loader
Breaking News
Breaking News
Foto

कंत्राटी पद्धतीविरोधात खेडमध्ये युवकांचा एल्गार! “रिक्त पदे भरा, कंत्राटी पद्धत हटवा!” — युवा रोजगार जनहक्क संघर्ष संघाचे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन

खेड (दिलीप देवळेकर) - महाराष्ट्रातील वाढती बेरोजगारी आणि शासकीय व निमशासकीय क्षेत्रातील कंत्राटी पद्धतीच्या वाढत्या वापराविरोधात युवा रोजगार जनहक्क संघर्ष संघ (महाराष्ट्र राज्य) आता आक्रमक झाला आहे. कंत्राटी पद्धतीचा अनावश्यक विस्तार थांबवून कायमस्वरूपी पदांची नियमित भरती सुरू करावी, यासह विविध मागण्यांचे तीव्र आंदोलनात्मक निवेदन संघटनेच्या वतीने बुधवार, दि. २ सप्टेंबर २०२६ रोजी खेडचे प्रांताधिकारी यांना देण्यात आले. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बाळा खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी खेड तालुका अध्यक्ष मिलिंद जाधव, शहराध्यक्ष ऋषिकेश कानडे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

महाराष्ट्रातील लाखो सुशिक्षित युवक शिक्षण पूर्ण करून रोजगाराच्या प्रतीक्षेत आहेत. स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे आणि विविध कौशल्ये आत्मसात केलेले युवक रोजगाराच्या संधी शोधत असताना, कायमस्वरूपी स्वरूपाची कामे कंत्राटी पद्धतीने करून घेतली जात असल्याने युवकांमध्ये अस्वस्थता निर्माण होत असल्याचे संघटनेने निवेदनात म्हटले आहे. “रिक्त पदे असताना भरती का नाही? कायमस्वरूपी कामे असताना कंत्राटी नियुक्त्या का? युवकांनी शिक्षण घ्यायचे कशासाठी?” असे थेट सवाल संघटनेने शासनाला केले आहेत. शासकीय व निमशासकीय विभागांतील कंत्राटी पद्धतीचा सर्वंकष आढावा घेऊन कायमस्वरूपी स्वरूपाच्या कामांमध्ये अनावश्यक कंत्राटी पद्धत बंद करावी, सर्व विभागांतील रिक्त पदांची पदनिहाय आकडेवारी जाहीर करावी आणि नियमित पदांची पारदर्शक व वेळबद्ध भरती सुरू करावी, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. याशिवाय दीर्घकाळ कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर न्याय्य धोरण जाहीर करावे, कंत्राटी कामगारांना वेळेवर वेतन, किमान वेतन व सामाजिक सुरक्षा मिळते की नाही याची कठोर तपासणी करावी तसेच मनुष्यबळ पुरवठ्यातील गैरप्रकार व शोषणाच्या तक्रारींची चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. शासनाने केवळ आश्वासने न देता या मागण्यांवर निश्चित कालमर्यादेत लेखी निर्णय घ्यावा, अशी मागणी संघटनेने केली आहे.

टाईम्स स्पेशल

मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास महाराष्ट्रातील युवकांना संघटित करून जिल्हानिहाय निवेदने, जनजागृती अभियान, पत्रकार परिषद, शांततामय मोर्चे, धरणे आंदोलन आणि उपोषण अशा लोकशाही व संविधानिक मार्गाने आंदोलन तीव्र करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. शासनाने ठोस निर्णय न घेतल्यास दि. २ ऑक्टोबर २०२६ रोजी खेड प्रांत कार्यालयासमोर साखळी उपोषण करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. “कंत्राटी पद्धत हटवा — युवकांना कायमस्वरूपी रोजगार द्या!”, “रिक्त पदे भरा — बेरोजगारी दूर करा!”, “आश्वासन नको — ठोस निर्णय हवा!” अशा घोषणांनी युवकांच्या रोजगाराच्या प्रश्नाला आता आंदोलनाची धार मिळणार असल्याचे चित्र आहे. यावेळी खेड तालुका उपाध्यक्ष विजय पवार, सुनील जाधव, बाळाराम पवार, तालुका उपसचिव वर्षा म्हसकर, चंदा जाधव, खलील भाई, किरण तायडे, फारूख मणियार, अल्लादिन मोहीमतुले, सुनील पवार, अनिल मोरे, रामचंद्र कदम, वारीस तांबे, अली सहीबोले, अरुण सोंडकर, दत्तात्रय मोरे, वहीद कडवेकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg

२ ऑक्टोबरला साखळी उपोषणाचा इशारा

foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg