loader
Breaking News
Breaking News
Foto

कणकवली, सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील सिटीस्कॅन सेवा कराराप्रमाणे विनामूल्य सुरू ठेवा, पालकमंत्री नितेश राणे यांच्या आदेशानुसार क्रस्ना डायग्निस्टिक सेंटरला पत्र

कणकवली; राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (NHM) सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी व कणकवली उपजिल्हा रुग्णालयांमध्ये रुग्णांना मिळणारी इन-हाऊस सीटी स्कॅन सेवा विनामूल्य व क्रेडिट पद्धतीने पूर्ववत सुरू करावी, याबाबत कणकवली भाजपा शहराध्यक्ष अण्णा कोदे व भाजप युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष व कलमठ सरपंच संदीप मेस्त्री यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे मागणी केली होती. त्याबाबत पालकमंत्र्यांनी तातडीने दखल घेत जिल्हा शल्य चिकित्सकांना याबाबतचे आदेश दिले होते. त्यानुसार क्रस्ना डायग्नोस्टिक सेंटर यांच्यासोबत झालेल्या करारानुसार सदरची सेवा विनामूल्य पद्धतीने देण्याबाबत करार करण्यात आला आहे. त्या करारानुसार कार्यवाही करावी असे पत्र जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी क्रस्ना डायग्निसिस सेंटर यांना दिले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तसेच प्रलंबित देयकांचा शासन स्तरावरून तातडीने अदा करणे बाबत पाठपुरावा सुरू असून ते देखील या पत्रात म्हटले आहे. पालकमंत्री नितेश राणे यांनी याबाबत आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांचे लक्ष वेधले असून याबाबतची तातडीने कार्यवाही सुरू असल्याची माहिती श्री कोदे व मेस्त्री यांनी दिली. NHM अंतर्गत देयकांचे निराकरण न झाल्याने १ सप्टेंबरपासून सावंतवाडी व कणकवली येथील इन-हाऊस सीटी स्कॅन सेवांशी संबंधित क्रेडिट सुविधा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, या निर्णयामुळे रुग्णसेवेवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. पत्रानुसार, क्रस्ना डायग्नोस्टिक्ससोबत १४ ऑगस्ट २०२३ रोजी झालेल्या सामंजस्य करारातील (MoU) तरतुदीनुसार शासकीय रुग्णालयातील रुग्णांना सीटी स्कॅन सेवा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधित कंपनीवर आहे. तसेच प्रलंबित देयकांच्या मंजुरीची प्रशासकीय प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, NHM अंतर्गत आवश्यक निधी वर्ग करण्याची कार्यवाही सुरू असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सकांनी स्पष्ट केले आहे.

टाईम्स स्पेशल

सावंतवाडी व कणकवली ही दुर्गम व अतिदुर्गम भागातील प्रमुख उपजिल्हा रुग्णालये आहेत. अपघातातील डोक्याला झालेल्या दुखापती, ब्रेन स्ट्रोक तसेच इतर आपत्कालीन व गंभीर रुग्णांसाठी सीटी स्कॅन तपासणी अत्यंत आवश्यक आहे. शासकीय संदर्भित रुग्णांना विनामूल्य सेवा बंद झाल्यास गरीब व गरजू रुग्णांचे मोठे हाल होण्याची शक्यता पत्रात व्यक्त करण्यात आली आहे.या पार्श्वभूमीवर सावंतवाडी व कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील शासकीय संदर्भित रुग्णांसाठी विनामूल्य इन-हाऊस सीटी स्कॅन सेवा कोणतीही अडचण न आणता पूर्ववत व विनाव्यत्यय सुरू ठेवावी, अशी मागणी पत्राद्वारे जिल्हा शल्यचिकित्सकांनी क्रस्ना डायग्नोस्टिक्सला केली आहे. या पत्राची प्रत आरोग्य आयुक्त व NHM संचालक, मुंबई, आरोग्य सेवा संचालक, मुंबई, उपसंचालक आरोग्य सेवा कोल्हापूर मंडळ, जिल्हाधिकारी तथा जिल्हा आरोग्य समितीचे अध्यक्ष आणि सावंतवाडी-कणकवली उपजिल्हा रुग्णालयांच्या वैद्यकीय अधीक्षकांना पाठविण्यात आली आहे. तसेच याबाबत पालकमंत्री नितेश राणे यांनी जनतेला मिळणारी सुविधा सुरू ठेवा व याबाबतचा तातडीने निर्णय घेतला जात असल्याची सूचना दिल्याने तात्काळ ही कार्यवाही करण्यात आल्याची माहिती कोदे व मेस्त्री यांनी दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg