loader
Breaking News
Breaking News
Foto

गणेशोत्सवासाठी मालवण नगरपरिषदेचे नियोजन; रस्ते, विसर्जन स्थळे, पार्किंग व स्वच्छतेबाबत प्रशासनाची तयारी

मालवण (प्रतिनिधी) - आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवण शहरात भाविकांना आणि नागरिकांना कोणतीही गैरसोय भासू नये, यासाठी मालवण नगरपरिषदेच्या वतीने विविध सोयी-सुविधांचे नियोजन करण्यात आले आहे. याबाबत आयोजित नियोजन बैठकीत शहरातील रस्ते दुरुस्ती, स्वच्छता, विसर्जन स्थळांची व्यवस्था, पार्किंग नियोजन आणि अग्निशामक दलाची तत्परता यांसारख्या विविध पातळ्यांवर नियोजन करण्यात आले. गणेश चतुर्थी सणाच्या पार्श्वभूमीवर मालवण नगरपरिषदेच्या सभागृहात आज विशेष नियोजन बैठक पार पडली. या बैठकीस नगराध्यक्षा ममता वराडकर, मुख्याधिकारी प्रतीक थोरात, नायब तहसीलदार नीलिमा प्रभुदेसाई, नगरसेविका नीना मुंबरकर, महानंदा खानोलकर, मेघा सावंत, अश्विनी कांदळकर, भाग्यश्री मयेकर, नगरसेवक सुदेश आचरेकर, मंदार केणी, महेश कांदळगावकर, सिद्धार्थ जाधव, ललित चव्हाण, व्यापारी नितीन वाळके, नितीन तायशेटे, बाळू अंधारी, संदेश कोयंडे आदी तसेच याशिवाय एसटी महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरणचे अभियंता सचिन मेहेत्रे आणि नगरपरिषदेचे संबंधित विभागाचे अधिकारीही उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मालवण शहरातील खराब रस्त्यांवरून नागरिक आणि वाहनचालकांना होणारा त्रास लक्षात घेता, नगरसेवकांनी रस्त्यावरील खड्ड्यांचा प्रश्न तीव्रतेने मांडत गणेशोत्सवात गणेशभक्तांना खड्डेमय रस्त्यांचा त्रास होणार असल्याचे सांगण्यात आले. यावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी शहरातील खड्डे बुजविण्याची कार्यवाही उद्या बुधवार रात्रीपासून प्रत्यक्षपणे सुरू केली जाईल असे सांगत गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वी मुख्य रस्ते खड्डेमुक्त करण्याचे आश्वासन दिले. शहरात कुठेही नगरपालिकेच्या परवानगीशिवाय लावण्यात येणाऱ्या बॅनर्स आणि पोस्टर्सचा प्रश्नही गाजला. यावर मुख्याधिकारी प्रतीक थोरात यांनी कडक भूमिका घेत "जर अनधिकृत बॅनर लावणाऱ्यांचा पत्ता लागला नाही, तर ते बॅनर ज्या प्रिंटींग व्यवसायातून छापले गेले आहेत, त्या प्रिंटींग प्रेस मालकांवरच कायदेशीर कारवाई केली जाईल, कोणीही परवानगी घेतल्या शिवाय बॅनर लावू नये, तसेच जी जागा नेमून दिली जाईल तेथेच बॅनर लावावा, असे स्पष्ट केले.

टाईम्स स्पेशल

शहरातील अनेक भागांमध्ये विद्युत तारा आणि वाहिन्या धोकादायक अवस्थेत आहेत, ज्यामुळे उत्सवाच्या काळात अपघात होण्याची भीती व्यक्त करण्यात आली. यावर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ धोकादायक वीज वाहिन्यांचा सर्व्हे करावा, अशी मागणी नगरसेवकांनी केली. महावितरणने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन आवश्यक ती दुरुस्ती तत्काळ करावी, असे निर्देश नगराध्यक्ष वराडकर यांनी दिले. गणेशोत्सवाच्या काळात बाजारपेठेत होणारी प्रचंड गर्दी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी, मुख्य बाजारपेठेतील फळविक्रेत्यांना उत्सवाच्या दिवसांमध्ये अन्यत्र बसविण्याची कार्यवाही केली जाईल, अशी माहिती नगराध्यक्षा ममता वराडकर यांनी दिली. शहरातील मोकाट कुत्र्यांच्या समस्येवरही बैठकीत चर्चा झाली. यावर मुख्याधिकारी थोरात यांनी सध्या गणेशोत्सवाचे नियोजन सुरू असल्याने, मोकाट कुत्र्यांना पकडून त्यांचे निर्बिजीकरण करण्याची विशेष मोहीम गणेश चतुर्थी सण आटोपल्यानंतर राबविली जाईल, असे स्पष्ट केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg