loader
Breaking News
Breaking News
Foto

फुरूसमध्ये घरफोडी करणार्‍या चोरट्याला रंगेहात पकडले; ग्रामस्थांनी घेतला सुटकेचा श्वास

खेड (प्रतिनिधी) : खेड तालुक्यातील फुरूस परिसरात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या घरफोडीच्या घटनांमुळे निर्माण झालेल्या भीतीच्या वातावरणाला अखेर मोठा धक्का बसला आहे. मंगळवारी रात्री एका बंद घरात शिरलेल्या संशयित चोराला गावातील सतर्क तरुणांनी धाडसाने पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. या कारवाईमुळे फुरूस परिसरातील ग्रामस्थांनी सुटकेचा श्वास घेतला आहे. संशयिताचे नाव अनुज रमेश कावणकर, रा. दाभोळ, ता. दापोली असे असल्याचे समोर आले आहे. फुरूस गावात गेल्या काही दिवसांपासून विशेषतः सायंकाळी अंधार पडल्यानंतर बंद घरांना लक्ष्य करून घरफोडी करण्याचे प्रकार सुरू होते. त्यामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. काही घरांमध्ये चोरीच्या घटना घडल्यानंतर ग्रामस्थांनी रात्रीच्या वेळी अधिक सतर्क राहण्यास सुरुवात केली होती. चोरीच्या एका घटनेत संशयित व्यक्ती सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाली होती. मात्र पोलिसांत तक्रार दाखल करूनही संबंधित व्यक्तीचा ठोस शोध लागत नसल्याने पोलिसांसमोरही आव्हान निर्माण झाले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दरम्यान, मंगळवारी रात्री सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास एका बंद घराच्या शेजारी राहणार्‍या तरुणाला त्या घरामध्ये अचानक दिवा लागल्याचे दिसून आले. घरातील व्यक्ती उपस्थित नसताना घरात प्रकाश दिसल्याने त्याला संशय आला. त्याने कोणताही धोका न पत्करता गावातील इतर तरुणांना फोन करून घटनास्थळी बोलावले. काही वेळातच सुमारे १५ ते २० तरुण घटनास्थळी दाखल झाले. या तरुणांनी घराला गराडा घालत संशयित व्यक्ती बाहेर येण्याची वाट पाहिली. घरातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करताच ग्रामस्थांनी त्याला पकडले आणि पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत संशयिताला ताब्यात घेतले. या घटनेमुळे गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या दहशतीखाली असलेल्या फुरूस गावातील ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे. पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतल्यानंतर घटनास्थळाचा पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू केली. मात्र बातमी तयार होईपर्यंत पंचनाम्याचा सविस्तर तपशील उपलब्ध झाला नव्हता. त्यामुळे संशयिताने घरातून नेमकी कोणती मालमत्ता किंवा वस्तू चोरली होती का, तसेच या घटनेत चोरीचा प्रयत्न कितपत यशस्वी झाला, याबाबत अधिकृत माहिती पोलिस तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.

टाईम्स स्पेशल

दरम्यान, पोलिस तपासात संशयिताचे गेल्या चार-पाच दिवसांपासून तांबड परिसरातील जंगलात वास्तव्य असल्याची माहिती समोर आल्याचे वृत्त आहे. तसेच फुरूस परिसरातील यापूर्वीच्या चोरीच्या घटनांमध्येही त्याचा सहभाग आहे का, या दिशेने पोलिस तपास सुरू आहे. संशयिताकडून अधिक माहिती मिळाल्यानंतर या घरफोडीच्या घटनांचे धागेदोरे उलगडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. फुरूस गावातील तरुणांनी दाखविलेली सतर्कता आणि धाडस यामुळे संशयित चोर पोलिसांच्या हाती लागला. त्यामुळे फुरूस परिसरातील ग्रामस्थांकडून या तरुणांचे कौतुक होत आहे. दरम्यान, रात्रीच्या वेळी संशयास्पद व्यक्ती किंवा हालचाल आढळल्यास नागरिकांनी स्वतःहून कायदा हातात न घेता तातडीने पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg