loader
Breaking News
Breaking News
Foto

१७ वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाचा राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून ११ सप्टेंबरला पाहणी दौरा!

संगलट (खेड)(इक्बाल जमादार)- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ चे काम गेल्या १७ वर्षांपासून सुरू असून अद्यापही हा महामार्ग पूर्णत्वास आलेला नाही. निकृष्ट दर्जाचा रस्ता, ठिकठिकाणी पडलेले खड्डे, रखडलेले काम आणि अपघातांमुळे कोकणवासीयांसह प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. गणरायाचे आगमन होत असताना कोकणात येणार्‍या गणेशभक्तांचा प्रवास सुखकर व सुरक्षित व्हावा, तसेच महामार्गाच्या दुरवस्थेचा जाब सरकारला विचारण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांच्या वतीने ११ सप्टेंबर २०२६ रोजी मुंबई-गोवा महामार्गाचा पाहणी दौरा आयोजित करण्यात आला आहे. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, आमदार रोहितदादा पवार, महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणीताई खडसे आणि ओबीसी सेलचे अध्यक्ष राज राजापूरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा दौरा होणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मुंबई-गोवा महामार्गाची कामे अपूर्ण आणि रस्त्याची अवस्था खराब असतानाही या मार्गावर चार ठिकाणी टोल नाके उभारण्यात आल्याचा मुद्दा राष्ट्रवादी कॉंग्रेसने उपस्थित केला आहे. रायगडमधून मुंबईला जाणार्‍या नागरिकांना ये-जा करताना टोलचा मोठा आर्थिक भार सहन करावा लागत असल्याचे पक्षाने म्हटले आहे. एका नागरिकाने रस्त्याच्या विकासासाठी २४ तासांत किती वेळा टोल द्यायचा? असा सवाल या दौर्‍यात उपस्थित केला जाणार असून रायगडच्या नागरिकांना टोलच्या आर्थिक बोजातून दिलासा मिळवून देण्यासाठी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे ठोस भूमिका घेतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

टाइम्स स्पेशल

गेल्या १७ वर्षांत मुंबई-गोवा महामार्गाच्या पूर्णत्वाबाबत राज्यकर्त्यांकडून वेळोवेळी विविध डेडलाईन देण्यात आल्या. या गणपतीला रस्ता पूर्ण होईल, या शिमग्याला रस्ता पूर्ण होईल अशा आश्वासनांची पुनरावृत्ती झाली; मात्र प्रत्यक्षात महामार्गाचे काम अद्याप पूर्ण झाले नसल्याची टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसने केली आहे. १७ वर्षे महामार्ग रखडलेला असताना टोल वसुली मात्र सुरूच आहे, त्यामुळे या संपूर्ण विषयाचा जाब ११ सप्टेंबरच्या पाहणी दौर्‍यात सरकारला विचारला जाणार असून रायगडच्या जनतेच्या प्रश्नांसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचे रायगड जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg