loader
Breaking News
Breaking News
Foto

मनोज जरांगे यांची सरकारला नवी डेडलाईन १२ सप्टेंबरला मुंबईत धडकणार म्हणजे धडकणार!

जालना, : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण शुक्रवारी ७ व्या दिवशीही सुरूच होते. दरम्यान सरकारच्या शिष्टमंडळासोबत गुरूवारी मध्यरात्रीपर्यंत झालेली चर्चा फिस्कटली असून जरांगे यांनी सरकारला ११ सप्टेंबरपर्यंत मुदत दिली आहे. सगळ्या मागण्या मान्य करा अस सांगताना १२ सप्टेंबरला आपण मुंबईत धडकणार म्हणजे धडकणार असे देखील ठणकावले आहे. २९ ऑगस्टपासून आपल्या आंतरवाली सराटी गावामध्ये मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे उपोषणाला बसले आहेत. बुधवारी सरकारच्यावतीने भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी त्यांच्याशी चर्चा केली. नोंदी सापडलेल्या सर्व कुणबी- मराठा बांधवांना प्रमाणपत्र वितरीत करण्याची मागणी सरकारने मान्य केली. अन्य मागण्यांबाबतही सरकार सकारात्मक असल्याने जरांगेंनी उपोषण मागे घ्यावे, असे आवाहन आमदार लाड यांनी केले. मात्र सातारा आणि कोल्हापूर गॅझेटची अंमलबजावणी महिन्याभरात करा तसेच मान्य केलेल्या मागण्याची अंमलबाजावणी सुरू होत नाही तोवर उपोषण मागे घेणार नाही, अशी भुमिका मनोज जरांगे यांनी घेतली. उपोषण मागे घेण्यास नकार दिल्यानंतर किमान पाणी तरी प्या, प्रकृती ढासळते आहे, हे लक्षात घेवून सलाईन लावण्यास अनुमती द्या अशी विनंती आमदार प्रसाद लाड यांनी सरकारच्यावतीने जरांगेंना केली. ती त्यांनी मान्य केली. बुधवारी रात्री आमदार प्रसाद लाड यांनी त्यांना पाणी पाजले. डॉक्टरांनी सलाईन लावली. मात्र उपोषण सुरूच आहे. या पार्श्वभुमीवर गुरूवारी रात्री सरकारचे शिष्टमंडळ मनोज जरांगे यांना भेटले. यामध्ये मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, मंत्री उदय सामंत, मंत्री मकरंदआबा पाटील आणि भाजपचे आमदार प्रसाद लाड यांचा समावेश होता. त्यांनी जरांगेची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र सरकारच्या शिष्टमंडळाला यश आलं नाही. मनोज जरांगे उपोषणावर कायम आहेत. गुरूवारी रात्री उशीरापर्यंत शिष्टमंडळाचे प्रयत्न सुरू होते. सर्व मागण्या मान्य होतील असे या नेत्यांनी जरांगे यांना वारंवार सांगितले. उपोषण मागे घेण्याची विनंती केली. मात्र ती विनंती जरांगेंनी फेटाळली. ११ सप्टेंबरपर्यंत सगळ्या मान्य करा असा नवा अल्टिमेटम मनोज जरांगेंनी सरकारला दिला आहे. ११ सप्टेंबरला मागण्या मान्य झाल्यास मुंबईत गुलाल घेऊन येऊ आणि १२ तारखेच्या बैठकीत पुढचा निर्णय घेऊ असा निर्धार मनोज जरांगेंनी केला आहे. जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तरीही १२ सप्टेंबरला मुंबईत येवूच, आंदोलन करू, असे जरांगे यांनी या शिष्टमंडळाला स्पष्टपणे सांगितले. त्यावर तुमच्या सर्व मागण्या मान्य/ पूर्ण होतील, तुम्ही उपोषण मागे घ्या, अशी विनवणी वारंवार मंत्र्यांच्या शिष्टमंडळानं केली. मात्र पाणी पितो, सलाईन लावतो, मात्र उपोषण मागे घेणार नसल्याचा पवित्रा मनोज जरांगेंनी घेतला. अखेर जवळपास अडीच तासांच्या चर्चेनंतर मंत्र्यांचं शिष्टमंडळ माघारी परतले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

११ सप्टेंबरपर्यंत सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी करा, त्यानंतर उपोषण मागे घेतो असं मनोज जरांगे म्हणाले. यापुढे मी उपोषण करू शकत नाही, शरीर साथ देत नाही. यापुढे जर उपोषण केलो तर मी मरून जाईन. त्यामुळे जे काही आहे आहे ते आताच आहे, आताच मराठा समाजाच्या सगळ्या मागण्या मान्य करून घेणार, असं मनोज जरांगे म्हणाले. मंत्र्यांच्या शब्दाला मान देतो, एकाच्या ठिकाणी २ सलाईन लावून घेतो, मात्र सगळ्या मागण्या मान्य झाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नसल्याचं मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलं. ४ सप्टेंबरपासून ज्यांच्या नोंदी सापडल्या आहेत त्यांना प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू करण्याची घोषणा विखे पाटील यांनी केली. ज्यांच्या नोंदी सापडल्या आहेत त्यांनी जात प्रमाणपत्रासाठी अर्ज करावेत. ज्यांना अडचणी येतील त्यांनी त्या त्या जिल्हाधिकार्‍यांशी संपर्क साधावा, असं आवाहन विखे पाटील यांनी केलं.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg