक्षण करण्याचे महत्त्व अधोरेखित केले; तसेच ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्त्या’ची पाहणी करून शेतकऱ्यांच्या दळणवळण सुविधेचा आढावा घेतला. कोंडमळा ग्रामपंचायतीला भेट देत त्यांनी ‘प्रधानमंत्री आवास योजने’तील घरकुलांची थेट पाहणी करून लाभार्थ्यांशी संवाद साधला. चिपळूण नगरपरिषदेला भेट देऊन त्यांनी लोकप्रतिनिधींशी संवाद साधला. प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाली असून ३० सप्टेंबरपर्यंत दुरुस्ती व हरकती नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. एकही पात्र मतदार वंचित राहू नये यासाठी नाव नोंदणीसाठी अर्ज क्रमांक ६ व दुरुस्तीसाठी अर्ज क्रमांक ८ भरून लोकशाहीच्या या उत्सवात सजगपणे सहभागी व्हावे, असे आवाहन रुबल अगरवाल यांनी केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg